आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील:‘प्रिय वाचकहो... हा निरोप आहे, पण अखेर नाही; कधी विचारांचे स्फुल्लिंग चेतले तर पुन्हा भेट होईलच, पण ही शक्यता कमीच’, स्तंभाचा आज शेवट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयप्रकाश चौकसे गेल्या २६ वर्षांपासून ‘भास्कर’मध्ये परदे के पीछे आणि दिव्य मराठीत प्रारंभीपासून “पडद्यामागील’ हा स्तंभ रोज लिहीत आहेत. बऱ्याच दिवसांपासून ते कॅन्सरने आजारी आहेत, पण रुग्णालयात असो किंवा घरी बिछान्यावर, त्यांनी लेखन सोडले नाही. आज सकाळी त्यांनी मला फोन केला की, ‘आतापर्यंत प्रकृती ठीक नसतानाही ‘भास्कर समूहा’च्या कोट्यवधी वाचकांची शक्ती मला ऊर्जा देत होती आणि अनेक अडचणी असूनही मी रोज लिहीत होतो. पण आता हे शक्य नाही. प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे आज मला शेवटचा स्तंभ लिहायची इच्छा आहे.’ चौकसेजी यांची ही भावना आणि २६ वर्षांच्या परिश्रम, सातत्याला सलाम. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो, हीच ईश्वराकडे प्रार्थना . त्यांची जागा भरून काढणे अशक्य आहे. ‘भास्कर’ आणि आमचे वाचक या २६ वर्षांच्या प्रवासासाठी नेहमी कृतज्ञ असतील. त्यामुळे आजचा स्तंभ पहिल्या पानावर. - सुधीर अग्रवाल

दररोज प्रकाशित होणाऱ्या या स्तंभाने आपल्या प्रवासाची २६ वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रवासात आनंद मिळाला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की त्यामुळे मी चांगला माणूस होऊ शकलो. चित्रपट उद्योगात अनेक मित्र झाले आणि काही नाती दीर्घकाळ टिकली. सलीम खान यांनी अडचणीच्या काळात मला आर्थिक मदतही केली. काही नाती तिसऱ्या पिढीपर्यंत टिकली आहेत. आजही रणधीर कपूर, जावेद अख्तर आणि बोनी कपूरशी संवाद होत असतो. कधी-कधी लिहिण्यात माझ्याकडून चूक झाल्यास वाचकांनी माझे लक्ष त्याकडे वेधले. आता विचार प्रक्रिया मंदावली आहे. नाष्टा केला आहे, हेही मी बरेचदा विसरतो. आज मला खूप दु:ख होत आहे की हा माझ्या स्तंभाचा शेवटचा भाग आहे. सुधीर अग्रवाल यांनी जेव्हा मला स्तंभ लिहिण्यास सांगितले होते, तोपर्यंत भारतीय वृत्तपत्रांत मनोरंजनावर फक्त साप्ताहिक मजकूर येत असे. मी स्वत: या स्तंभाच्या आधी ‘भास्कर’साठी १० वर्षे आठवडी स्तंभ लिहिला आहे. ‘भास्कर’ने मला अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. स्तंभ सुरू करताना ‘भास्कर’चे तत्कालीन संपादक श्रवण गर्ग यांनी म्हटले होते की, स्तंभात माहिती, मनोरंजनासोबतच कधी-कधी खूपच सखोल विचार असलेला दार्शनिक मुद्दाही यायला हवा.

आमचे कुटुंब अध्ययन आणि अध्यापन अनेक दशकांपासून करत आहे. माझे वडील संपूर्ण कुटुंबासोबत प्रत्येक नवा चित्रपट पाहण्यासाठी जात असत. त्या काळात चित्रपट पाहणे खूप वाईट मानले जात असे. मी अनेकदा आजारी पडलो आहे, पण रुग्णालयातूनही लिहीत राहिलो. या पूर्ण लेखनप्रवासात माझी पत्नी उषा हिने माझ्यातील त्रुटी दूर केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून माझा मुलगा राजू मला माहिती देत आहे. लहान मुलगा आदित्य तर चित्रपट उद्योगाशीच संबंधित आहे. कधी-कधी वाचकांना माझे विचार आवडले नाहीत, पण ते माझा स्तंभ वाचत राहिले. हा स्तंभ एक मंच झाला. हेमचंद्र पहारे आणि विष्णू खरे हे माझे जुने मित्र, पण याच स्तंभामुळे कुमार अंबुज यांच्यासारख्या विचारवंताशीही माझा परिचय झाला आणि आजही आमच्यातील संवाद कायम आहे. एकदा महाराष्ट्र सरकारने मला पुरस्कार दिला. तेव्हा मंत्र्यांनी सांगितले की, त्यांचा नातू अमेरिकेत असतो. त्याच्या मुलांना हिंदी शिकवण्यासाठी रविवारी एक शिक्षक येतो. त्याने माझे स्तंभ आपल्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवले आणि सोप्या भाषेतही सखोल विचार मांडता येऊ शकतात हे त्यांना सोदाहरण दाखवून दिले. भोपाळच्या रितू पांडेय शर्मा यांनी माझ्यावर ‘जयप्रकाश : परदे के सामने’ हे पुस्तक लिहिले, त्याची खूप प्रशंसा झाली आहे.

हा स्तंभ लिहिल्यामुळे पहल मंच जबलपूर, महात्मा गांधी विद्यापीठ वर्धा इत्यादी अनेक ठिकाणी मला भाषणासाठी निमंत्रित करण्यात आले. या स्तंभानेच मला एक ओळख दिली. माझ्यासाठी हा स्तंभ लिहिणे बंद करणे हे खूपच दु:खद आहे, पण विचार प्रक्रिया मंदावल्यामुळे हे करावे लागत आहे. मी वाचकांची क्षमा मागतो. मला स्वत:लाही दु:ख होत आहे, पण माझा नाइलाज आहे. माझ्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत साहेब यांनी मी नेहरूंवर लिहिलेल्या लेखाबद्दल माझे अभिनंदन केले होते. याच स्तंभामुळे मला छत्तीसगड सरकारने निमंत्रित केले होते. लेखक संजीव बक्षी यांच्याशी माझा परिचय झाला आणि आजही संवाद सुरू आहे. आज दु:ख तर होतच आहे, पण आता जबाबदारी कमी झाली ही मुक्तीची भावनाही आहे. मुक्ती किती भ्रामक असू शकते हे मलाही माहीत आहे. ‘जंजीरों की लंबाई तक ही है सारा सैर-सपाटा। यह जीवन शून्य बटा सन्नाटा है।’ अशा निदा फाजली यांच्या ओळी आहेत, पण मलाही तीच शांतता जाणवत आहे. निदा फाजली जास्त काळ राहिले नाहीत याचे दु:ख आजही मला सलते आहे. पत्रकार राजेंद्र माथूर यांचीही नेहमीच आठवण येते.

जयप्रकाश चौकसे, चित्रपट समीक्षक

बातम्या आणखी आहेत...