आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिकोन:आगामी महामारींसाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता कोविड-१९ कमकुवत होण्याच्या आणि संपण्याच्या शक्यता दिसत असताना पुढील जागतिक महामारी कधी येईल आणि भविष्यात कोणते नवीन रोग पसरू शकतात यावर चर्चा सुरू आहे. बिल गेट्स यांच्या नुकत्याच आलेल्या पुस्तकात पुढील जागतिक महामारी २० वर्षांत येऊ शकते, असे भाकीत केले आहे. हा अंदाज खूपच आशादायी आहे, कारण कोविडच्या फक्त ११ वर्षांपूर्वी २००९-१० मध्ये स्वाइन फ्लू एच १ एन १ मुळे महामारी आली होती. आणि आता जाणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर जगात नवीन रोग आणि पुढील महामारी उद्भवण्याची शक्यता आदल्या दिवसापेक्षा जास्त होत आहे. कारणे अनेक आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सूक्ष्म जंतू नवीन परिस्थिती आणि ठिकाणांशी जुळवून घेऊ लागले आहेत. जंगलतोड आणि जंगलातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे नवीन रोगजंतू मानवी संपर्कात येऊ लागले आहेत. त्याच वेळी शहरांमध्ये वाढती गर्दी आणि दाट वस्त्या संसर्ग पसरवण्यास मदत करतात. विमान प्रवासामुळे २४ तासांपेक्षा कमी कालावधीत जगाच्या एका भागातून दुसऱ्या भागात संसर्गाचा प्रसार सुरू झाला आहे. परिणामी, गेल्या काही दशकांत नवीन रोग उदयास आले आहेत आणि जुने रोग पुन्हा वाढू लागले आहेत.

काही दिवसांपूर्वीच ‘नेचर’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात येत्या ५० वर्षांत पृथ्वीच्या तापमानात २ अंशांनी वाढ झाल्यास साथीचे रोग पसरण्याची शक्यता झपाट्याने वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अभ्यासात म्हटले आहे की, तापमान दोन अंशांनी वाढल्यास त्याचा परिणाम मानवांवरच नाही, तर प्राण्यांवरही होईल. अशा परिस्थितीत अनेक वन्य प्राण्यांच्या प्रजातींना नवीन भागात स्थायिक होण्यास भाग पडेल. असे झाल्यास रोग पसरवणारे जंतूही लोकांच्या संपर्कात येतील. २०७० सालापर्यंत प्राण्यांपर्यंत मर्यादित सुमारे १० ते १५ हजार नवीन जंतू (जंतू आणि विषाणू) मानवाच्या संपर्कात येतील. हे सर्व सूक्ष्म जंतू नवीन असल्याने त्यांच्याविरुद्ध मानवाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होईल आणि महामारींची शक्यता वाढेल.

मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहेत, ही गोष्ट सिद्ध झाली आहे. परस्पर संबंधांचा सध्याचा पुरावा कोविड-१९ हाच आहे. एका वैज्ञानिक अंदाजानुसार, दरवर्षी जगभरात १.३ कोटी लोक पर्यावरणीय घटकांमुळे मरत आहेत, ते टाळता येण्यासारखे आहे. असो, यावर घाबरणे हा उपाय नाही. एकत्रितपणे आपण यापैकी अनेक आव्हानांवर मात करू शकतो आणि पुढील महामारीला पुढे ढकलू शकतो. त्यामुळे पर्यावरणाशी छेडछाड न करता स्वतःच्या आणि भावी पिढ्यांसाठी उत्तम आरोग्यासाठी वचनबद्ध होण्याची आज नितांत गरज आहे. यासाठी जंगलातून आणि प्राण्यांपासून माणसांत विषाणू पसरू नयेत, असे प्रयत्न करावे लागतील. हे समजून घेतले पाहिजे की, जंगल तोडले जाते किंवा अंधाधुंद विकासासाठी झाडे तोडली जातात तेव्हा सूक्ष्म जंतू सहजपणे माणसांच्या संपर्कात येतात. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी सरकारांनी घ्यायला हवी. स्वयंपाक व दिवाबत्तीसाठी स्वच्छ ऊर्जेच्या तरतुदीला सरकारने प्राधान्य द्यावे. जागतिक तापमानात होणारी वाढ थांबवून आपण आजार टाळू शकतो आणि जगातील सरकारांनी एकत्रितपणे पावले उचलली पाहिजेत. जंगल, प्राणी आणि माणसांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

इतर कारणांमुळेही महामारी पसरू शकते. प्रत्येक देशाला आवश्यक तयारी ठेवावी लागेल. लस तयार करण्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. रोग आणि जीनोमिक सर्व्हिलन्सची क्षमता अनेक स्तरांवर वाढवावी लागेल. सरकारला सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात विशेषत: आरोग्य कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे वाढवावी लागतील. महामारीच्या तयारीला आपत्तींना तोंड देण्याच्या तयारीशी जोडले पाहिजे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) डॉ. चंद्रकांत लहारिया प्रख्यात डाॅक्टर c.lahariya@gmail.com

बातम्या आणखी आहेत...