आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Interview With Ravindra Ingle Chawrekar, Sindhu Lipi Ani Bhartiya Bhashancha Itihas

मुलाखत:वैदिक व्यवस्थेशी सातवाहनांचा संबंध नव्हता... रवींद्र इंगळे चावरेकर

एका वर्षापूर्वीलेखक: प्रज्ञा सुधाकर भोसले
  • कॉपी लिंक

रवींद्र इंगळे चावरेकर संशोधित 'सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास' या हस्ताक्षर प्रकाशन गृहाकडून प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच चावरेकरांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्या मुलाखतीचा वृत्तांत...

रवींद्र इंगळे चावरेकर लिखित ‘सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास’ हा लिपी आणि भाषेच्या इतिहासाची पुनर्मांडणी करणारा ग्रंथ हस्ताक्षर प्रकाशन गृहामार्फत अलीकडेच प्रकाशित झाला आहे. ‘ब्लॅक इंडिया मीडिया’च्या फेसबुक पेजतर्फे या ग्रंथावर आधारित चावरेकर यांची नुकतीच लाईव्ह मुलाखत घेण्यात आली. चावरेकरांच्या संशोधनाची ओळख होण्यासाठी आणि सांस्कृतिक चळवळीला हातभार लावण्याच्या उद्देशाने ही मुलाखत घेण्यात आली. भारत पाटील, प्रज्ञा सुधाकर भोसले आणि साक्य नितीन यांनी चावरेकरांना बोलते केले.

रवींद्र इंगळे चावरेकर यांची ओळख प्रामुख्याने कवी म्हणून असली तरी त्यांनी अनेक साहित्यप्रकारांमध्ये लीलया मुशाफिरी केली आहे. त्यांची लीळा तिसऱ्याच्या आणि इतर कविता, ग्लोबलोपनिषद, नास्तिक प्रार्थना, थेर (ड्याच्या) गाथा, आवाज-ए-मुखलिसी (उर्दू गजल) असे कवितासंग्रह आणि पिंडस्पर्श, सब भूमी गोपालकी, नाटेवा न्नसंप्र, अर्थान्तरण्यास, हाफब्लड फॅमिली, शिवस्वरठ्ठ जातक अशी नाटके प्रसिद्ध आहेत. तसेच तन्बडन मिश्र कक्ष, जाचक कथा या एकांकिकाचे लेखनही त्यांनी केले आहे. या सर्व लेखनासोबतच भाषा आणि लिपी संदर्भातील चावरेकर यांचे बृहद कार्य महत्त्वपूर्ण ठरते. त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या मुलाखतीतून वैदिकीकरणाने सिंधुकालीन भाषेवर मिळवलेले वर्चस्व आणि त्यातून बहुजनांच्या भाषेच्या दडपलेल्या इतिहासाचा या ग्रंथाच्या माध्यमातून उलगडा होतो.

