आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचावेे असे काही:स्त्री आरोग्याचे विवेचन

सुधीर सेवेकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स माजात आरोग्यविषयक जागृती झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे आरोग्याबाबतच्या, औषधोपचाराबाबतच्या पुस्तकांना अलीकडच्या काळात मागणी वाढतेय. त्यातही लेखक नामवंत डॉक्टर-वैद्य असेल, तर त्याच्या पुस्तकांचा खप हमखास मोठा असतो. दुर्दैवाने आरोग्याबाबत उत्तम लिखाण करणारे डॉक्टर लेखक खूप कमी आहेत. निष्णात डॉक्टर जागोजागी आहेत, परंतु सुबोधपणे त्या विषयावर लिहिणारे आणि समाजाला उपयुक्त मार्गदर्शन करणारे लेखक डॉक्टर फार मोजके आहेत. अशा मोजक्या डॉक्टरांपैकी एक नाव म्हणजे डॉ. किशोर अतनूरकर. गेली चाळीसएक वर्षे ते स्त्रीरोगविशेषज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. शिवाय, समाजशास्त्र, सायकोथेरपीचेही उच्चशिक्षण त्यांनी घेतलेे आहे. त्यांच्या लेखणीतून तयार झालेले पुस्तक म्हणजे ‘तिच्या आरोग्यासाठी सर्वकाही’. आपल्या देशात स्त्री आरोग्याबाबत विलक्षण अनास्था आणि हेळसांड आहे, हे सिध्द करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील सुमारे अर्ध्या स्त्री लोकसंख्येचे हिमोग्लोबीनचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. थोडक्यात, स्त्री आरोग्यविषयक समस्या नानाविध आहेत. त्या गुंतागुंतीच्याही आहेत. पुस्तकात एकूण बासष्ट प्रकरणे लेखकाने हाताळली आहेत. त्यात मुलीचा जन्म, तिचे वाढणे, तिचे शरीरशास्त्र यापासून तिचे वयात येतानाचे विविध वैद्यकीय, मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय प्रश्न, लग्न, लैंगिक जीवन, गरोदरपण, गर्भपात यासह केवळ स्त्रियांचे म्हणून असणारे विविध वैद्यकीय प्रश्न आणि आजार, जसे अनियमित पाळी, स्तनांचे विकार, श्वेतपदर, त्वचेवरील अनावश्यक केस, ऋतुसमाप्ती, टेस्ट ट्यूब बेबी, वंध्यत्व असे विषय हाताळले आहेत. प्रत्येक प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सूत्ररूपाने चौकटीत दिलेले आहेत. त्यामुळे सारांशरूपाने तो विषय लगेच लक्षात येतो. लेखकाने त्याची भाषाही जाणीवपूर्वक अत्यंत सुबोध आणि जनसामान्यांना सहज समजेल अशी ठेवलेली आहे. त्यात मेडिकल - टेक्निकल ‘जार्गन्स’ म्हणजे अवघड संज्ञा आणि शब्दांचा प्रयोग टाळलेला आहे. त्यामुळेही पुस्तकाचा सुबोधपणा वाढायला मदत झाली आहे. स्त्रीआरोग्याबाबत असणारे नाना प्रकारचे समज-गैरसमज, अफवा यांचे निराकरण करीत शास्त्रीय सत्य काय आहे, तिकडे लेखकाने वाचकांचे लक्ष वेधले आहे. पालक, नवरा, कुटुंबीय यांनी ‘तिच्या’ आरोग्यासाठी काय केले पाहिजे, त्याचेही मार्गदर्शन केले आहे.

पुस्तक : तिच्या आरोग्यासाठी सर्वकाही लेखक : डॉ. किशोर अतनूरकर पृष्ठसंख्या : ३७५ किंमत : रु. ३२५ प्रकाशन : मनोविकास प्रकाशन, पुणे

थोडक्यात, “स्त्री’पण निभावणे ही सहज सोपी गोष्ट नाही. मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर “स्त्री’पणाला सामोरं जाणं म्हणजे स्त्री म्हणून असलेल्या सहनशक्तीची परीक्षाच असते. वयात येणं, लग्न, गर्भधारणा, मुलांचे जन्म, संततिनियमन, मेनोपॉज या चक्रात अडकलेल्या बाईपणावर अनेक जबाबदाऱ्या निसर्गतःच येत असतात. या सगळ्यांबरोबर गर्भपात, वजनवाढ, मूल न होणं अशा समस्याही आहेतच. आयुष्यातील तीस-चाळीस वर्षे या चक्रात अडकूनही सुदृढ शरीर, सुदृढ मनाची आस बाळगत जगत राहाणं हे स्त्रियांपुढचं मोठं आव्हान ठरतं. स्त्रीच्या आयुष्यातील नाजूक पेचांना समजून घेत, आश्वासक संवाद साधत, तिची वाटचाल सहज व्हावी म्हणून प्रत्येक स्त्रीने वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वाचावं, असं हे पुस्तक आहे. “तिच्या आरोग्यासाठी सर्वकाही’ या प्रस्तुत पुस्तकाला प्रख्यात डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांची प्रस्तावना लाभली आहे.

{ संपर्क : ९७६६५६८२९०