आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • It Is Not Right To Assume That Only One Family Will Lead | Article By Shashi Tharur

विश्लेषण:केवळ एकच कुटुंब नेतृत्व करेल, असे मानणे योग्य नाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय गुलाब नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर पक्ष अडचणीत आल्याचे अनेकांना वाटते. काँग्रेसमधून सातत्याने नेते बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पक्षासाठी शोक लेख लिहिले जात आहेत. नुकत्याच लागलेल्या निवडणुकीच्या निकालाने निराश झालेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी घसरत आहे. दुसरीकडे सामान्य नागरिक आणि मतदार - ज्यांपैकी २० टक्के काँग्रेसला मतदान करतात - निराश झाले आहेत. दिग्गज नेते अशा प्रकारे पक्ष सोडून गेल्यावर परिस्थिती सोपी होत नाही हे खरे आहे. त्याबद्दल मला वैयक्तिकरीत्या खेद आहे. कारण मला एवढीच इच्छा आहे की माझ्या मित्रांनी पक्षात राहून तो चांगले करण्यासाठी संघर्ष केला असता. मीसुद्धा पक्षात सुधारणा करण्याची मागणी करणारे पत्र लिहिणाऱ्या जी-२३ च्या कथित नेत्यांमध्ये असल्यामुळे मला असे म्हणायचे आहे की, त्या पत्रात व्यक्त केलेली चिंता पक्ष सदस्य आणि हितचिंतकांच्या मनात अनेक महिन्यांपासून होती. आणि त्यांना पक्षात नवी ऊर्जा आणायची होती. ही चिंता पक्षाच्या विचारसरणीची किंवा मूल्यांची नव्हती, तर पक्ष कसा चालवला जात आहे याविषयी होती. आम्हाला पक्षात फूट पाडायची किंवा तो कमकुवत करायचा नाही, तर तो मजबूत करायचा आहे. आज भाजप देशाबाबत जे काही करत आहे, त्याला काँग्रेसने आव्हान द्यावे, अशी आमची इच्छा आहे. आम्ही कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नव्हतो, पण पक्षाच्या समस्यांना तोंड देण्याची पद्धत आम्हाला सुधारायची होती. आज काँग्रेसची अडचण अशी आहे की, अनेक टीकाकारांना ती पत्ता न लिहिलेल्या लिफाफ्यासारखी वाटू लागली आहे.

पण एवढे करूनही तुम्ही काँग्रेसला बरखास्त करू शकत नाही. कारण आज भाजपला राष्ट्रीय पर्यायच नाही. देशातील इतर पक्ष एक किंवा खूप झाल्यास दोन राज्यांपुरते मर्यादित आहेत, तर काँग्रेस हा अखिल भारतीय प्रसार असलेला पक्ष आहे. काँग्रेसच्या विचारसरणीत असलेली समावेशाची भावना देशाच्या लोकशाहीला आज गरजेची आहे. पण भाजपला पर्याय म्हणून काय देऊ शकतो, हे पक्षाला देशासमोर स्पष्ट करावे लागेल. त्याच वेळी, त्याला विलंब न करता आपले भविष्य सुरक्षित करण्याचा मार्गदेखील शोधावा लागेल. आज पक्षात सर्वोच्च स्थानी असलेल्या नेतृत्वाच्या पोकळीचा नकारात्मक परिणाम झाला आहे. काँग्रेस कार्यकारिणीने पक्षाध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक १९ ऑक्टोबरला होणार आहे. कायद्यानुसार कार्यकारिणीच्या डझनभर रिक्त पदांसाठीही निवडणुका जाहीर व्हायला हव्या होत्या. केंद्र आणि राज्यांतील काँग्रेस समित्यांच्या प्रतिनिधींनी ही महत्त्वाची पदे कोणाकडे ठेवायची हे ठरवले असते, तर त्यातून नेत्यांना कायदेशीरपणा आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे मिळाली असती. मात्र, नव्या अध्यक्षाची निवड हेही काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षात थेरेसा मे यांच्याऐवजी १२ उमेदवारांमध्ये ज्या प्रकारे आघाडीवर येऊन जगाचे लक्ष वेधून घेतले, ते काँग्रेसमध्ये झाले तर देशाचे लक्ष या पक्षाकडे वेधले जाईल. अनेक उमेदवार पुढे येऊन विचारार्थ आपली उमेदवारी पुढे करतील आणि पक्ष व देशासाठी आपला दृष्टिकोन सांगतील, अशी मला आशा आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने आणि गांधी घराण्यातील एकाही सदस्याने त्यांची जागा घेऊ नये, असे म्हटल्याने काँग्रेसच्या अनेक समर्थकांची निराशा झाली आहे. या प्रकरणाचा निर्णय गांधी घराण्याने घ्यायचा आहे, परंतु लोकशाहीत कोणत्याही पक्षाने स्वत:ला अशा स्थितीत नेऊ नये की, एकच कुटुंब त्याचे नेतृत्व करू शकते. एक मुक्त आणि निःपक्ष निवडणूक हा परिस्थिती व्यवस्थित करण्याचा योग्य मार्ग असेल. पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे धोरण आखताना देशासमोर नवा अजेंडा ठेवू शकेल, असे मार्गदर्शन एखाद्या नेत्याने करावे, अशी पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे. नेतृत्वाच्या सध्याच्या संकटाचा शेवट झाल्यास कार्यकर्त्यांना आपल्या भावना श्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात मदत होईल आणि ते त्यांच्या भावना सामान्यांपर्यंत पोहोचवू शकतील. काँग्रेस या काळोखातून बाहेर पडेल, अशी मला खात्री आहे. काँग्रेससाठी आणि देशासाठीही ती एक नवी पहाट असेल, जिचे पुन्हा नेतृत्व करण्याची आशा आम्ही बाळगून आहोत.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

शशी थरूर माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार office@tharoor.in

बातम्या आणखी आहेत...