आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2023 मध्ये आपली इकाॅनॉमी:बदलत्या जगाच्या केंद्रस्थानी राहील भारत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष २०२३ पासून एका महत्त्वाच्या जागतिक वळणाची सुरुवात होईल, त्याच्या केंद्रस्थानी भारत असेल. अनेक दशकांपासून भारताची तुलना गजराजाशी केली जात होती, त्याच्यात खूप शक्ती आहे, परंतु चाल मंद आहे. पण, आता सिंहासारखी गर्जना करत भारताने जागतिक पटलावर आपले अस्तित्व नोंदवले आहे. तेव्हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था मंदी आणि महागाईशी झुंजत असताना भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे, यात आश्चर्य नाही. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, भारताचा विकास दर सुमारे ६.९% राहू शकतो, तर ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सने भारताकडून जास्त अपेक्षा ठेवत २०२६ पर्यंत ७.६% आणि २०३० च्या सुरुवातीस ८.५% विकास दराचा अंदाज वर्तवला आहे.

२०२२ मध्ये भारत ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला. दशकापूर्वी भारत ११व्या स्थानावर असताना या स्थानावरून ही मोठी झेप आहे. ही गती आता थांबणार नाही आणि आयएमएफवर विश्वास ठेवला तर २०२८ पर्यंत भारत जर्मनी आणि जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ शकेल. मॉर्गन स्टॅन्ले या इन्व्हेस्टमेंट बँकेने अशी अपेक्षा केली आहे की, असे २०२७ पर्यंतच होईल आणि २०३० पर्यंत भारताकडे जगातील तिसरा सर्वात मोठा शेअर बाजार असेल. भारताची आर्थिक भरभराट अपरिहार्य आणि सुस्पष्ट असल्याचे सांगत मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या अलीकडील अहवालात म्हटले आहे की, २०३१ पर्यंत भारताचा जीडीपी आजच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. आता तो ३.५ ट्रिलियन डॉलर्स आहे आणि येत्या आठ वर्षांत ७.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. आणि मुंबई शेअर बाजार ११% च्या वार्षिक दराने १० ट्रिलियन डाॅलरचे बाजार भांडवल गाठू शकतो. २०२६ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीच्या बरोबरीने ४.५५ ट्रिलियन डाॅलरपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा करणे निराधार नाही. राहणीमानाच्या खर्चावर आधारित पर्चेसिंग पाॅवर पॅरिटीच्या हिशेबाने भारत आधीच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. जागतिक बँक याचे श्रेय भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेला देते, ती आव्हाने पेलण्यास सक्षम आहे. जिथे चीन, मेक्सिको, ब्राझील अडखळत असताना त्याच परिस्थितीतही भारत टिकून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारताची प्रचंड देशांतर्गत बाजारपेठ आणि परकीय व्यापार प्रवाहावरील तुलनेने कमी अवलंबित्व. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर भारताने तटस्थ राहण्याचा धाडसी निर्णय घेतला. पाश्चिमात्य शक्तीच्या दबावापुढे तो झुकला नाही. यामुळे तो रशियाशी करार करू शकला आणि त्याला स्वस्त दरात तेल मिळत राहिले. याच्या मदतीने भारत महागाईवर नियंत्रण ठेवू शकला, तर इतर अर्थव्यवस्था उच्च ऊर्जा खर्चामुळे त्रस्त आहेत. आज भारताकडे ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय चलन साठा आहे, तो जगातील सर्वात मोठ्या गंगाजळींपैकी एक आहे. वाढत्या विदेशी गुंतवणुकीमुळे चालू खात्यातील तुटीला दिलासा मिळत आहे. इतर अर्थव्यवस्थांमध्ये मंदी असतानाही परदेशी गुंतवणूकदारांनी भारतासारख्या स्थिर अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करणे चांगले मानले आहे. कोविड लसीच्या जागतिक मागणीवर भारताच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याच्या फार्मास्युटिकल्सलाही मोठी चालना मिळाली आहे आणि २०२२ मध्ये ते भारतातील सर्वात वेगाने वाढणारे एफडीआय क्षेत्र झाले आहे. भारताची निर्यात आज जगाच्या निर्यातीपैकी फक्त २% आहे, परंतु भारताच्या जीडीपीमध्ये उत्पादनाचा वाटा १५.६% पर्यंत वाढला आहे आणि २०३१ पर्यंत २१% पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. आता भारत सरकार जगातील अनेक देशांशी व्यापारी करार करणार आहे, तर त्यात आणखी वाढ होणार आहे. भारताने यापूर्वी १३ महत्त्वाचे मुक्त व्यापार करार केले आहेत. २०२३ मध्ये होणारी मोठी गोष्ट म्हणजे भारताला जी-२० चे अध्यक्षपद मिळणे. त्याच्या मदतीने संपूर्ण वर्षभर भारत महत्त्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकत राहील, विशेषत: विकसनशील देशांमध्ये आणि जागतिक धोरणांसाठी अजेंडा ठरवेल. आंतरराष्ट्रीय संबंधांमधील स्थैर्य, क्लायमॅट फायनान्सिंगकडे कल आणि महामारीनंतर चांगली रिकव्हरी यामुळे भारत आघाडीवर आहे. २०२३ मध्ये भारत जगासाठी अजेंडा ठरवेल आणि केवळ स्वतःसाठीच नाही, तर इतर विकसनशील देशांसाठीही चांगल्या सौद्यांसाठी वाटाघाटी करेल. जग बदलत आहे आणि या बदलात भारत आघाडीवर आहे.

(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) रुही खान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधील संशोधक

बातम्या आणखी आहेत...