आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी प्रिंपी राजा येथे कुटुंबासोबत राहते. दोन मुलं आणि आम्ही दोघं असं आमचं कुटुंब. जमिनीचा तुकडा पोट भरण्यासारखा नव्हता. पण, आपली जमीन आहे म्हणल्यावर काम करण्यासाठी हत्तीचं बळ येतं होतं. शेती करुन मोलमजुरीही करावीच लागायची. २०१९ मध्ये कोरोना आला आणि आमचं आख्खं कुटुंब यात होरपळून गेलं. माझे पती पुंडलिक यांचं कोरोना महामारीत २०२० मध्ये निधन झालं. त्या काळात बाहेर जाऊन काही कामही करु शकत नव्हतो आणि शेतातही जाण्याची भीती वाटत होती. पण, संंसाराचा गाडा तर चालवायचा होता. म्हणून पुन्हा नव्या जोमाने उभी राहिले कारण मला माझं दु:ख बाजूला ठेवून मुलांसाठी उभं राहायचं होतं. या दु:खातून सावरत होते ना होते तोच मोठा मुलगा गेला. माझ्यासाठी हे दु:ख खूप मोठं होतं. हातातोंडाशी आलेलं माझं लेकरु अचानक गेलं. मी पार खचून गेले होते. आता घरात मीच कुटुंबप्रमुख असल्यामुळे एका मुलासाठी, त्याच्या शिक्षणासाठी मी पुन्हा निर्धारानं उभी राहिले. जगण्यासाठी फक्त १५ गुंठे जमीन. या १५ गुंठे जमिनीत काय काय पिकवणार? पण, पोटासाठी करावं तर लागणार होतंच. या जमिनीत भाज्यांची शेती करायला सुरूवात केली. मेथी, पालक, वांगी, टोमॅटो अशा भाज्यांचे पीक घेतले आणि गावातल्या गावातच त्याची विक्री केली आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. पण, या भाज्या विक्रीतून तुटपुंजी कमाई होते. आज कुटंुबाचे पोषण या १५ गुंठे जमिनीतून होत नाही म्हणून जोडीला मोलमजुरी करत होते. पण रोजच काम मिळत नव्हते. म्हणून मग आता मुलाला कर्ज काढून पिठाची गिरणी टाकून दिली. तो गिरणी चालवतो, मी शेती करते आणि माझ्या संसाराचा गाडा सांभाळते. आमच्याजवळ १५ गुुंठे का होईना शेती आहे, हेच मला समाधान आहे. या जमिनीतून थोडा फार हातभार लागतो, हे मात्र खरं.
कडूबाई पुंडलिक कोकडे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.