आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास हा देशी आणि दोन परदेशी प्रवासांच्या आठवणी डॉ. अच्युत बन यांनी ‘आठवणीतील प्रवास’ या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. दोन परदेशी प्रवास म्हणजे बहामा क्रूज आणि फिलिपाइन्सचा फेरा हे प्रत्येकी वीस-पंचवीस पृष्ठांचे दीर्घलेख. तर, सहा देशी प्रवास म्हणजे पन्हाळा भेट, पुन्हा कोकणात, वंगनगरी कोलकाता शहर दर्शन, कूर्ग, सहस्रकुंडची निसर्गसहल आणि नांदेड जिल्ह्यातील देगलूरनजीकच्या होट्टल या गावाची सफर असे प्रत्येकी सरासरी दहा-पंधरा पृष्ठांचे लेख.
डॉ. अच्युत बन हे नांदेडस्थित प्रथितयश डायबेटिस अर्थात मधुमेहतज्ज्ञ. बालपणापासून त्यांना पर्यटनाची दांडगी हौस. त्यापेक्षाही मोठी हौस म्हणजे आपले पर्यटनाचे अनुभव शब्दबद्ध करून, त्याचे पुस्तक काढून ते सगळे वाचकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची उर्मी. या उर्मीतूनच त्यांची देशी-परदेशी पर्यटनावर एक-दोन नव्हे, तर चक्क वीसेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी आजवर जगाच्या पाठीवरील पन्नासहून अधिक देशांना भेटी दिल्यात आणि ते सगळे ग्रंथरूपाने वाचकांसमोर मांडलेही आहे. एवढे व्यापक भ्रमण आणि लेखन केलेला असा डॉक्टर खरोखरच दुर्मिळ म्हटला पाहिजे. वैद्यकीय विषयांवरही त्यांनी लेखन केले आहे. शिवाय, आजवर त्यांना विविध पुस्तकांबद्दल अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. ‘बहामा क्रूज’च्या वाचनातून आपल्याला कळतं, की हा सातशेपेक्षा अधिक लहानमोठी बेटे असणारा ‘कॉमनवेल्थ ऑफ बहामाज’ नामक एक देश आहे, ज्याची लोकसंख्या फार तर पाच-दहा लाख आहे. त्याची राजधानी आहे “नासाव’ नावाचे शहर. देश म्हणून स्वतंत्रपणे १९७३ मध्ये हा देश अस्तित्वात आला. पर्यटन व्यवसायातून उत्तम आर्थिक प्रगती केलेला हा देश आहे. डॉ. बन त्यांच्या ‘क्रूज’ म्हणजे सागरसफरीचे जसे वर्णन करतात, तशी पुष्कळ माहिती, भौगोलिक, ऐतिहासिक वगैरे त्यांच्या प्रत्येक लेखातून देतात. त्यासाठीचे आवश्यक तो मूलभूत अभ्यासही ते करतात. त्यामुळे या पुस्तकातील लेख रंजक तर आहेतच, पण ते माहितीपूर्णही आहेत. मनिला, फिलिपाइन्सबद्दलही बहुविध रंजक माहिती आपल्यासमोर ते ठेवतात. पुस्तकात भरपूर रंगीत छायाचित्रांची गुळगुळीत पृष्ठेही दिलेली आहेत. त्याद्वारे त्या त्या स्थळाचा थोडाफार ‘फील’ वाचकांना देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. भारतीय किंवा महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा समावेश त्यांनी पुस्तकात केला आहे, त्यातील उत्तर चालुक्य कालखंडातील म्हणजे साधारण अकराव्या शतकातील हेमाडपंती मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘होट्टल’ गावातील सिद्धेश्वर मंदिराचे, सोमेश्वर मंदिराचे सुरेख फोटो आणि ऐतिहासिक, पौराणिक माहिती मोठी रोचक आहे. नांदेडपासून सुमारे शंभरेएक किलोमीटरवरचे सहस्रकुंड हे ठिकाण आणि तेथील पैनगंगा नदीचा धबधबा त्याच्या चित्रांमुळे लक्षात राहणारा आहे. अन्य स्थळांचीही पार्श्वभूमी आणि त्या स्थळांची वैशिष्ट्ये इत्यादी डॉ. बन नेमकेपणाने मांडतात. थोडक्यात, एखाद्या निरागस बालकाच्या मनातील कुतूहल घेऊन डॉ. बन प्रवास करतात. टिपकागदाप्रमाणे अनेक बारकावे टिपतात. त्यामुळे त्यांची प्रवासवर्णनाची पुस्तके ठराविक ठोकळेबाज पद्धतीची होत नाहीत, तर वाचकांनाही बोट धरून या सर्व स्थळांची सफर घडवतात. सुबोध भाषेत वर्णन करतानाच भरपूर माहितीही देतात. { पुस्तक : आठवणीतील प्रवास {लेखक : डॉ. अच्युत बन, नांदेड {पृष्ठसंख्या : १६० {किंमत : २५० रुपये { प्रकाशक : रजत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर.
{ संपर्क : ९८३४०६६७४७
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.