आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा६५व्या वर्षी लोक सहसा सेवानिवृत्तीचा आनंद घेतात, फिरतात, पुस्तके वाचत वेळ घालवतात. मात्र, केरळमध्ये राहणाऱ्या राधामणी यांची कथा थोडी वेगळी आहे. केरळच्या वायनाडमधील मोठाक्करा येथे गेल्या एक दशकापासून त्या दररोज लोकांच्या घरापर्यंत पुस्तके पोहोचवत आहेत. राधामणी यांना लोक केरळच्या चालत्या-फिरत्या ग्रंथपाल म्हणतात.
राधामणी सांगतात, वाचण्याचे सुख सर्वात मोठे आहे. वडील जास्त शिकलेले नव्हते. त्यामुळे त्यांना वृत्तपत्र वाचून बातम्या ऐकवणे माझे रोजचे काम होते. संपूर्ण पुस्तक वाचून त्यांना ऐकवत होते. नातेवाइकांना पत्र लिहून मीच पाठवत होते. कधी त्या काळ्या अक्षरांशी नाते जुळले कळालेच नाही. यानंतर ग्रंथपाल होण्याचा निर्णय घेतला. मी २०१० मध्ये वायनाडमधील मोठाक्करा येथील प्रतिभा वाचनालयाची सदस्य झाले. हे सार्वजनिक वाचनालय गेल्या सहा दशकांपासून आहे. मात्र, ग्रामीण भागात लोक कामाच्या व्यग्रतेमुळे पुस्तकाच्या दुकानात जाऊ शकत नव्हते. खास करून महिला वेळ काढू शकत नव्हत्या. अशा वेळी लोक भलेही वाचनालयात येऊ शकत नसतील, पण वाचनालय तर त्यांच्या घरी जाऊ शकते ना, हे मला उमगले आणि येथूनच चालत्या-फिरत्या ग्रंथालयाची सुरुवात झाली. मी कापडी पिशवीत वेगवेगळ्या विषयांची २५-३० पुस्तके ठेवली आणि वाचनालय सदस्य असलेल्या महिला व वृद्धांच्या घरी जाऊन ती वितरित करण्यास सुरुवात केली. पुस्तके देऊन आठ दिवसानंतर परत घेत होते आणि याचा सर्व हिशेब एका वहीमध्ये ठेवत होते.
गावामध्ये काही भाग असे आहेत जिथे वाहन चालवणेही कठीण आहे. अशा भागातील विशिष्ट जमातींच्या मुलांसाठी पुस्तके सुलभ नाहीत. अशा वेळी मी पिशवी घेऊन रोज ४ ते ६ किमी जाऊन पुस्तके वाटत होते. लोकांचा रस पाहून माझा उत्साह वाढत गेला. आता मुले आधीच फोन करतात. ग्रंथालयात मल्याळम, हिंदी आणि इंग्रजीतील सुमारे ११ हजार पेक्षा जास्त पुस्तके आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. राधामणी सांगतात, इतक्या वर्षांत मी दररोज सरासरी ५०० ते ५५० पुस्तके लोकांच्या घरांमध्ये वितरित करत आहे. तथापि, कोरोनामुळे थोडा ब्रेक घेतला होता. राधामणी एका मुलाखतीत म्हणाल्या, वाचनाने तुमचे जग विशाल होत जाते. आता तर एखादा वाचक स्वत:हून मला नवनवीन पुस्तके सुचवतात. गावात महागडी पुस्तके लोकांना केवळ ५ रुपयांत वाचायला मिळत आहेत. लोक फक्त साप्ताहिक, मासिकांपर्यंतच मर्यादीत नाहीत, तर विविध विषयांची पुस्तकेही ते वाचत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.