आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दखल:घेऊ भरारी...

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी नुकतीच झालीये. महाराष्ट्रातली दिवाळी म्हणजे खाद्य फराळासोबत साहित्य फराळाचीही चंगळ. आता सोशल मीडियाच्या युगात मोबाईलवरून साहित्य फराळ फॉरवर्ड करणं सहज सोपं झालंय. या दिवाळीत माझ्या एका मित्राने आमच्या शाळेच्या ग्रुपवर इंदिरा संतांची कविता शेअर केली... अक्कू-बक्कूची दिवाळी. माझी तर अत्यंत आवडती कविता. मी देखील बरेच वेळा दिवाळीनिमित्तानं ती वेगवेगळ्या ग्रुप्सवर शेअर केली होतीच, पण यंदा प्रथमच इतर कोणीतरी ती शेअर केल्यानं वेगळाच आनंद झाला. नितांत सुंदर अशा या कवितेत बेताची आर्थिक स्थिती असलेल्या पण मोठ्यांसारखी समज असलेल्या दोघी बहिणींच्या भावनांचं यथार्थ चित्रण इंदिरा संतांनी केलंय. दिवाळीसाठी मामाकडे जाता येणार नसल्यानं खट्टू झालेल्या दोघी, प्रत्यक्ष मामाच दिवाळी घेऊन आल्यावर मोहरून जातात. लहान मुलींची ही कविता इंदिरा संतांनी फक्त लहानांसाठीच लिहिली होती का..? लहानांसाठी म्हणून लिहिलं जाणारं साहित्य, मग ते काहीही असो, कविता, गाणी, गोष्टी, नाटुकली.. काहीही. ही फक्त लहानांसाठीच असतात का..? लहाग्यांना त्यातून जो आनंद मिळतो, तो मोठ्यांना पण मिळत असणारंच की नाही? याचं उत्तर हवं असेल, तर आपल्याला लहानांसाठीचं साहित्य म्हणजेच बाल साहित्य वाचावं लागेल. तुम्ही शेवटची बाल कविता किंवा बाल कथा कधी वाचली होती हो..?

