आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Investment In Generic Drugs Is Needed To Compete With Patent Drugs| Article By Swapnil Soni

यंग इंडिया:पेटंट औषधांशी स्पर्धा करण्यासाठी जेनेरिक औषधांत गुंतवणूक गरजेची

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य हा कोणत्याही देशाच्या मानव विकास निर्देशांकाच्या (एचडीआय) मध्यवर्ती स्तंभांपैकी एक आहे, तो त्या देशाची समृद्धी सांगतो. आरोग्य ही केवळ व्यक्तीची मूलभूत गरज नसून राष्ट्रासाठी मानवी भांडवलाचा अविभाज्य भाग आहे. हे पाहता, प्रत्येक राष्ट्राचे ध्येय आपल्या नागरिकांना स्वस्त दरात चांगली आरोग्यसेवा प्रदान करणे हे आहे. ‘जन औषधी प्रकल्प’ हा भारतातील परवडणारी आणि सुलभ आरोग्यसेवा सुलभ करण्यासाठी असाच एक उपक्रम आहे. भारत ही सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. असे असूनही आरोग्यसेवेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद ३%पेक्षा कमी आहे. देशातील सुमारे एकतृतीयांश लोकसंख्या आरोग्य विम्यापासून वंचित आहे. प्रचलित आजार आणि महामारीच्या प्रादुर्भावामुळे परिस्थितीचे धोके वाढतात. या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन आरोग्यसेवा नागरिकांना परवडणारी बनवणे महत्त्वाचे आहे. औषधे आणि शस्त्रक्रिया उपकरणे हा आरोग्य सुविधांचा प्रमुख भाग आहे. त्यांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्याने आरोग्य सेवेतील एक मोठी समस्या सुटते. यामुळे ‘जनऔषधी’ उपक्रम खऱ्या अर्थाने ‘लोकोपयोगी’ ठरतो.

खासगीकरण, बाजारातील स्पर्धा आणि फार्मा उद्योगातील फायदे यामुळे पेटंट औषधांनी जेनेरिक औषधांवर कब्जा केला आहे. परिणामी सर्वसामान्यांना मूलभूत आरोग्य सुविधांसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. परवडणारी औषधे उपलब्ध करून देण्यासोबतच जन औषधी प्रकल्प फार्मा क्षेत्रातील मानव संसाधनांसाठी रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देतो. वाढती व वृद्ध लोकसंख्या आणि महामारीची भीती लक्षात घेता, या उपक्रमाला त्याच्या स्थिरतेसाठी आणि विकासासाठी चालना देण्याची गरज आहे. यासाठी खालील मुद्दे सर्वात महत्त्वाचे आहेत. प्रथम, जनऔषधी केंद्रांचा आवाका वाढवणे. दुसरे, जनऔषधी योजनेचा प्रचार. तिसरे, वाढती महागाई व पुरवठा खर्च असूनही जेनेरिक औषधांच्या किमती परवडणाऱ्या दरात राखणे. जनऔषधी केंद्राचा आवाका वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा व आर्थिक मदत हवी. शिवाय, अधिकाधिक खासगी कंपन्यांच्या स्पर्धात्मक सहभागासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलचा विचार करावा.

जनऔषधी केंद्राबाबत जनजागृतीसाठी स्थानिक रुग्णालये, डॉक्टरांचे सहकार्य आवश्यक आहे. जाहिरातीव्यतिरिक्त जेनेरिक औषधांच्या परिणामकारकतेवर स्थानिक लोकांचा विश्वास निर्माण करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. रुग्णाचा जाहिरातींतील तपशिलापेक्षा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर जास्त विश्वास असतो. शेवटी, महागाईपासून बचाव करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांसाठी परवडणाऱ्या किमती राखण्यासाठी पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यामध्ये प्रामुख्याने औषधांचे संशोधन आणि विकास यांचा समावेश आहे, जेणेकरून जेनेरिक औषधांची परिणामकारकता कमी किमतीत पेटंट औषधांच्या बरोबरीने आणता येईल. उत्पादन, गोदामे आणि पुरवठा साखळीतील कार्यक्षमतेमुळे इनपुट खर्च कमी होण्यास मदत होईल आणि त्यामुळे भागधारकांच्या फायद्यांशी तडजोड न करता परवडणाऱ्या किमती राखण्यात मदत होईल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) डॉ स्वप्निल सोनी संशोधक, भारतीय विज्ञान संस्था swapnilsoniiisc@gmail.com

बातम्या आणखी आहेत...