आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष संपादकीय:अजिंक्य औरंगाबाद, अभेद्य औरंगाबाद! -

औरंगाबाद23 दिवसांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक
  • या प्रवासात यापुढेही आपण सोबत आहोत, एवढीच ग्वाही या निमित्ताने!

होय! हे तुम्ही करू शकता. ही वेळ आहे, आपणच या शहराचे नेतृत्व करण्याची. इथला सामान्य माणूस लढाऊ आहे. हे शहरच लढाऊ आहे. इथल्या सर्वसामान्य माणसाने हा लढा उभा केला, तर चारशे वर्षांचा वारसा सांगणारे हे शहर भविष्यासाठीही सिद्ध होईल, यात शंका नाही. त्यासाठी ‘दिव्य मराठी’ तुमच्यासोबत आहे. आपण लढूया. आज आमचे वय दहा आहे. नव्या दशकात आम्ही आज प्रवेश करत आहोत. तुमच्यामुळे आम्हाला मिळालेले बळ प्रचंड आहे. येणारी दहा वर्षे कशी असतील, हे आपण ठरवू शकतो. आपण सोबत असू तर अशक्य असे काहीच नाही. आपण पुन्हा घडवू उद्याचं अजिंक्य आणि अभेद्य औरंगाबाद.

औरंगाबाद. चार शतकांचा वारसा लाभलेले बुलंद शहर. या शहरात ‘भास्कर’ वृत्तपत्रसमूहाने प्रवेश केला तो दहा वर्षांपूर्वी. देशातल्या सर्वात मोठ्या आणि जगातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या अशा वृत्तपत्रसमूहाने महाराष्ट्रात औरंगाबादेतून प्रवेश करावा, याचे तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते. पण, एकेकाळी देशाची राजधानी असलेल्या औरंगाबादचे ऐतिहासिक महत्त्व आणि भविष्यकालीन मोल आम्हाला उमगले होते. त्यामुळेच आम्ही औरंगाबादला मुख्यालय मानत, एका नव्या पत्रकारितेचा प्रारंभ महाराष्ट्रात केला. गेल्या दहा वर्षांचा लेखाजोखा मांडताना हे तर स्पष्टच आहे की, आमचा तो निर्णय अगदी बरोबर होता!

गेल्या दहा वर्षांत ‘दिव्य मराठी’ने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याचे मुख्य कारण आहे, ते म्हणजे औरंगाबादचे व्यक्तिमत्त्व. या शहराने आणि एकूणच मराठवाड्याने नेहमीच प्रस्थापितांना हादरा दिला आणि परिवर्तनाचा आवाज बुलंद केला. त्यामुळे ‘दिव्य मराठी’चे इथे जोरदार स्वागत झाले. आणि, त्याच दमदारपणे आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो. इथल्या सर्वसामान्य माणसाचा आवाज झालो. मराठवाड्यासोबत नाशिक, जळगावसह उत्तर महाराष्ट्र; सोलापूर, नगरसह पश्चिम महाराष्ट्र; अकोला-अमरावतीसह विदर्भ असे सर्वदूर पोहोचलो. ‘दिव्य मराठी’च्या या प्रवासाला आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत. एक दशक संपले. नव्या दशकात आम्ही प्रवेश करत आहोत.

दहा वर्षांपूर्वी औरंगाबादेत आलो, तेव्हाच आम्हाला या शहराचे वेगळेपण जाणवले होते. औरंगाबादला कोणता धर्म नाही. जात नाही. हे माणसांचे गाव आहे. खराखुरा ‘मेल्टिंग पॉट’आहे. ‘आयडिया ऑफ इंडिया’ जगणारे हे शहर आहे. तुम्ही हिंदू असाल वा मुस्लिम, बौद्ध वा जैन, हे शहर प्रत्येकाला सामावून तर घेतेच. पण, प्रत्येकाला हे शहर अगदी आपले वाटावे, असे भावनिक बळही देते. त्यामुळेच मराठवाड्याने ‘दिव्य मराठी’ला आपले मानले. वाचक हाच केंद्रबिंदू मानणारी ‘दिव्य मराठी’ची पत्रकारिता. व्यवस्था कोणतीही असो, सर्वसामान्य माणसांसाठी व्यवस्थेला जाब विचारणारी पत्रकारिता. कोणत्याही राजकीय पक्षाशी नाते न सांगता, सामान्य माणसाशी स्वतःला जोडून घेणारी पत्रकारिता. आम्ही ज्याला केंद्रबिंदू मानतो, त्या वाचकांनी या परिवर्तनाचे स्वागत केले. आणि, मग गेल्या दहा वर्षांत जे घडले, ते सगळ्यांच्या समोर आहे.

