आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातलं काही:जरा विसावू या वळणावर...

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळी स्वयंपाक करत असताना गाणं कानावर आलं, ‘जरा विसावू या वळणावर..’ सुधीर मोघे यांचे हे सुंदर गीत ऐकून मी थोडी स्तब्ध झाले. वर्षाचा शेवटचा आठवडा सुरू होता. मन उगाच मागच्या आठवणीत रेंगाळलं. वर्षभरात काय काय झालं, याचा मन मागोवा घ्यायला लागलं. काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी घडून गेल्या होत्या, चांगल्या आठवणी जपून ठेवाव्याशा, त्यांचा गोडवा पुन्हा पुन्हा चाखावा वाटतोय, तर काही तारखा-काही महिने कधीही न विसरता येण्यासारखे होते. म्हणून सरत्या वर्षाला निरोप देताना मन उगाचच कातर होऊन गेले.

माणसाच्या आयुष्यात दिवस महिने वर्ष कसे झर्रकन निघून जातात ते कळतही नाही. हातातून एखादी वस्तू नकळत निसटून जावी अगदी तश्शीच! गतिशील कालचक्र पुढे सरकत असतं. या चक्रात आपण काय गमावलं याचा जसा विचार मनात येतो तसाच आपण कोणते नवीन बदल स्वीकारले, काय नवीन शिकलो, कुठला छंद आपण वर्षभर जोपासला असतो, याचीही नकळत गोळाबेरीज मन करू लागतं. कधी फार जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असते. त्यांच्या आठवणीत डोळ्यांच्या कडा ओलावतात. कायम सोबत, अवतीभवती असणारी व्यक्ती अचानक पुढच्या प्रवासाला निघून गेल्यानंतर साहजिकच आपल्याला हुरहूर लागून राहते, पण नवीन वर्षात त्यांनी दिलेली शिकवण आत्मसात करून त्यांना श्रद्धांजली वाहायची, एवढेच आपण करू शकतो.

एक काळ होता, दूरदर्शनवरील नववर्षाच्या स्वागतासाठीचे कार्यक्रम पाहून आनंद होत असे. घरातील सर्वजण टीव्ही समोर बसून एकत्र आनंद लुटायचे. आणि तेथेच नवीन वर्ष साजरा व्हायचं. आज काळही बदलला आणि पद्धतीही. सध्याचे नवीन वर्ष साजरे करण्याचे मापदंड बदलून गेले आहेत. काळानुसार बदलायलाही हवं, परंतु आपली संस्कृती, थोरामोठ्यांचा आदर या गोष्टी हरवू नयेत, असं मनापासून वाटतं. नवीन वर्ष साजरेच करायचे असेल तर गड-किल्ल्यांवर जावं, श्रमदान करावं, वृक्षारोपण करावं... आनंद साजरा करण्यासाठी अनेक चांगले पर्याय आहेत. फक्त ते निवडता यायला हवेत. आयुष्यातील एक वर्ष सरलं म्हणून जगणं सरलेलं नसतं. हातातून एखादी वस्तू नकळत निसटून जावी तसे २०२२ हे वर्ष देखील निघून गेले. सरत्या वर्षाला निरोप देताना खूप काही शिकायला मिळाले आणि त्यातूनच सकारात्मक शक्ती मिळाली, या एका विचाराने पुन्हा जोमाने कामाला सुरूवात करावी. या सकारात्मक शक्तीसह येणाऱ्या काळाला सामोरे जायला हवं. सरत्या वर्षातल्या चुका, वाईट सवयी, विचार-आचार इत्यादीला फाटा देऊन दिवास्वप्नांच्या मागे न लागता जी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे शक्य आहे, तीच स्वप्ने पाहूया. नवे ध्येय साध्य करण्यासाठी योग्य आखणी करून त्या मार्गाने प्रयत्न परिश्रमाची शिकस्त करण्याचा दृढ निर्धार करूया...

वैशाली डोंबाळे संपर्क : vaishalidombhale587@g.mail.com

बातम्या आणखी आहेत...