आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातो आणि त्याचा मित्र नोकरीच्या निमित्ताने शहरात आले. तेथेच स्थिरावले. दसऱ्याच्या दिवशी त्या दोघांची भेट झाली. बोलता बोलता सहज गावाकडच्या गोष्टी निघाल्या, तेव्हा हा म्हणाला, ‘दसऱ्याचे सोने लुटायला आपल्या गावातील सगळे लोक सीमोल्लंघन करायचे. बाबा मलासुद्धा सोबत घ्यायचे, पण पायी चालणे माझ्या खूप जिवावर यायचे. तेव्हा बाबा मला खांद्यावर बसवून घेताना म्हणायचे, ‘बाळा! जरा पायी चालण्याची सवय कर. माणसाने मातीशी नाळ तोडून कसे चालेल? कधीही कुणाला कायमचा आधार मिळत नाही.’ त्यावर त्याचा मित्र म्हणाला, ‘वडीलधारी मंडळींच्या बोलण्याचा अर्थ बालपणी कळत नाही. पण, मोठेपणी त्याचा प्रत्यय येतो.’ त्यावर हा म्हणाला, ‘प्रसंगी खंबीर असलेल्या बापाचे हृदय आतून किती मुलायम असते, याचा प्रत्यय मला अनेकदा आला.’
“कसा काय?’
“मी तिसऱ्या वर्गात असतानाची गोष्ट. रात्रीची वेळ होती. मी वडिलांसोबत जेवायला बसलो. दिवाळी दोन दिवसांवर आली होती. सर्व मित्रांना त्यांच्या पालकांनी नवीन कपडे घेऊन दिले होते. मी जेवताना वडिलांकडे नवीन कपडे घेऊन देण्याचा तगादा लावला.’
“मग?’
“वडील उद्या घेऊन देतो म्हणाले. मी तसाच रागाने ताटावरून उठलो नि बाहेर पडलो. आई-वडील काळजीत पडले. त्यांनी जेवणाची ताटं बाजूला सारली. तितक्या रात्री ते कंदील घेऊन मला गावभर पाहत सुटले. तेव्हा गावात लाइट नव्हते. तब्बल दोन तास त्यांनी माझा शोध घेतला. शेवटी शाळेजवळ त्यांनी मला शोधलंच..! प्रेमाने समजावून घरी आणलं. बाबा मला तेवढ्या रात्री शहरात घेऊन आले. दुकानदार त्यांचा मित्र होता. बंद केलेले दुकान उघडले. बाबांनी चक्क दोन ड्रेस विकत घेतले अन् म्हणाले ‘काय, आता खुश आहेस ना?’ बापाची खरी माया काय असते, हे त्या दिवशी मला कळलं.’
‘शहरात आल्यावर कळते की, भाकरी कमावणे ही मोठी गोष्ट नाही, पण ती कुटुंबासोबत एकत्र बसून खायला मिळणे ही त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे,’ मित्र बोलला...
‘इंटरनेटमुळे जग घरात आलं, पण माणूस माणसापासून दुरावला. आपलेही तसेच आहे. आपण मोठमोठी स्वप्ने घेऊन या शहरात आलो. सर्व स्वप्ने अपुरी राहिली, जिवाभावाची नाती गावातच राहिली.’
त्यावर पहिला खंतावल्या सुरात म्हणाला, ‘एकदम मनातलं बोललास! मी म्हणायचो, शहरात जाऊन दुनिया बदलवून टाकीन. पण, आता कळतंय दुनिया बदलणे तर सोडा, मी साधं भाड्याचं घरदेखील बदलू शकलो नाही.’
‘येथे आल्यावर आपल्याला आपली कुवत समजली. वडिलांच्या कारकीर्दीत ना कशाची भीती, ना कशाची चिंता. आईच्या सहवासात आपलं साम्राज्य असल्याच्या अाविर्भावात जगण्याची मजा काही औरच होती.’
हाच धागा पकडत दुसरा म्हणाला, ‘मलाही तुझ्यासारखंच वाटतं. आपण हक्काचं घर सोडून शहरात आलो, पण आपली आज काय अवस्था आहे? काल एक पुस्तक वाचले. त्यातल्या ओळी आपल्या आयुष्याला तंतोतंत लागू पडतात..
परिंदे भी नहीं रहते, पराये आशियानों में
हमारी उम्र गुजरी है, किराये के मकानों में...
‘खरंय मित्रा.. आपण कितीही मोठे झालो तरी, एवढे मोठे कधीच होणार नाही की, मायबापांची कमतरता भासणार नाही.’
{ संपर्क : anant2khelkar@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.