आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • India | Budget 2022 | Digital Currency | Nirmala Sitaram | Special Article For Digital Currency | Digital Rupee: Illusion And Reality Chandrasekhar Tilak

रसिक स्पेशल:डिजिटल रुपया : आभास अन् वास्तव- चंद्रशेखर टिळक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याचा कागदी रुपया आणि प्रस्तावित डिजिटल रुपया या दोन्हींमध्ये सैद्धांतिक स्वरूपाचा काहीही फरक नसेल. असेलच तर तो फक्त कागदी आणि आभासी असण्याचा. हे एखाद्या व्यक्तीने अंगावरचे कपडे बदलण्यासारखे आहे. दिसतात ते कपडे बदलले म्हणून असते ती व्यक्ती बदलत नाही. या चलनाचेही तसेच आहे. त्यामुळे डिजिटल रुपया ही संभाव्य नोटाबंदीची नांदी असल्याची चर्चा निरर्थक आणि पूर्णपणे बिनबुडाची आहे.

कें द्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. येत्या आर्थिक वर्षात देशाची मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व्ह बँक ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून "डिजिटल रुपया’ तयार करेल, अशी घोषणा त्यांनी केली. तेव्हापासून अनेक ठिकाणी, विविध माध्यमांत "डिजिटल रुपया’ म्हणजे आपले बिटकॉइन किंवा क्रिप्टोकरन्सी आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. आभासी चलनाविषयीच्या मतमतांतरातून जनमानसाला होणारे वेगवेगळे ‘आभास’ आणि त्याबाबतचे वास्तव यातील फरक समजावा, त्यातून सर्वांच्या मनातील शंका, संशय आणि भीतीचे निराकरण व्हावे, म्हणून हा शब्दप्रपंच!

डिजिटल रुपया म्हणजे बिटकॉइन नाही. डिजिटल रुपया म्हणजे क्रिप्टोकरन्सीही नाही. खरं म्हणजे, डिजिटल रुपयाला बिटकॉइन असे म्हणणे किंवा मानणे, हे आपणच आपल्या सार्वभौम देशाचा, त्याच्या कायद्याने अस्तित्वात आलेल्या व त्यानुसार कारभार करत असलेल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेचा म्हणजे रिझर्व्ह बँकेचा आणि आपल्या देशाचे अधिकृत चलन असणाऱ्या रुपयाचा अपमान करण्यासारखे आहे. त्याबाबत कुणी एखादा कायदेशीर कारवाई करू शकतो का, हे पाहावे लागेल. केवळ या भीतीपोटी किंवा धाकापोटी येऊ घातलेल्या डिजिटल रुपयाला एखाद्याने क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉइन म्हणू नये असे नाही, तर असे म्हणणे हे संकल्पनात्मक आणि व्यावहारिक दृष्टीनेही चुकीचेच आहे.

त्यामागचे पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे, आजमितीला जागतिक आर्थिक वातावरणात सुमारे १७५ विविध नावांच्या आणि प्रकारांच्या क्रिप्टोकरन्सी अस्तित्वात आहेत. बिटकॉइनही त्यापैकी एक आहे. एकमेव नाही. येऊ घातलेला किंवा प्रस्तावित डिजिटल रुपया अशा प्रकारे अनेक स्वरूपात येण्याची सुतराम शक्यता नाही. तो एकमेवच असेल.

दुसरे कारण म्हणजे, क्रिप्टोकरन्सी सैद्धांतिकदृष्ट्या तुमच्या-माझ्यासारख्या खासगी व्यक्तीही निर्माण करू शकतात. आपले रुपया हे चलन तसे नाही. ते खासगी व्यक्ती निर्माण करू शकत नाहीत. केवळ प्रस्तावित डिजिटल रुपयाच नव्हे, तर सध्या अस्तिवात असलेले आणि यानंतरही येणारे रुपयाच्या स्वरूपातील चलन केंद्र सरकारच्या विनंतीनुसार रिझर्व्ह बँक निर्माण करते. ते कोणतीही खासगी व्यक्ती निर्माण करू शकत नाही. करूच शकणार नाही.

तिसरे कारण म्हणजे, क्रिप्टोकरन्सीचे मूल्य बाजारातील त्याच्या मागणी-पुरवठ्यावर ठरते. शेअर बाजारात शेअर्सचे भाव ठरतात त्याप्रमाणे क्रिप्टोकरन्सीचे मूल्य ठरते. डिजिटल रुपयाच्या बाबतीत तसे मूल्यनिर्धारण नसेल. चौथे कारण, क्रिप्टोकरन्सीला कोणतेही आधारभूत तत्त्व नाही. त्यांची निर्मिती, अस्तित्व, चलनवलन, मूल्यांकन हे सारे एका अर्थाने निव्वळ संगणकीय खेळ आहेत. डिजिटल रुपया तसा नसेल. त्याला आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा पाया किंवा आधार असणार आहे. जी मूल्यांकन तत्त्वे आपल्या सध्याच्या कागदी स्वरूपातील रुपयाच्या मागे आधार म्हणून आहेत, तीच डिजिटल रुपयाचीही आधार असतील.

