आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोव्हेंबर महिन्यात मुंबई शहर आणि झारखंड, गुजरात व केरळसारख्या देशातील इतर अनेक राज्यांमध्ये गोवर रोगाचा प्रादुर्भाव आणि सुमारे पंधरा मुलांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी आली. भारत या रोगापासून पूर्णपणे मुक्त होण्याविषयी बोलत आहे आणि २०२३ मध्ये गोवर (आणि रुबेला) रोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे तेव्हा हे घडत आहे. शतकानुशतके गोवर (इंग्रजीमध्ये मिसल्स) आणि कांजण्या (स्मॉल पॉक्स किंवा चिकन पॉक्स) हे लाखो लोकांचा जीव घेणारे दोन आजार आहेत. कांजण्यांची लस १७९८ मध्ये आली आणि १९८० मध्ये कांजण्या जगातून नाहीशा झाल्या. गोवरची लस १९६३ मध्ये विकसित करण्यात आली आणि १९८५ पासून भारतात ती सर्व बालकांना सार्वत्रिक लसीकरण मोहिमेअंतर्गत दिली जात आहे. गोवर ही लहान मुलांना दिली जाणारी सर्वात प्रभावी लस आहे. एखाद्या मुलाला गोवरच्या दोन लसी दिल्या तर रोग होण्याची शक्यता जवळजवळ संपते. मग गोवर का पसरत आहे? खरं तर कोविडच्या सुरुवातीपासून सर्व देशांत नियमित आरोग्य सेवांच्या उपलब्धतेत मोठी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांनी सर्व देशांना इशारा दिला की, गर्भवती महिलांची तपासणी आणि मुलांचे लसीकरण यांसारख्या अत्यावश्यक आरोग्य सेवा चालू ठेवाव्यात आणि कमी होऊ नयेत. पण, बहुतांश देश त्यांच्या आरोग्य सेवेत कोणत्याही प्रकारची शिथिलता आहे हे मान्य करायला तयार नव्हते. २०२१ मध्ये जगभरातील अंदाजे चार कोटी मुलांना गोवरची लस मिळालेली नाही. तथ्य नाकारल्याचा परिणाम आता रोगाच्या प्रसारामध्ये दिसून येत आहे. अनेक देशांमध्ये गोवर पुन्हा उदयास आला आहे. गोवरसारख्या रोगांचा प्रसार - जो पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे - आणि मुलांचे मृत्यू हे आरोग्य व्यवस्थेतील कमतरतेकडे निर्देश करतात. भारतात सर्व लसीकरण आणि इतर आरोग्य सेवांचे दर कमी झाल्याचे हे लक्षण आहे. अशीही वस्तुस्थिती आहे की, लसीकरणापासून वंचित राहिलेली बहुतांश मुले गरीब आणि खालच्या वर्गातील आहेत. यामुळेच ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा भागांत गोवरचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू नोंदवले जातात. आणखी एक चिंतेची बाब अशी आहे की, लसीने प्रतिबंधक करता येणाऱ्या रोगाचा प्रसार होत असला तरी इतर रोगदेखील डोकावू शकतात. आता आपण काय करावे? याला आपण एकत्रितपणे सामोरे जावे लागेल. देशातील प्रत्येक राज्यात लसीकरणासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. राज्य सरकारांना लसीकरण मोहिमेला गती द्यावी लागेल आणि आरोग्य सेवा विशेषत: गरीब व कमी उत्पन्न गट, झोपडपट्ट्या व मागासलेल्या भागात पोहोचतील याचीही खात्री करावी लागेल. पालकांनी त्यांच्या मुलांच्या वयानुसार लसीकरणाची खात्री करावी. या प्रक्रियेत शाळांनीही हातभार लावावा. लसीकरणाव्यतिरिक्त बालकांना नियमितपणे व्हिटॅमिन ए पुरवणे, कमी वजनाच्या मुलांचे पोषण आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांवर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. हे सर्व घडवण्यात अंगणवाडी आणि आशा सेविकांचा महत्त्वाचा वाटा आहे. कोविड महामारीने आपल्याला सांगितले आहे की, कोणत्याही रोगाच्या प्रतिबंधासाठी वेळेवर शोध (निगराणी), नियमित डेटाची उपलब्धता (आकडेवारी) आणि त्या डेटावर आधारित कृती – या तीन पायऱ्या महत्त्वाची भूमिका बजावतात. या तिन्ही प्रक्रिया भारतातील राज्यांमध्ये बळकट करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लसींबाबत पालकांमधील संकोच दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागतील. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
डॉ. चंद्रकांत लहारिया प्रख्यात डाॅक्टर c.lahariya@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.