‘आता चालेल तुमची मर्जी’ हे आश्वासन सामान्य माणसाला देत ‘दिव्य मराठी’ने पत्रकारितेचे मापदंड बदलून टाकले. कुमार केतकर, अभिलाष खांडेकर, प्रशांत दीक्षित अशा संपादकांनी ‘दिव्य मराठी’ची राज्याची धुरा यापूर्वी सांभाळली आहे. माहितीच्या स्फोटानंतर माध्यमांचे स्वरूप बदलले. पत्रकारितेची प्रतिमाही बदलत गेली. अशा वेळी ‘दिव्य मराठी’ने मात्र माणसांना केंद्रबिंदू मानण्याचे आपले व्रत आजवर कधी सोडले नाही. आज ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्यापही सुरू असताना, ‘भास्कर’ने आपल्या पत्रकारितेने जगभर नवे मापदंड निर्माण केले आहेत.

‘दिव्य मराठी’च्या या वाटचालीत औरंगाबादचा वाटा मोठा आहे. हेच ते औरंगाबाद, जिथे ‘दिव्य मराठी’ने आवाहन केले आणि २० हजार रातरागिणी अंधारावर मात करत रस्त्यावर उतरल्या. हेच ते औरंगाबाद, जिथे ‘येस, वी कॅन’चा नारा देत औरंगाबादच्या भविष्यासाठी नव्या वाटा दिसू लागल्या. हेच ते औरंगाबाद, जिथे प्रशासनाने आमच्या विरोधात खटले दाखल केले. आमचा गुन्हा काय होता? सामान्य माणसासाठी आम्ही उभे राहिलो. ‘कोरोना’ हाताळताना होणाऱ्या चुकांबद्दल बोललो. सामान्य माणसाचा आवाज झालो. हा अपराध असेल, तर ‘असा गुन्हा करू पुन्हा पुन्हा’ अशी भूमिका आम्ही घेतली.

याचा परिणाम असा झाला की, न्यायालयानेही आमचीच भूमिका मान्य करत प्रशासनाला खडे बोल सुनावले. व्यवस्था हलली. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्याच्या दिशेने सुरुवात झाली. आजही ही लढाई संपलेली नाही. पण, आता निराशा संपलेली आहे. पराभवाची भीती संपलेली आहे. ‘कोरोना’वर मात करत लोक उभे ठाकले आहेत. नव्वदीतल्या आजीपासून ते उद्योगांपर्यंत सगळेच आता उभे राहिलेले आहेत. कोरोनामुळे हे शहर ध्वस्त तर झाले नाहीच, उलटपक्षी ‘केला जरी पोत बळेचि खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे’ या आवेशात शहर उभे राहिले आहे. आणि, हेच तर ‘औरंगाबाद’ आहे!

कितीही प्रयत्न करा. हे शहर थांबत नाही. हे शहर हरत नाही. पराभूत होत नाही. माझ्यावर आभाळ जरी कोसळलं तरी कोसळलेल्या आभाळावर मी उभा ठाकेन, असा दुर्दम्य आत्मविश्वास अंगी बाळगणारं शहर आहे हे. हे शहर आहेच अजिंक्य. औरंगाबाद शहराची स्थापनाच मुळी एका लढाईतील विजयातूनच झाली आहे. या जागेवरील लढाईत मलिक अंबर जिंकला आणि फतेह (विजय) मिळालेल्या या पाक (पवित्र) जागेवर शहर वसविण्याचा निर्णय त्याने दरबारींचा, अनेकांचा विरोध पत्करून घेतला. हे फतेहनगर आहे. ही युद्धभूमी आहे. ही विजयभूमी आहे. औरंगाबादचा हा वारसा लक्षात घेतला पाहिजे. या वारशाला धर्म नसतो. या इतिहासाला जात नसते. पण, त्यातून या शहराची जातकुळी समजते.