पाचवे कारण हे, की क्रिप्टोकरन्सी हे गुंतवणुकीचे साधन (Investment Product) आहे. खरं म्हणजे, सध्या तरी ते सट्टेबाजांनी उचलून धरलेले जुगारी खेळणे ठरले आहे. याउलट प्रस्तावित डिजिटल रुपया हे व्यवहारपूर्ती करताना द्यावयाच्या पैशांचे एक रूप किंवा माध्यम आहे. जसे शेअर बाजारात गुंतवणूक करताना एखादा भारतीय गुंतवणूकदार त्याच्याजवळ असणारे शेअर्स कागदी प्रमाणपत्रांच्या (फिजिकल शेअर सर्टिफिकेट) स्वरूपातही सांभाळू शकतो किंवा डिमटेरियलाइज स्वरूपातही सांभाळू शकतो, त्याच धर्तीवर डिजिटल रुपया प्रत्यक्षपणे अस्तित्वात आल्यावर आपल्याजवळची रोकड रक्कम आपण सध्याप्रमाणे कागदी नोटांच्या स्वरूपातही बाळगू शकू आणि / किंवा प्रस्तावित डिजिटल स्वरूपातही सांभाळू शकू. थोडक्यात, डिजिटल रुपया हे गुंतवणुकीचे साधन वा सट्टेबाजीचे आधुनिक खेळणे अजिबात नसेल, तर ते केवळ विनिमयाचे एक साधन असेल.

अगदी नेमक्या शब्दांत सांगायचे, तर सध्याचा कागदी रुपया आणि प्रस्तावित डिजिटल रुपया या दोन्हींमध्ये सैद्धांतिक स्वरूपाचा काहीही फरक नसेल. असेलच तर तो फक्त कागदी आणि आभासी असण्याचा. हे एखाद्या व्यक्तीने अंगावरचे कपडे बदलण्यासारखे आहे. दिसतात ते कपडे बदलले म्हणून असते ती व्यक्ती बदलत नाही. तसेच डिजिटल रुपयाचे आहे. त्यामुळे डिजिटल रुपया ही संभाव्य नोटाबंदीची नांदी असल्याची चर्चा निरर्थक आणि पूर्णपणे बिनबुडाची आहे. दुसरीकडे, डिजिटल रुपयाबाबत अशीही चर्चा आहे, की त्यामुळे काळ्या पैशाला आणि महागाईला आळा बसेल.

अशी चर्चा म्हणजे तर निव्वळ भाबडेपणा आहे. कागदी रुपया आणि डिजिटल रुपया यांच्यात मूलभूत, सैद्धांतिक स्वरूपाचा काहीही फरक नाही, तर एक दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळे कसे वागेल? दिसण्याच्या स्वरूपात असणाऱ्या अंगभूत फरकाने काय फरक पडेल, तेवढाच! त्याच्याशी संबंधित तांत्रिक बाबी एकदा अंगवळणी पडल्या की तेही जाणवणार नाही.

डिजिटल रुपयाला क्रिप्टोकरन्सी म्हणणे पूर्णपणे चुकीचे असण्याचे सहावे कारण म्हणजे आजमितीस तरी क्रिप्टोकरन्सी हे कोणत्याही देशाचे अधिकृत चलन नाही. डिजिटल रुपया हे अस्तित्वात आल्याच्या दिवसापासून आपल्या देशाचे अधिकृत चलन असेल. याबाबतचे सातवे कारण म्हणजे, क्रिप्टोकरन्सी हे विनिमयाचे साधन म्हणून कुठे वापरता येईल, हे पूर्णपणे त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असते. त्या आणि तशा प्रकारच्या व्यवहारात सरकारचा काडीचाही संबंध नाही. त्यात काहीही अडचण आल्यास संबंधित सरकार किंवा मध्यवर्ती बँक हस्तक्षेप करत नाही. असा प्रकार डिजिटल रुपयाबाबत असणार नाही. त्यामुळे डिजिटल रुपया ही क्रिप्टोकरन्सी नाही, तो बिटकॉइनही असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

केंद्र सरकारच्या धोरणांचे समर्थन वा त्यांचा विरोध हा येथे मुद्दा असू शकत नाही. आभासी चलनांमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांपुढे निर्माण झालेल्या आव्हानांतून मार्ग काढताना आपल्याकडे अशा चलनाला विश्वासार्ह आणि सैद्धांतिक पर्याय दिला जाणे महत्त्वाचे आहे. जागतिक पातळीवर शंका, वाद, चिंता यांच्या भोवऱ्यात सापडलेल्या क्रिप्टोकरन्सीशी प्रस्तावित डिजिटल रुपयाची तुलना करणे ना डिजिटल रुपयाच्या आत्मसन्मानाला धरून होईल ना कोणत्याही सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला! कारण हा संकुचित राजकीय गदारोळाचा मुद्दा वा जुमला नव्हे, तर निखळ अर्थकारणाचा मामला आहे.

चंद्रशेखर टिळक
chandrashekhartilak @gmail.com
संपर्क : 9820292376

बातम्या आणखी आहेत...