आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित:वासाचा पयला पावशे आयला...

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय पाऊस... बस्स एवढंच लिहावंसं वाटत मला तुला हाक मारताना...कारण तो एकच शब्द योग्य वाटतो तुझ्यासाठी. अचानक आभाळ भरून यावं आणि तुझे दरवळ सरींसोबत बरसावेत..मी सचैल भिजावे त्या दरवळांत. अशा वेळी बाकी शब्द कोरडे वाटतात मला. तू झरतोस मनात..कानात मियाँ की मल्हार लहरावा तसा. असं कधी झालं ना, की मी ऐकत राहते झिरमिरत्या स्वरांतलं एखादं गाणं, जे मला आठवण करून देतं सकाळच्या ओथंबलेल्या दवाची..मी अडखळते, हरवून जाते त्या शब्दांत अन् त्याच वेळी कौशिकी गात असते, ‘याद पियाकी आये...’ खरं सांगू तुझी आठवण या गाण्याशी जोडली गेलीय की हे गाणं तुझ्या आठवणीशी, हे नाहीच समजत मला. पण तुझ्या आठवणीसाठी हे गाण मस्ट आहे.. बघ पुन्हा भरकटले मी. तुला पाऊस म्हणता म्हणता मी आठवणींमधे रमले. हे असंच होतं नेहमी.. आणि नेहमीचीच ही भरकट.. अरे, तापलेल्या ओढाळ मनाला एक फुंकर हवी असतेच ना?

मला वाटतं, तू हरवू नयेस म्हणून मीच तुला डोळ्यांमधे लपवून ठेवलंय की काय? तसं असेल तर खरंच उमलून ये माझ्या डोळ्यांत एखादं मंद सुवासाचं स्वप्न होऊन. मी मग रुजवेन, सजवेन, तुला मनाच्या अंगणात.. ए..पण तू पाऊस बनून खरंच ये एकदा..तुझ्या दरवळांची लिपी गिरवताना मी तुलाही गिरवेन धुक्याच्या पदरात लपवून, जांभळरानातल्या ओल्या गंधाळवाऱ्यासारखं.. मी मनातल्या उमलणाऱ्या चाफ्याचे भाव उजळून घेते जेव्हा तू सावळ्या रूपात झिरमिरताना मला चातक बनवतोस. तुला डोळ्यांनी टिपणं हा सोहळा होतो तेव्हा. तावदानावर जमलेली तुझ्या थेंबांची नक्षी मी अंगभर गिरवते..जेव्हा जलगर्भ मेघ मला कालिदासाच्या यक्षाची आठवण करून देतात. तुझे येणे हा एक उमलसण असतो. एक सुगंधसोहळा जो पहिल्या पावसाचा, मातीच्या उन्हाळलेल्या मनानं फुलवलेल्या पहिल्या दरवळाचा अनुभव असतो. मीही न्हाते मग तुझ्या सावळेपणात सचैल धरणी होऊन, अन् गुणगुणते.. ‘वासाचा पयला पावशे आयला..नभाचे घुमड मातीये भारीयेला.. वासाचा पयला..’

तू अचानक येतोस, बरसतोस धुवाधार,ओतप्रोत अन् निघून जातोस.. अतृप्त आस देऊन... तुला ांगू, तेव्हा माझ्यात खरी कविता जन्म घेऊ पाहते. ही पाऊसपेरणी होताना मन भरून येतं.. का माहितीये? कारण माझ्या मनातही पेरला जातो पाऊस तेव्हा. मला सांग, झाडांच्या उंच उंच शेंड्यांवर आहे का रे तुझे घर? या पेरत्या पावसासारखे? की तुलाही शोधावा लागतो आसरा कुठेतरी..शिंपल्यात ..डोहात किंवा डोळ्यात..?

अशाच एखाद्या शांत वेळी आठवणींचे ढग भरून येतात...सोसाट्याच्या वाऱ्यात क्षण इकडून तिकडे बागडत राहतात... हुंदके विजेची भाषा बोलतात..तेव्हा डोळ्यांतून एकेक थेंब पागोळीगत ओघळायला सुरुवात होते...दाटून आलेलं मळभ स्वच्छ होईस्तोवर बरसत राहतात सरी. काही गालावरच्या खळीत लपतात. मला माहितीये तू बघशील त्या थेंबांना तेव्हा नक्की टिपून घेशील अलगद. या सरी तुझीच तर देण आहे माझ्यासाठीची. पापण्या शेवाळण्याइतकी ओल डोळ्यांत जमूच नये कधी. आभाळाची अर्धी जखम भरून येतेच कधी ना कधी. मला सांग तू, मी झरावे की सावरावे हे चांदणे गळण्याआधी?

मानसी चिटणीस संपर्क : ९८८११५२४०७

बातम्या आणखी आहेत...