छत्रपती शिवराय हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत. शिवाजी महाराज नावाच्या तेजस्वी इतिहासाचा मूळ स्रोत शोधायचा तर वेरूळकडे जावे लागते. शिवरायांचे स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेबाने आकाशपाताळ एक केले. रानोमाळ युद्धे करत राहिला. पण, अखेर त्याची समाधीही तुम्हाला इथेच सापडते. इथेच तुम्हाला शारंगदेवांचे संगीत ऐकू येते. राष्ट्रकूटांची राजधानी इथे सापडते. अहिल्यादेवी होळकर या पराक्रमी महाराणीने केलेला घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार दिसतो. पहाडसिंग महाराजांनी बांधलेला सोनेरी महाल भेटतो. कर्णसिंग महाराजांनी उभारलेले कर्णपुरादेवीचे मंदिर दिसते.

असाच इतिहासाचा धांडोळा घेताना, या शहराचे अजिंक्य, अभेद्य रूप नजरेसमोर येते. मलिक अंबरच्या आयुष्याला वळण देणाऱ्या लढाईत अशक्यप्राय असलेला असा मुघलांविरुद्धचा विजय अगदी कमी सैन्य घेऊन मलिक अंबरने मिळविला. हा जश्न मलिक अंबरने फतेहनगर (फतेह म्हणजे विजय मिळवलेले शहर) नावाचे शहर इ.स. १६०४ मध्ये वसवून साजरा केला. प्रथम सैन्य मुख्यालयाचा दर्जा या शहराला मिळाला आणि स्थापन होताच मुर्तुझा निझामशहा व राजपरिवारासाठी राजवाडे बांधले गेले. अशक्यप्राय ते शक्य करणारे विजयी शहर म्हणूनच औरंगाबादची स्थापना झालेली आहे. याची स्मृती आजही भडकल गेटच्या रूपात चिरंतन विजय स्मारक म्हणून अस्तित्वात आहे.

एका हबशी गुलामाने (मलिक अंबर) हे शहर वसवले. या शहराला अगदी स्थापनेपासूनच सर्वधर्मसमभाव, समानता, परिवर्तनवादी, पुरोगामी असा वारसा आहे. अजेय, अजिंक्य राहिलेल्या या प्राचीन व्यापारी मार्गावरील शहराने बंजर, उजाड माळरानावर आपला संसार वसवला. फळवला आणि फुलवला देखील. येथे बारमाही वाहणारी नदी नाही. पर्जन्यमान कमी आहे. पाण्याचा कुठलाही स्रोत नाही. तेव्हा मलिक अंबरने युरोपातील नहरी (भूमिगत पाण्याचे कालवे - पाण्याचा पाझर असलेले) पद्धतीप्रमाणे तत्कालीन फतेहनगर शहरात जटवाड्याच्या डोंगरातून नहर खोदवून पाण्याची समस्या सोडवली होती.

वर्तमानातही या शहराने कमी इतिहास घडवलेला नाही! हैदराबादचा मुक्तिसंग्राम लढणारे हे शहर आहे. याच शहरातील उस्मानिया इंटरमीडियट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात ‘वंदे मातरम’ आंदोलन करून या संग्रामाची सुरुवात केली. त्यांनी पारंपरिक प्रार्थना म्हणण्याऐवजी ‘वंदे मातरम’ म्हटले. विद्यार्थ्यांना कॉलेजातून काढून टाकण्यात आले. हा वणवा मराठवाडाभर व पुढे निझामशासित हैदराबाद संस्थानभर पसरला आणि पोलिस ॲक्शननंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निझामाच्या जोखडातून मुक्त झाला. भारतात सामील झाला. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही संघर्ष करत राहिलेला असा हा मराठवाडा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद कॉलेज स्थापन करून या शहराला कर्मभूमीच मानले होते. त्यांनीच येथे प्रादेशिक विद्यापीठ असावे, हे सुचवले होते. हैदराबाद विधिमंडळात तसा प्रस्तावही दाखल करायला लावला होता.हा प्रवास इथेच थांबत नाही. मुंबई-ठाण्यातील शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी प्रथमच बाहेर, म्हणजे औरंगाबादेत आणली. शाखा स्थापन केली. नंतर मराठवाडाभर आणि पुढे राज्यभर शिवसेनेचा विस्तार होऊन शिवसेना सत्तेत आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. आज खुद्द उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