मुळात आता बालकांसाठी स्वतंत्रपणे लिहिलं जातंय का, हाच मोठा प्रश्न आहे. बंगाली साहित्याबद्दल असं म्हटलं जातं की, तिथले साहित्यिक जोपर्यंत बालकांसाठी काही लिहित नाहीत, तोपर्यंत त्यांचं साहित्यातील योगदान परिपूर्ण मानलं जात नाही. आपल्याकडे विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, इंदिरा संत, शांता शेळके यांच्यासारख्या दिग्गजांनी मोठ्यांसाठी लिहितानाच लहानांसाठीही लिहिलं. करंदीकरांची ‘एटू लोकांचा देश’ ही कविता किंवा इंदिराबाईंची ‘गवतफुला’ ही कविता आजही अनेकांना तोंडपाठ आहे. तसंच शांताबाईंचं ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ हे गाणं किंवा पाडगांवकरांचं ‘सांग सांग भोलानाथ’ हे गाणं ऐकलेलं नाही, अशी मराठी व्यक्ती सापडणं विरळंच. ही चार नावं प्रातिनिधिक आहेत, सगळ्यांचा नामोल्लेख शक्य नाही, पण मागच्या पिढीतल्या अनेकांनी बालकांसाठी लिहूनही, आज साहित्य क्षेत्रात बाल साहित्याबाबत औदासीन्य असल्याचं ऐकू येतं, ते का बरं? बाल साहित्य म्हणजे चिल्लर पार्टीसाठी लिहिणं आणि असं लिहिलं तर आपली गणती चिल्लर पार्टीत होईल, अशी भीती वाटत असावी का? वर उल्लेख केलेल्या चार दिग्गज साहित्यिकांनी लहानग्यांसाठी सतत लिहूनही ते अशा चौकटीत बांधले गेले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं, पण मुलांसाठी लिहायचं म्हणजे काहीही लिहिलं तरी चालेल, असं मात्र अजिबातच नाहीये. मोठ्यांसाठी लिहिणं सोप्प, पण लहानांसाठी लिहिणं कठीण, असं म्हटलं जातं. मला आठवतं, माझ्या लहानपणी म्हणजे बालवाडीत असतांना, मला जवळपास पन्नास बाल कविता/बडबड गीतं पाठ होती. त्याचं पूर्ण श्रेय माझे आई-वडील आणि शाळेतल्या शिक्षिकांनाच. सध्याच्या, जॉनी जॉनी येस पापा म्हणल्यामुळे लेकराचा अभिमान वाटणाऱ्या आजच्या आई-बाबांना अशी मराठी बडबड गीतं, बाल कविता कदाचित डाऊन मार्केट वाटू शकतात. त्यामुळे मातृभाषेतील कविता, गाणी, गोष्टी वाचता यावी, म्हणता यावी, याचा आग्रह धरण्याचे दिवस आज आले आहेत. आमचं लहानपण मात्र या विषयात समृद्ध होतं. भागवतांचा फास्टर फेणे तर आमच्या पिढीचा हिरोच होता. कोणत्याही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले वडील घरी परतले, की त्यांच्या बॅगेत माझ्यासाठी एक नवं कोरं पुस्तक असायचं. अमर चित्र कथा किंवा भारत भारतीचं. वेगवेगळ्या कथाप्रकारांचा संग्रह असलेला चांदोबा तर नियमितपणे घरीच येत होतं. या सगळ्या बाल साहित्याने बालपण समृद्ध केलंच, शिवाय वाचनाचा, लेखनाचा पायाही भक्कम केला. या पुस्तकांमधल्या गोष्टी आज जुन्या झाल्यात, संदर्भ कालबाह्य झालेत... मान्य. मग नव्या संदर्भासह नव्या कथा, कविता, गाणी लिहायला काय हरकत आहे. सोशल मीडियाच्या युगात, ई-बुक आणि किंडलच्या जमान्यात ही पुस्तकं कोणी विकत घेऊन वाचणार नाही, असं जर वाटत असेल, तर तुम्ही चुकत आहात. प्रसिद्ध कवी-गीतकार दासू वैद्य यांच्या बाल कवितांची चार पुस्तकं साधना प्रकाशनने नुकतीच प्रकाशित केलीत आणि ॲमेझॉनवर हा चार पुस्तकांचा संच बेस्ट सेलरच्या यादीत जागा पटकावून बसलाय. दासू वैद्य काही फक्त बाल कविता लिहिणारे कवी नाहीयेत. अनेक चित्रपटांत त्यांची गाणी गाजली आहेत. टीव्हीवरच्या अनेक मालिकांची त्यांनी लिहिलेली शीर्षक गीतं आपण दररोज गुणगुणतो. अशा मोठ्या लोकांचेच कवी असलेल्या दासूंची ‘क कवितेचा’, ‘गोलमगोल’, ‘झुळझुळ वारा’ आणि ‘चष्मेवाली’ अशी चार पुस्तकं म्हणजे बाल वाचकांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठीही मेजवानीच आहे. लहान मुलांचं भावविश्वच जणू या संग्रहातून आपल्या भेटीला येतं. नदी गायब, नाले बुजले, सिमेंटची जमीन घट्ट झाल्यामुळे घाबरून घरात आलेलं पाणी, स्वतःला मातीत रुजवून घेण्यासाठी चाकूला टरबूज कापायला लावणारी आणि त्याला काम करत राहण्याचा उपदेशही करणारी बी, अहंपणातून गादी आणि उशीचं भांडण किंवा रंग आणि रेषेचं भांडण आणि नंतर दिलजमाई, समानतेचा संदेश देणारी माणुसकीची कविता, दाताच्या जन्मापासून दात पडेपर्यंतचं दंतपुराण, पुस्तकांच्या गावाचं वर्णन करणारं ग्रंथग्राम, निरनिराळ्या मिशांचं अप्रूप वाटून स्वत:ला मिशा येण्याची वाट पाहणारा मुलगा, घरातल्या मोठ्यांसारखा चहा हवा असलेला नायक किंवा झाडावरची पळापळ सोडून टीव्ही पहात बसल्यामुळे चष्मा लागलेली खारुताई. या नवनव्या विषयांवरच्या कविता लहानांइतक्याच मोठ्यांनाही आनंद देतील, यात शंकाच नाही. साधना प्रकाशनाने या पुस्तकांना बाल कवितांचा सुपर चौकार म्हटलं आहे. ॲमेझॉनवर बेस्ट सेलर गटात स्थान पटकावत या चौकाराने षटकार मारलाय, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. या पुस्तकातल्या एका कवितेत म्हटलंय, गवतावरचे दव झेलावे पाण्यावरचे तरंग प्यावे वर्षा होऊन नित बरसावे नदीमधूनी खळखळ वहावे पानासंगे मन डुलवावे फुलासंगे मन फुलवावे पक्षी होऊन उंच उडावे आभाळाचे पापे घ्यावे या कवितेतल्या मुलाप्रमाणेच बाल साहित्यानेही उदासीनतेच्या भिंती फोडून आभाळाचे पापे घेण्यासाठी भरारी मारावी, हीच अपेक्षा!

हर्षवर्धन दीक्षित संपर्क : ९८८१२२३६७५

बातम्या आणखी आहेत...