आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइतिहासाशी छेडछाड करण्यासाठी बॉलीवूड मुद्दाम सहकाऱ्याची भूमिका बजावू लागते तेव्हा काय होते? मग बॉलीवूड यासाठी कवी आणि लेखकांना दोष देऊ लागतो. त्यामुळे चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर संजय लीला भन्साळी म्हणतात की, हा चित्रपट मलिक मुहंमद जायसी यांच्या पद्मावत या कवितेवर आधारित आहे. आता चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणत आहेत की, सम्राट पृथ्वीराज चंदबरदाईंच्या ‘पृथ्वीराज रासो’वर आधारित असून त्यांच्या चित्रपटात इतिहास शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तसे करू नये. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘हा चित्रपट राजकारणाचा आखाडा झाला आहे!’ तथापि, त्यांनीच हा चित्रपट जनतेला दाखवण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना दाखवला होता.
बॉलीवूडमध्ये दीर्घ काळापासून एका व्यक्तीचा इतिहास दुसऱ्यासाठी राजकीय अजेंडा राहिला आहे. आणि याला कारणेदेखील आहेत. बॉलीवूडमध्ये इतिहासावर आधारित चित्रपट नेहमीच रुळांवरून घसरले आहेत. शहजादा सलीम आणि कनीज अनारकलीची प्रेमकथा घ्या, अनारकलीची कबर लाहोरमधील पंजाब सचिवालयात आहे याशिवाय त्याला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही. पण, असे असूनही के. आसिफ यांचा मुगले-आझम चांगलाच यशस्वी ठरला. आशुतोष गोवारीकरच्या ‘जोधा अकबर’बद्दल बोलायचे तर त्या नावाची कोणी राजपूत राजकुमारी होती की नाही, हे निश्चित नाही.
पण, सम्राट पृथ्वीराज यांच्या बाबतीत फरक असा आहे की, चित्रपटाच्या निर्मात्यानेच चित्रपटाचे राजकीयीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. १९४७ पूर्वी ते देशातील शेवटचे हिंदू शासक असल्याचा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रोमोमध्येही हेच प्रमोशन करण्यात आले आहे. असे करताना दक्षिणेतील उत्कृष्ट हिंदू राज्ये दुर्लक्षित राहिली आहेत. या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्याने असाही दावा केला आहे की, आज शाळांमध्ये चुकीचा इतिहास शिकवला जात आहे, त्यात आक्रमकांवर जास्त भर दिला जात आहे, तर पृथ्वीराज यांच्याबद्दल फक्त काही ओळी लिहिल्या जातात. अर्थात, बॉलीवूड कलाकार इतिहासकार नाहीत आणि आपण त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेऊ नये.
बॉलीवूडच्या मनात ऐतिहासिक कथांबद्दलचे प्रेम अचानक जागृत झालेले नाही. अखेर, भारतात बनलेला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्रावर होता, ते ऐतिहासिक नव्हे, तर पौराणिक पात्र आहे. दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये त्याची निर्मिती केली होती. इतिहासावर आधारित चित्रपट कधीच टीकेच्या पलीकडे नव्हते. अनारकलीवर अनेक चित्रपट बनले आहेत. यापैकी एक १९२८ चा चित्रपट होता, त्यामध्ये रुबी मेयर्स उर्फ सुलोचना मुख्य भूमिकेत होत्या. मंगळूरच्या डीएमने त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती, कारण त्या वर्षी तिथे जातीय दंगली झाल्या होत्या. लवकरच या चित्रपटावर देशभरात बंदी घालण्यात आली. आज आसिफ यांना अनारकलीच्या सत्यतेबद्दल विचारले असते तर त्यांनीही लेखकाचा आश्रय घेतला असता - इम्तियाज अली ताज यांच्या १९२२ च्या नायकावर मुघले-आझम आधारित होते. पण, द्विवेदी म्हणत आहेत, अबुल फजल, फैजी जे म्हणतील ते बरोबर आणि चंदबरदाई म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. द्विवेदी हे निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करत आहेत की, अकबरनामा या मोगल सम्राटाच्या अधिकृत चरित्राचे लेखक फैजी आणि चंदबरदाई समकक्ष आहेत, तथापि फैजी आणि चंदबरदाई हे दोघेही इतिहासकार नव्हे, तर राजकवी होते. एक तर अबुल फजल आणि चंदबरदाई या दोघांच्याही कृतींना इतिहास समजा किंवा कुणाच्याच नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे.
सत्य असे आहे की, भूतकाळ इतका महत्त्वाचा आहे की, तो हौशी इतिहासकारांवर सोडता येणार नाही. चित्रपट निर्मात्यांनी शौर्याच्या कथा शोधण्यासाठी भूतकाळात न जाता वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सत्य सांगण्याचे काम इतिहासकारांनाच करू द्यावे. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
भूतकाळ इतका महत्त्वाचा आहे की, तो हौशी इतिहासकारांवर सोडता येणार नाही. चित्रपट निर्मात्यांनी शौर्याच्या कथा शोधण्यासाठी भूतकाळात न जाता वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.