शरद पवारांनी एस काँग्रेसची स्थापना करताना आणि पुन्हा काँग्रेसमध्ये परतताना औरंगाबादच तर साक्षीदार होते! एआयएमआयएम पक्षालाही सध्याचे खासदार आणि माजी आमदार इम्तियाज जलील यांच्या निमित्ताने राज्यात पहिले यश इथे मिळाले. मराठवाडा विद्यापीठाचे नामविस्तार आंदोलन असो वा दलित पँथर, युक्रांदला मिळालेला प्रतिसाद असो. ही आंदोलनांची भूमी आहे. परिवर्तनाची भूमी आहे. बुद्धाची भूमी आहे. असे हे शहर.

या शहरावर ऐतिहासिक काळापासून अनेक हल्ले झाले, पण मलिक अंबरच्या काळापासून आजपर्यंत अनेक हल्ले या शहराने परतवून लावले. आज हे शहर ‘कोरोना’लाही परतवून लावत आहे! अर्थात, हा वारसा कितीही बुलंद असला, तरी आरसा जे सांगतो आहे, ते नाकारून चालणार नाही. अजिंठा आणि वेरूळ अशी दोन-दोन जागतिक वारसा स्थळं असणारं हे शहर पर्यटनाच्या नकाशावर मात्र अगदी मागं कसं राहिलं? कमालीच्या वेगानं वाढणारं हे शहर असं मागे मागे का सरकत गेलं? आजही या शहराला पाण्याचा प्रश्न भेडसावतो. उद्योगांचे केंद्र होण्यापासून या शहराला कोण रोखतो?

खरं तर, महाराष्ट्रात औरंगाबादसारखं शहर नाही. ज्यासाठी ‘भास्कर’ समूहाने औरंगाबादची निवड केली, त्यासाठीच औरंगाबादला खूप संधी आहेत. मुंबई-पुण्यासारखी शहरे आता वाढीच्या क्षमता गमावून बसलेली असताना, औरंगाबाद हेच उद्याचं शहर असणार आहे. औरंगाबादकडे इतिहास तर आहेच, पण भूगोलही आहे. क्षेत्रफळ आहे. हवाई, रेल्वेसह सर्व कनेक्टिव्हिटीची क्षमता आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा सर्व मोठ्या शहरांपासून हे शहर जवळ आहे. मराठवाड्याची ही राजधानी आहे. पर्यटनाची एवढी संधी देशात कोणत्याच शहराला नाही, जेवढी ती औरंगाबादला आहे. जालन्यासारखी उद्यमनगरी अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे औरंगाबादला भविष्यातलं खूप महत्त्वाचं शहर होण्याची संधी पुन्हा एकदा आहे.