संशोधनाच्या विस्तृत पटासंदर्भात व प्रवासाबद्दल बोलताना चावरेकर सर म्हणतात, ‘भाषेचा शिक्षक म्हणून मराठी भाषेचा विचार करताना असं लक्षात आलं की, अभ्यासक्रमातील वर्गात शिकवायच्या भाषेचा आरंभ बाराव्या शतकापासून आहे. हे असंच शिकवलं जात होतं आणि तेच ते बिंबवलं जात होतं. मग मला सतत असे प्रश्न पडायचे की, एखादी भाषा तिच्या जन्मकाळातच किंवा जन्मानंतरच्या काही वर्षांतच भावार्थदीपिका, लीळाचरित्रसारखे श्रेष्ठ ग्रंथ, तसेच संत साहित्यासारखं वाङ्मय कसं निर्माण करू शकते? अशा स्वरूपाच्या वाङ्मय कलाकृती निर्माण होण्यासाठी त्या भाषेला खूप प्राचीन परंपरा असली पाहिजे, तिचा मोठा विकास असला पाहिजे, मग विकासाचा शोध घेताना मागेमागे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली. भाषेच्या शोधाची ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा असं लक्षात आलं की, १२ व्या शतकामध्ये साधारण दोन वेगळे प्रवाह आपल्याकडे दिसतात. त्यात एक महानुभावांचा प्रवाह आहे आणि एक वारकऱ्यांचा, वैष्णवांचा प्रवाह आहे. तसेच या दोन्हींच्या भाषांमध्ये फरक आहे. हे लक्षात आल्यानंतर ही सगळी खोलात जाण्याची प्रक्रिया आरंभ झाली. या प्रवाहातील महानुभावांच्या भाषेकडे एकूणच दुर्लक्ष झालं आहे. त्या भाषेचा विचार अधिक खोलात जाऊन करायला सुरुवात केली. त्याची नाळ जोडत जोडत ती अशोकापासून ते सिंधूकाळापर्यंत जाऊन मिळाली. अशा स्वरूपात हा सगळा प्रकल्प सुरू झाला.’ सातवाहन कुळाबाबत केले जाणारे वेगवेगळे दावे आणि सातवाहन हे मूळचे कोण होते या संदर्भात विवेचन करणाऱ्या चावरेकरांच्या मतानुसार सातवाहन असे त्यांचे नाव नसून ते सातकणिस आहे. पुरातत्त्वाच्या आधारे सातवाहनांचा शोध घेतला तर लक्षात येतं की त्यांच्या नाण्यांवर जहाज, बैल, बोधिवृक्ष, सिंह, हत्ती, स्वस्तिक, पर्वत ही चिन्हे अंकित आहेत, याच्याशिवाय त्यांचं कूळ सातकणिस आहे. तसेच ते स्वतःला मारहर असे म्हणून घेतात. 'अंगीय कुलीन महारठ्ठीय' अशी पोच त्यांच्या नाण्यांवर आपल्याला दिसते. म्हणजेच की मारवंशीय माणसाने हे घडवले आहे, असे त्या नाण्यांवरून स्पष्ट होते. म्हणून सातवाहनांचा विचार केला तर एकूणच सिंधुकालीन लिपीतील मुद्रांच्या वाचनामधून कणिसाचे काही संदर्भ सापडतात. त्यानुसार ते महाराष्ट्रातील फार जुने, सत्ताधारी राजघराण्यातील लोक होते, असे म्हणता येते. त्यांच्या शिलालेखांची, नाण्यांची तपासणी केली. शिवाय सातवाहनांमध्ये मातृप्रधानता आहे. ते आईच्या नावावरून नावं ठेवताना दिसतात. या सर्व बाबींचा विचार करता सातवाहनानांचा वैदिकांशी काहीच संबंध जुळत नाही. पण कागदोपत्रीमात्र वैदिक व्यवस्था या सातवाहनांपैकी अनेकांना काही उपाध्या देते. परंतु जर या उपाध्या खऱ्या असत्या तर त्यांचे नाण्यांवर, शिलालेखांवर काही उल्लेख असते. पण असं आपल्याला कुठेही सातवाहनांच्याबाबत आढळत नाही. सातवाहन हे सत्ताधारी लोक होते, आणि धम्मकाळात ते बौद्ध धर्मीय होते, असा त्याचा सरळसरळ अर्थ त्यांच्या पुरातत्त्वातून निघतो. त्यामुळे चावरेकर वैदिक व्यवस्थेशी सातवाहनांचा संबंध मानत नाहीत.

आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासन स्तरावरून बरेच प्रयत्न चाललेले दिसतात परंतु अद्याप तरी तो मिळाला नाही. शासन कुठे कमी पडले? या प्रश्नाच्या उत्तरादाखल चावरेकर शासनाकडे मराठी भाषेची प्राचीनता सिद्ध करण्यासाठी पुराव्यांचा तुटवडा असल्याचे दिसते, असे मत नोंदवतात. परंतु चावरेकर सरांच्या ग्रंथातून अनेक पुरावे हाताशी लागतात. त्या संदर्भात चावरेकर सर म्हणतात की, मराठी भाषेच्या मुळाशी दोन भाषा आहेत. पहिली माहाराष्ट्री आणि दुसरी मारहरठ्ठी भाषा आहे. आजच्या काळात मराठी भाषेचा जो इतिहास प्रस्थापित झाला आहे, तो १२ व्या शतकाच्या मागे पोहचवता येत नाही. फारतर आपण ९ व्या शतकापर्यंत म्हणजेच श्रवणबेळगोळच्या शिलालेखापर्यंत जातो. आपण भाषेच्या विकासामध्ये महानुभावांचा भाषिक प्रवाह पूर्णतः दुर्लक्षित केला आहे. त्या अंगाने जर आपण मागे गेलो तर ही भाषा अशोकाच्या शिलालेखाशी कशी कनेक्ट होते, अशोकाचे शिलालेख हे पुन्हा बुद्धाच्या भाषेशी कसे कनेक्ट होतात आणि बुद्धाची भाषा ही सिंधूपर्यंत कशी पोहचते, हे सोदाहरण ग्रंथातून दाखवून दिले आहे. जर महाराष्ट्र शासनाने माहाराष्ट्री भाषेला बाजूला करून मारहरठ्ठी भाषेचा प्रवाह हा खरा प्रवाह आहे असे स्वीकारून त्याला प्रस्थापित केले तर मराठी भाषेच्या प्राचीनतेचा मुद्दा सिद्ध होऊ शकतो आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकतो.

एकूणच या ग्रंथातून आणि मुलाखतीतून भाषा आणि लिपींच्या ऐतिहासिक रूपापासून ते आजच्या व्याकरणात अडकलेल्या प्रमाणभाषेपर्यंतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. मुलाखतीत सहभागी असलेल्या प्रश्नकर्त्यांव्यतिरिक्त फेसबुकवर लाईव्ह मुलाखत ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरेही सरांनी सविस्तर दिली. सदर मुलाखत दीड तास चालली. हस्ताक्षर प्रकाशन गृहाचे विनायक येवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

pradnyabhosale236@gmail.com

बातम्या आणखी आहेत...