आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • It's Not Easy To Become A Tree..to Be Rooted In The Soil..| Artical By Priyanka Satpute

कशासाठी ? फोटोसाठी..!:सोपं नसतं झाड होणं..मातीमध्ये रुजून येणं..

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी बसमधून प्रवास तसा लहानपणापासूनच. आई बाहेरगावी नोकरीला असल्यामुळे मी तिच्याबरोबरच असायचे. त्यातही खिडकीजवळ जागा मिळाली की आनंद व्हायचा. प्रवास सुरू झाला की खिडकीतून बाहेर पाहत राहणं माझा छंद. आपण पुढे जात असताना मागे पळणारी झाडंझुडपं, डोंगर, मोठमोठे दगड, जनावरं, शेतात कष्ट करणारी माणसं पाहणं खूप आवडायचं. विशेषत: मोठमोठ्या आकाराची झाडं त्यांच्या फांद्यांचे वेगवेगळे, आकार यांनी तर लहानपणापासून ते आजतागायत माझ्यावर खूप भुरळ घातलेली आहे. त्याचं आणि माझं काहीतरी नातं आहे. असं सारखं वाटत राहतं. अनेकदा झाड आणि त्यांच्या फांद्या या रेखा-चित्रकार ‌श्रीधर अंभोरे यांनी रेखाटलेली झाडं, फांद्या आणि पानं यांची आठवण करून देतात. त्यांनी रेखाटलेल्या झाडांच्या रेखाटनात लयबद्धता, गतिशीलता, नादमयता तसेच मानवी जगाचं मूल्य जसं दिसतं तसंच बसच्या खिडकीतून डोकावताना, प्रत्येक झाडात काही ना काहीतरी वेगळं दिसतं आणि विचार करायला लावतं.

आता सहसा एसटी बसमधून प्रवास होत नाही. कधी झालाच तर रस्त्यावर आता पूर्वीसारखी झाडं दिसत नाही. आता दिसतात ती हॉटेल, ढाबे आणि डेकोरेशनची कृत्रिम झाडं, मग ही झाडं गेली कुठं ? प्रवास करताना असंच एक झाड दिसलं. त्याची लांब गेलेली फांदी ही कुणाला आधार देत आहे की आधार मागत आहे? मला समजत नव्हतं तरीही त्याच्या डौलदार फांद्या निसर्गसौंदर्यात भर घालताना दिसल्या नि मी फोटो क्लिक केला. मला जाता जाता श्याम खामकर यांच्या कवितेतील चार ओळी आठवल्या. त्यात ते झाडांबद्दल म्हणतात- ‘सूर्य डोई घ्यावा लागतो, तशात कोणी सावली मागतो । बसेल त्याला झुळूकभर, वारासुद्धा द्यावा लागतो ॥ सोपं नसतं मागेल त्याला, मागेल ते ते देत जाणं । सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं ॥’

प्रियंका सातपुते संपर्क : ७३८५३७८८५६

बातम्या आणखी आहेत...