त्यासाठी ही पर्यटनाची राजधानी व्हायला हवी. कारगिलसारख्या दुर्गम भागात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न होतात, तर इथे का नाही? उद्योगाची राजधानी म्हणून घोषणा होते आणि काही उभेही राहते, पण जोवर मोठे प्रकल्प येणार नाहीत, तोवर अशा घोषणांना काही अर्थ नाही. ‘स्मार्ट सिटी’ म्हणायचे, पण प्रत्यक्ष त्यासाठी तरतूद काहीच करायची नाही! औरंगाबाद हे भविष्यातले शहर खरेच, पण आजही ते पाणी आणि रस्ते अशा पायाभूत समस्यांशीच झुंजत असेल, तर त्याचे भविष्य प्रकाशमान कसे असेल? आजवर या शहराला प्रभावी राजकीय नेतृत्व मिळाले नाही, हे खरे. औरंगाबादच्या राजकीय नेत्याकडे मराठवाड्याचे वा राज्याचे नेतृत्व कधी आले नाही, हेही खरे. प्रस्थापितांविरोधी असल्याने तोटे झाले असतीलही कदाचित, पण हीच कारणे किती दिवस उगाळायची? शहरात येऊ घातलेले आयआयएम, अलिगड विद्यापीठ, ॲमिटी विद्यापीठ आणि ‘साई’चे विभागीय केंद्र गेले. असे का घडते?

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी नितीन गडकरी यांनी चार वर्षांपूर्वी ‘स्कायबस’ सुरू करण्याची घोषणा केली होती. त्याचा ‘डीपीआर’ करण्यासाठी एका संस्थेची निवड करण्यात आली होती. हे काम पूर्णत्वास कधी जाणार? २०५० चे व्हिजन ठेवून जालना-औरंगाबादला जोडणाऱ्या मेट्रो किंवा मोनोरेलचे काम होणार की नाही? औरंगाबाद ही म्हणायला पर्यटन राजधानी असली तरी येथे तशा सुविधा नाहीत. एकही आंतरराष्ट्रीय विमान नाही. कस्टम आणि एक्साइजसारख्या तांत्रिक बाबींमुळे आंतरराष्ट्रीय विमाने सुरू होण्यात अडसर येते. जेद्दाहला जाणाऱ्या हजच्या विमानाच्या वेळी ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली जाते. मग कायमस्वरूपी अशी सेवा का नाही? रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, आधुनिकीकरण का होत नाही?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कोण देणार? आता, वेळ आली आहे, ‘आम्ही औरंगाबादचे लोक’ म्हणून या लढाईत उतरण्याची. शहराची नावं बदलून काही होत नाही. भावनिक उमाळे खूप झाले. धार्मिक मारामाऱ्या भरपूर झाल्या. आता मुद्दा आहे शहराचा आजचा चेहरा बदलण्याचा. दोस्तो, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। आणि, हे तुम्ही करू शकता. ही वेळ आहे, आपणच या शहराचे नेतृत्व करण्याची. इथला सामान्य माणूस लढाऊ आहे. हे शहरच लढाऊ आहे. त्याने हा लढा उभा केला, तर चारशे वर्षांचा वारसा सांगणारे हे शहर भविष्यासाठीही सिद्ध होईल, यात शंका नाही.त्यासाठी ‘दिव्य मराठी’ तुमच्यासोबत आहे. आपण लढूया. आज आमचे वय दहा आहे. पण, तुमच्यामुळे आम्हाला मिळालेले बळ प्रचंड आहे. येणारी दहा वर्षे कशी असतील, हे आपण ठरवू शकतो. आपण सोबत असू तर अशक्य असे काहीच नाही. आपण पुन्हा घडवू उद्याचं अजिंक्य आणि अभेद्य औरंगाबाद.

त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आमचे वाचक, सर्व बातमीदार आणि सहकारी, लेखक, वितरक, जाहिरातदार, हितचिंतक यांच्या बळावर इथवर आलो आहोत. हातात हात गुंफून आणखी पुढे जाऊया. शारीरिक अंतर आता ठेवावे लागत असले, तरी भावनिक नाते मात्र घट्ट आहे. ते आणखी घट्ट ठेवूया. स्वतःला जपा. घर सांभाळा. काळजी घ्या, पण काळजी करू नका. ‘कोरोना’ उद्या जाणारच आहे. आपल्याला आणखी भव्य विचार करायचा आहे. दिव्य अशी स्वप्नं पाहायची आहेत. ती स्वप्नं प्रत्यक्षात आणायची आहेत. या प्रवासात यापुढेही आपण सोबत आहोत, एवढीच ग्वाही या निमित्ताने!

संजय आवटे, राज्य संपादक

बातम्या आणखी आहेत...