आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Increasing Attacks On Freedom Of Speech And Writing | Article By Makarand Paranjape

दृष्टिकोन:भाषण व लेखन स्वातंत्र्यावर वाढत असलेले हल्ले

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक सलमान रश्दी यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याला जागतिक चर्चेचा भाग बनवण्याची गरज आहे. ही केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाची बाब नाही, तर ती अतिरेकी आणि असहिष्णुतेशीही संबंधित आहे. श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेविरोधात जग एकजूट होत नाही, तोपर्यंत आपण अशा घटनांचे साक्षीदार होत राहू. रश्दींवरील हल्ला हा भारताच्या फाळणीच्या स्मरणोत्सवाच्या पूर्वसंध्येला झाला हे दुर्दैवी आहे. भारताच्या फाळणीच्या शोकांतिकेला ७५ वर्षे पूर्ण होत असताना मिडनाइट्स चिल्ड्रनच्या लेखकाला न्यूयॉर्कमध्ये भोसकण्यात आले. रश्दी हे स्वतः फाळणीचे अपत्य आहेत. त्यांनी एक कादंबरी लिहिली आहे, ती पाश्चात्त्य समीक्षकांनी आणि प्रसारमाध्यमांनी ब्रिटिशांपासून भारताचे स्वातंत्र्य आणि नंतर १९७५ च्या आणीबाणीत त्या स्वातंत्र्याचा पराभव यावर एक उत्कृष्ट नमुना मानली आहे. मिडनाइट्स चिल्ड्रनला केवळ १९८१ मध्ये बुकर पारितोषिकच मिळाले नाही, तर बुकर ऑफ द बुकर पुरस्कार एकदा नव्हे, तर दोनदा मिळवणारी ही एकमेव कादंबरी आहे, प्रथम १९९३ मध्ये बुकरच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आणि नंतर २००८ मध्ये तिच्या ४० व्या वर्धापनदिनी.

पण दुर्दैवाने मिडनाइट्स चिल्ड्रनऐवजी १९८८ च्या द सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे रश्दी यांना जागतिक कीर्ती मिळाली. या पुस्तकामुळे त्यांना १९८९ मध्ये अयातुल्ला खोमेनी यांच्या फतव्याचे लक्ष्य व्हावे लागलेच, पण त्यांना माफी मागायलाही भाग पाडले गेले, ते वनवासात राहिले आणि त्यांना वीसपेक्षा जास्त वेळा घर बदलावे लागले. ते व्हेंटिलेटरवर आहेत आणि हदी मातर नावाच्या हल्लेखोराने त्यांच्यावर अनेकदा हल्ला केल्याने बहुधा त्यांना डोळा गमावावा लागणार. स्वतंत्र जगाच्या मोठ्या भागांनी या हल्ल्याचा निषेध केला असताना अनेक मुस्लिम संघटना व व्यक्तींनी हल्लेखोराच्या समर्थनार्थ आवाज उठवला आणि त्याचे अभिनंदन केले. इराणच्या उजव्या विचारसरणीच्या काहयान या वृत्तपत्राने लिहिले की, ‘न्यूयॉर्कमधील भ्रष्ट आणि स्वतःच्या धर्माचा विश्वासघात करणाऱ्या सलमान रश्दीवर हल्ला करणाऱ्या या शूर आणि परिपूर्ण माणसाला शाबासकी. आपण त्याच्या हातांचे चुंबन घेतले पाहिजे.’ रश्दींवरील १९८९ चा फतवा कधीही मागे घेण्यात आला नाही आणि आजही इराण सरकारच्या वेबसाइटवर आहे. इतकेच नाही, तर रश्दींची हत्या करणाऱ्या व्यक्तीसाठी बक्षिसाची रक्कमही ३० लाखांवरून ६० लाख डाॅलर करण्यात आली आहे. इराणच्या केवळ धार्मिक संघटनाच नाही, तर माध्यम संस्थांही ही रक्कम आणखी वाढवण्याचे आवाहन करत आहेत.

जगभर द सॅटॅनिक व्हर्सेसच्या प्रकाशकांपासून ते अनुवादकांपर्यंत हत्या झाल्या आहेत आणि त्या पुस्तकावरून झालेल्या दंगलीत भारत, पाकिस्तान, तुर्की आणि इतर देशांमध्ये अनेक लोक मारले गेले आहेत. या पुस्तकावर बंदी घालणारा भारत हा जगातील पहिला देश होता, हे लक्षात ठेवा. रश्दी यांना जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यालाही मनाई करण्यात आली होती, कारण शहरातील इस्लामिक संघटनांनी आयोजकांना धमकी दिली होती. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ३४ वर्षांनी रश्दींवर झालेल्या हल्ल्याने ज्याबद्दल कोणीही बोलू इच्छित नाही किंवा गंभीरपणे घेऊ इच्छित नाही असे एक अस्वस्थ सत्य पुन्हा एकदा समोर आणले आहे.

जगातील अनेक धर्म आणि विचारसरणींनी हिंसेचा गैरवापर करून भूतकाळात नरसंहार केला आहे. पण, कटू सत्य असे की, आज इस्लामिक अतिरेक्यांच्या नावाखाली होणारी हिंसा हे आपल्या स्वातंत्र्यापुढील मोठे आव्हान झाले आहे. जगभरातील नागरी समाजाने याकडे दुर्लक्ष न करता त्याला सामोरे जावे. जगभरातील सरकारांनी याचा गांभीर्याने विचार करून अशा घटनांची पुनरावृत्ती रोखावी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इस्लामिक धर्मगुरूंनी पुढे येऊन अशा हिंसाचाराच्या घटनांचा निषेध केला पाहिजे. आपण एक मानवीय, सहिष्णु आणि दयाळू जग निर्माण केले पाहिजे, जिथे आपल्या श्रद्धेचा अपमान झाला तरीही आपण दुखावले जाणार नाही. कारण धर्मच हिंसेला प्रेरणा देऊ लागले किंवा त्याचे समर्थन करू लागले, तर जगात शांतता, प्रगती आणि एकात्मतेचे काय होईल? (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

मकरंद परांजपे लेखक, विचारवंत आणि जेएनयूमधील प्राध्यापक

बातम्या आणखी आहेत...