आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:सातासमुद्रापारची झेप...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धोंडेवाडी (ता. कराड, जि. सातारा) येथील साक्षी चंद्रकांत पाटील हिचं प्राथमिक शिक्षण मुंबईतील गोरेगाव इथे झालं. त्यानंतर भोपाळ इथल्या एरोनॉटिक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिने आपलं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. भोपाळमध्ये शिक्षणादरम्यान केलेल्या साक्षीच्या डिझाइन संशोधनाची दखल नासाने घेतली आणि साक्षीची नासामधल्या प्रोजेक्टसाठी निवड झाली. नासाने जगातील फक्त १० जणांची या प्रोजेक्टसाठी निवड केली. त्या दहा जणांमध्ये साक्षी ही भारतातील एकमेव आहे. आजन्म समाजसेवेचं व्रत अंगीकारलेल्या स्वातंत्र्यसैनिक स्मृतिशेष आनंदराव पाटील हे साक्षीचे आजोबा. आनंदराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य गावासाठी वाहून दिले होते. साक्षीने केलेल्या विमानाच्या डिझाइन संशोधनाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात येऊन अमेरिकेच्या फ्लोरिडामधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रॉलॉजिकल सायन्स अ‍ॅडव्हान्स स्पेस अ‍कॅडमीत तिने दहा दिवसांचे प्रशिक्षणही घेतले आहे.

आजोबांचा वारसा : जी इच्छा अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छांची पूर्तता होण्यासाठी निश्चय महत्त्वाचा असतो. लहानसहान गोष्टींमधून इच्छाशक्तीला बळकटी मिळते. जेव्हा एखादी गोष्ट जाणीवपूर्वक नित्यनेमाने केली जाते, त्यातून इच्छाशक्ती दृढ होत जाते. याचाच प्रत्यय साताऱ्यातील साक्षीने आणून दिला आहे. मूळ धोंडेवाडी (ता.कराड) गावचे असणारे साक्षीचे कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. तिचे वडील चंद्रकांत पाटील हे व्यवसायासाठी मुंबईत स्थायिक झाले आहेत. तसेच तिचे आजोबा आनंदराव पाटील यांनी गावात शाळेची इमारत स्वखर्चाने बांधून दिली आहे. त्यांच्या निधनानंतर या गावाचे नाव आनंदगाव करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

भोपाळमध्ये शिक्षण सुरू : भोपाळमधील व्हीआयटीमध्ये साक्षी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. तीन वर्षांत केलेले प्रोजेक्ट विचारात घेऊन फ्लोरिडाच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रॉलॉजिकल सायन्स अ‍ॅडव्हान्स स्पेस अ‍कॅडमीने तिची या प्रशिक्षणासाठी निवड केली होती. या प्रशिक्षणामुळे भविष्यात तिला नासामध्ये चांगली संधी मिळू शकते. तिच्या या वाटचालीमध्ये वडील चंद्रकांत पाटील व आई वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे.

कुटुंबीयांसाठी आनंद व सुखद धक्का : साक्षीची प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचा आम्हा सर्वच कुटुंबीयांना आनंद तर झालाच, पण आमच्यासाठी तो सुखद धक्कादेखील होता. आम्हाला अजून विश्वासच बसत नाही की ती या ट्रेनिंगला जाऊन आली आहे. या प्रशिक्षणासाठी निवड झालेली साक्षी ही भारतातील एकमेव मुलगी होती, ही आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब असून तिचा आम्हाला खूप अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया साक्षीचे वडील चंद्रकांत पाटील यांनी दिली. ही प्रतिक्रियाच सर्वकाही सांगून जाते....

विजय मांडके संपर्क : vijaymandake@gmail.com

बातम्या आणखी आहेत...