आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘व न पेज स्टोरी’ हा कथासंग्रह अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहिले वैशिष्ट्य यातील एकूण ४४ कथांपैकी एकाही कथेला नाव नाही. शीर्षक नाही. त्यामुळे कथेचा विषय काय, हे लगेच कळत नाही. त्यासाठी ती संपूर्ण वाचावी लागते. अर्थात हे काम अवघड नाही. कारण कथेची लांबी-रुंदीच मुळी एका पानाएवढी आहे! अर्थात मराठीत “अलक’ अर्थात अतिलघुकथा ही लिहिल्या जातात, त्यामुळे पानभराची गोष्ट हा काही अनपेक्षित वा वेगळा प्रकार नाही. लेखकाने मुळात ‘फेसबुक’साठी केलेले-तेही कोरोना काळात, म्हणजे लॉकडाऊनच्या काळात केलेले हे लेखन आहे. त्या काळात अनेकांचे कामकाज, व्यवहार आणि दैनंदिन जीवन खूप मंदावले होते, परंतु वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, अन्य स्टाफ आदींचे काम खूप वाढले होते. तसे ते लेखक तथा स्त्रीरोगतज्ज्ञ आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन असणाऱ्या डॉ. विक्रम लोखंडे यांचेही वाढले होते. तरीही ते या गोष्टी फेसबुकवर टाकत होते. त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळत गेला. त्यातीलच ४४ कथांचे हे पुस्तक म्हणजे “वन पेज स्टोरी!’ यातील सर्वच कथा विलक्षण चटका लावणाऱ्या आहेत. त्यामुळे पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच ‘जीवनाभूती देणाऱ्या कथा’ असे जे उपशीर्षक छापले आहे, ते अत्यंत योग्य आणि यथार्थ वाटते. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि लॅप्रोस्कोपिकचे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या नातेसंबंधातील विविध पदर, त्यातील ताणतणाव, गुंतागुंत हे सगळे अन्य कोणा माणसाच्या वा लेखकाच्या वाट्याला येणार नाहीत एवढी माणसे आणि अनुभव डॉ. लोखंडे यांना येत असतात. तरुण -तरुणी, त्यांचे प्रेम, त्यांची लग्ने, त्यांचे लैंगिक जीवन, मुलं-बाळ होणे न होणे, पालकांचा दृष्टिकोन, मूल दत्तक घेणे, वृद्धाश्रम, बिनलग्नाची संतती, गर्भपात याबाबतचे नानाविध अनुभव डॉ. लोखंडे एक लेखक म्हणून मोजक्या शब्दांत आपल्यासमोर मांडतात. यातून एखादी दीर्घकथा, कादंबरी वा नाटकही होऊ शकते एवढी क्षमता असणाऱ्या या कथा आहेत. बहुतांश कथा सत्यावर वा अनुभवावर आधारित आहेत, तर फार थोड्या काल्पनिक आहेत. पण त्या प्रत्येक कथेतून माणसाच्या चांगुलपणावर, माणुसकीवर, सहृदयतेवर आणि सकारात्मकतेवर लेखकाचा दृढ विश्वास आहे. काही वेळा हा विश्वास भाबडेपणा वा निरागसतेच्या स्तरावर जाणारा आहे. त्यामुळेच एक खूप आशयघन संदेश लेखक त्याच्या प्रत्येक कथेतून देऊन जातो. कथा वाचून पटकन संपवता येतात. पण त्या दीर्घकाळ वाचकाला पछाडतात. त्याच्या मनात, विचारात रेंगाळत राहतात आणि म्हणूनच त्या सकस आहेत. दर्जेदार आहेत. मानवी नातेसंबंधांचा उलगडा करून जीवनाचे आकलन सुधारणे हा प्रत्येक साहित्यकृतीचा उद्देश असतो. त्या संदर्भात वाचनीय, संदेशप्रधान आणि सकस कथा देणाऱ्या डॉ. विक्रम लोखंडे आणि त्यांच्या वन पेज स्टोरीचे मराठीत स्वागत होईल, याची खात्री वाटते.
संपर्क : ९७६६५६८२९०
पुस्तकाचे नाव वन पेज स्टोरी लेखक डॉ. विक्रम लोखंडे पृष्ठसंख्या : १२८ पाने किंमत : २०० रुपये प्रकाशक साकेत प्रकाशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.