आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Language... The Medium Of Thought Of The Patriarchal Structure | Article By Dr. Nirmala Jadhav

फोर्थ डायमेन्शन:भाषा... पितृसत्ताक रचनेचे विचार माध्यम

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाषा हे मनुष्याने विकसित केलेले संवादाचे अभिनव माध्यम पण, भाषा नावाचं हे संवाद माध्यम बेमालूमपणे अनेकांना बोलते करते तर त्याच वेळेस अनेकांना नीरव, नि:शब्द करतं. एवढेच नाही तर आवाजाची पट्टी, स्वर, सूर, शब्दसंपदा इत्यादी अनेक बाबतीत भाषा भेदाभेदाचं राजकारण खेळताना दिसते. स्त्रीवादी अभ्यासकांच्या मते, भाषा ही अत्याधिक राजकीय असून पुरुषांचे स्त्रियांवरील नियंत्रण हे नामकरण आणि स्त्रिया कधी, कुठे, काय बोलतात यावर लादलेल्या नियंत्रणाशी घट्टपणे जोडलेले असते. अलीकडे झालेल्या अनेक अभ्यासात हे निर्देशित केले गेले आहे की, संभाषाणादरम्यान स्त्री, पुरुषांकडून सहमती दर्शविण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी किंवा दुजोरा देण्यासाठी डोलवलेली मान असेल किंवा ज्याप्रकारे “हूं’ म्हणून आश्वासकता दिली जाते किंवा मध्यस्थी केली जाते त्यात देखील सामाजिक सत्तासंरचना प्रतिबिंबित होत असते. हे सर्व थोडे विचित्र वाटत असले तरी सत्य आहे कारण भाषा हे केवळ संवाद माध्यम नसून महत्त्वपूर्ण सत्ता रचना राहिलेली आहे. या सत्ता रचनेचे सत्ता आधारदेखील अनेक असून त्याचे प्रतिबिंब भाषेच्या स्वरूप, अमल आणि महत्त्व इत्यादीत पडलेले दिसून येते.

साधारणत: जगभरातील सर्वच पितृसत्ताक समुदायातील स्त्री-पुरुषांच्या भाषा आणि संवादाचे निरीक्षण करून भाषाशास्त्रज्ञांनी मांडले की, स्त्रियांच्या आवाजाची पट्टी, सूर, स्वर हे खालच्या पट्टीतील, नम्र, आर्जव, भावानात्मक, समेट व सहकार्याच्या स्वरूपाचे असतात तर पुरुषांच्या आवाजाची पट्टी व स्वर हे वरच्या किंवा चढ्या स्वरूपाचे असून पुरुषांची भाषा ही अधिकाधिक प्रभुत्व, वर्चस्व, अधिकारवाणी, नियंत्रण व आदेशात्मक स्वरूपाची असते. पुरुषांची भाषा आणि बोलणे हे आत्मविश्वासपूर्ण, सल्लेवजा, रुतबा, प्रतिष्ठा आणि अधिकार सूचित करणारे असते तर स्त्रियांची भाषा व बोलणे हे साशंकतापूर्ण, प्रश्नार्थभावी, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठेचा अभाव असणारे असते. स्त्रियांची शब्दसंपदा आणि त्यांच्या संभाषणाचे विषय हे मर्यादित असतात. याउलट पुरुषांची शब्दसंपदा ही व्यापक असते, त्यांच्या संभाषणाचे विषय राजकारणापासून, तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, अध्यात्म ते निसर्ग, बाजार, शेती, नीतिमत्ता असे अनेकाविध असतात. पितृसत्ताक व्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक अशी विभागणी करून स्त्रियांना चूल आणि मूल यात अडकवले जाते. साहजिकच जी त्यांची कार्य, जबाबदाऱ्या आहेत त्याविषयी त्या विचार करत राहणार, बोलणार पण स्त्रियांच्या कामाचे क्षेत्र आणि कामे हेच गौण ठरवले गेल्याने त्यांच्या संभाषण आणि संभाषाणाच्या विषयांना देखील क्षुल्लक व गॉसिपिंग ठरवून त्यावर विनोद व उपहास केला जातो. पुरुष म्हणजे बंधुभाव, शौर्य, मैत्री, विश्वास, साहस, कर्तृत्व तर स्त्रिया म्हणजे सेवा, त्याग, मातृत्व, कणव, सौंदर्य, समर्पण, लज्जा, शालीनता..अशी ही भाषेच्या माध्यमातून मूल्य आणि संकल्पनांची केलेली विभागणी स्त्री-पुरुषांच्या विचार आणि कर्तृत्वाच्या परिघाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करते. ज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रातील पुरुषी वर्चस्वामुळे स्त्री-पुरुषांच्या भाषेतील वरील भेदाचे कारण अगदी सत्तरच्या दशकाच्या मध्यापर्यंत स्त्री-पुरुषांची शारीरिक भिन्नता हे मानले जात होते. रॉबिन लेकॉफसारख्या भाषाशास्त्रज्ञांनी वरील भेदाचे कारण स्त्री-पुरुषांची शारीरिक भिन्नता नसून स्त्री व पुरुष ज्या भिन्न सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात घडवले जातात ती भिन्न सामाजिक-सांस्कृतिक घडण या भिन्नतेस कारणीभूत असल्याचे दाखवून दिले.

