आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअसं अनेकदा होतं की एखाद्या कामासाठी तुमची मदत घेतली जाते व ते काम पूर्ण झाल्यानंतर किंवा यशस्वी झाल्यानंतर तुमचा साधा नामोल्लेखही केला जात नाही. कौतुक तर फार दूर राहिले. कधी तर मदत घेणारी व्यक्ती सर्व काही अनभिज्ञपणा दाखवून बाजूला होते. अशावेळी वाईट वाटणे, राग येणे स्वभाविक असते. आपण आपला वेळ त्या कामासाठी उगाचच वाया घालवला असेही वाटून जाते. परंतु अशा प्रसंगाला हसतमुखाने सामोरे जाणे व स्वतःला शांत ठेवणे अत्यंत कठीण असले तरी ते गरजेचे असते. ते काम फक्त तुम्हीच उत्तम करू शकत होतात किंबहुना तुमच्याशिवाय ते काम पूर्ण होऊच शकले नसते म्हणून तुम्हाला निवडले गेले हे स्वतःला समजवावे व काम पूर्णत्वाचा आनंद मनमुरात लुटावा. कामातून मिळणाऱ्या समाधानापुढे बाकी सर्व फिके समजावे. लोक फक्त कामापुरतं गोड बोलतात, सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात हा अनुभव येतोच. मन खट्टू होऊन चिडचिड होऊन, पुन्हा फिरून कोणाला कसली मदत करायचे नाही असा सज्जड दम स्वतःला दिला जातो. परंतु ज्याच्या स्वभावातच कर्म ही पूजे समान असते ती व्यक्ती आपले काम मनापासून केल्याशिवाय राहू शकत नाही. कामाला ईश्वर मानून कामाची पूजा केल्यास त्यातून मिळणारे समाधान हे अनमोल असते. कामाशिवाय जीवन निरर्थक आहे. रिकामे मन नैराश्य,अंधार घेऊन येऊ शकते. कार्यातून मिळणारा आनंद आपल्यालाही शांती ,सुख ,समाधान देऊन जाते. अनेक संत महात्मे, श्रेष्ठ. यशस्वी व्यक्ती या कर्मयोगी होत्या. आपल्या कामाला त्या ईश्वर मानत. निसर्गाकडून शिकावे सक्रियता. कुठलाही मोबदल्याशिवाय आपले काम आनंदाने करत राहणे. निसर्गाचा कितीही गैरफायदा मानवाने घेतला तरी ते आपले कर्म सोडत नाही. सूर्योदय सूर्यास्त नियमित होतात ,झाडे आपले कामे अविरत करतात, कुठलेही मोबदल्या शिवाय. आपल्या कर्माचा बुद्धीशी आणि विचारांशी घनिष्ठ संबंध असतो. कर्मास पूजा म्हणून केल्यास कठीणातील कठीण गोष्ट साध्य करणे शक्य होऊ शकते. कर्म हा सुद्धा मनःशांतीकडे नेणारा एक सुकर मार्ग आहे...
मनीषा चौधरी संपर्क : 9359960429
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.