आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देशभक्तीचा महापूर आलेला असतो. सोशल मीडियावर संदेशांची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण होते. स्टेटस, डीपी, कव्हर फोटो.. अगदी सगळीकडे देशप्रेम उतू जातं. पण इतर दिवशी मात्र आम्हाला आमच्या व्यापात देशाचा, देशाच्या विकासाचा-प्रगतीचा-देशभक्तीचा विचार करायला वेळच कुठे असतो?
एक पालक म्हणून मी जेव्हा विचार करते की माझं माझ्या मुलांवर प्रेम आहे, हे मला त्यांना क्षणोक्षणी सांगण्याची किंवा हे प्रेम दाखवून देण्याची गरज पडत नाही. माझ्या वागण्या- बोलण्यातून, माझ्या प्रत्येक कृतीतून माझं आपल्या मुलांवरचं प्रेम आपोआप व्यक्त होत असतं. न सांगताही ते दिसतं. सुदैवाने माझ्या मुलांनाही न सांगता ते कळतं. माझं वैयक्तिक उदाहरण इथे यासाठी दिलं की, अशीच गोष्ट देशाप्रति असलेल्या प्रेमाची देखील असायला हवी. एक वेळ रोज प्रतिज्ञा नाही म्हटली तरी चालेल, पण दैनंदिन वागण्या-बोलण्यातून देशप्रेम, मातृभूमीविषयी कर्तव्यांची जाणीव असायला हवी. कायदेशीर हक्कांबद्दल आपण जेवढे जागरूक असतो तेवढीच किंबहुना त्यापेक्षा अधिक जागरूकता देशाप्रतिच्या कर्तव्यांबद्दलही असायला हवी. कर्तव्य म्हटलं की, सैनिक, पोलिस, शिक्षक, सफाई कर्मचाऱ्यांची प्रत्येकाला आठवण येते. प्रत्येकाला वाटतं महापुरुष शेजारच्या घरात जन्माला यावा. पण, आता मात्र असं करून चालणार नाही. कारण केवळ आपल्या देशासमोरच नाही तर संपूर्ण मानव जातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारे अनेक प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. मग ते कमी होत जाणाऱ्या जंगलांचं प्रमाण असो, वाढणाऱ्या प्रदूषणाचे प्रश्न असो, झपाट्याने संपत चाललेल्या इंधनाचा किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा असो... अशा प्रत्येक प्रश्नाविषयी एक पालक म्हणून आपली कर्तव्यपरायणता दाखवणे क्रमप्राप्त आहे. ती कशी दाखवायची? तर अगदी छोट्या कृतीमधून देशाबद्दल असलेलं कर्तव्य आपण पूर्ण करू शकतो. उदा. वीज-पाणी काटकसरीने वापरणे, सामाजिक जीवनात शिस्त अंगीकारणे, वापरा आणि फेका तत्त्वाचा त्याग करणे, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन इ. मधून कृतिशील पुढाकार घ्यायला हवा. निसर्ग, हवा, पाणी, जंगल, वृक्षवल्ली-वनसंपदा, ऊर्जा साधनांचं पालकत्व स्वयंस्फूर्तीने स्वीकारून त्यांचा ऱ्हास थांबवूया. त्यांच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी प्रयत्न करूया. या कार्यातून आपल्या पाल्यांसमोरही कृतिशील उदाहरण ठेवण्यासाठी पाऊल उचललं तर आणि तरच प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाला वंदन करण्याचा आपल्याला हक्क असेल. अन्यथा, भविष्यात या दिवशीच्या दिखाऊ सोहळ्यांचा आपणही एक भाग झालेले असू.
विनया कुलकर्णी गांगल (पालक)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.