सर्वसाधारणपणे प्रमाण म्हणून पुरुषी नाम व सर्वनाम वापरले जातात. उदा. Man is a social animal हे वाक्य सार्वत्रिक असून यात स्त्रियाही आहेत असे गृहीत धरले जाते किंवा Policeman, Fireman, Chairman, Postman सारखे शब्द लिंगभाव निरपेक्ष समजले जातात. पितृसत्ताक समाजात स्त्रियांचे स्थान आणि अस्तित्व हे पुरुषांशी जोडलेले असते आणि त्यामुळे स्त्री विवाहित आहे, अविवाहित आहे, नवरा जिवंत आहे किंवा नाही, मूल आहे किंवा नाही यावरून कुमारी, सौभाग्यवती, विधवा हे शब्द रूढ केले गेले आहेत. पुरुषांचे स्थान हे स्वायत्त, स्वतंत्र असते. तो विवाहित आहे, अविवाहित आहे, बायको जिवंत आहे की मेली आहे, मुलं आहेत की नाहीत या बाबी गैरलागू ठरतात त्यामुळे साधारणत: श्री. किंवा इंग्रजीमध्ये मिस्टर हे नामाभिदान सर्व पुरुषांसाठी वापरले जाते. भाषेच्या रचना आणि वापरातील पुरुषसत्ताक भेदाला स्त्री-पुरुषांच्या शारीरिकता आणि पुरुषी श्रेष्ठत्वाला कारणीभूत समजणाऱ्या भाषाशास्त्रज्ञांच्या मानसिकतेत बदल होऊन आज किमान भाषा ही समाजरचित असून समाजातील विषमता, भेदभाव भाषेतूनही पुनरुत्पादित होत असते हे मान्य केले जात आहे पण, व्यवहारात आजही मोठ्या प्रमाणात विषमतामूलक प्रारुपेच वापरली जात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पर्यायी समतामूलक भाषेच्या वापाराचे तुरळक प्रयत्नदेखील केले जात आहेत. उदा. “चेअरमन’ या शब्दाऐवजी “चेअरपर्सन’ सारखे शब्द वापरले जात आहेत. स्त्रियांसाठी वैवाहिक स्थिती दर्शवणारे Miss वा Mrs. असे न लिहिता सर्व स्त्रियांसाठी Ms. (मिस) एवढेच संबोधन वापरले जात आहे.

भाषा आणि भाषेचा वापर हे सामाजिक, सांस्कृतिक सत्तासोपानाचे फलित असते. त्यामुळे स्त्रियांच्या अनुभव, भावभावना आणि कर्तृत्वाला दुर्लक्षित करणाऱ्या भाषा आणि संवादाची चिकित्सा आणि पुनर्परीक्षण केले गेले पाहिजे. पितृसत्ताक समाजात स्त्रियांना स्वतःच्या शरीर आणि विचारांपासून परात्म करणारी भाषा ही प्रधान यंत्रणा राहिलेली आहे. तिचा पाडाव करून खऱ्या अर्थाने स्वतःच्या सामर्थ्य आणि अस्तित्वाला सकारात्मकतेने बघण्यासाठी हेलेन सेक्सु ही फ्रेंच स्त्रीवादी म्हणते त्याप्रमाणे Write your own body म्हणजे स्वतःच्या शरीर आणि विचाराप्रति निर्माण केलेली नकारात्मकता झुगारुन त्यांच्याशी मुक्त संवाद सुरू केला तरच जाणीव- नेणिवेच्या अबोध कप्प्यात ढकलल्या गेलेल्या अमर्याद ऊर्जेची अनुभूती होऊ शकेल पण, त्यासाठी भाषेच्या माध्यमातून रुजविल्या गेलेल्या विचारांच्या सरधोपट वाटेवरून पायउतार होणे अनिवार्य बनते.

डॉ. निर्मला जाधव संपर्क : nirmalajadhav@gmail.com

बातम्या आणखी आहेत...