आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टुरिंग टॉकीज:लहानग्या चेंगचं बंड

भक्ती चपळगावकर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलं शाळेत जातात. पहिल्या दिवशी रडारड होते, पण हळूहळू शाळेत मित्र मिळतात, एखादा विषय आवडतो, खेळाच्या तासाला मनसोक्त खेळता येते.. थोडक्यात कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाला शाळा आवडायला लागते. पण, याच शाळेत एका कोपऱ्यात एखादा कुणी कारण नसताना फुरंगटलेला असतो. कुणी एखादी कारण नसताना काहीही लिहायला तयार नसते, तर एखादा कितीही समजावले तरी दंगामस्ती थांबवत नाही... कोण असतात ही बंड मुलं? आणि त्यांच्या बंडाला काही कारण असतं? की आपल्याकडं, आपल्याला झालेल्या दुःखाकडं इतरांचं लक्ष जावं म्हणून केलेला हा अट्टहास असतो? काय माहीत? चीनमध्ये घडणाऱ्या कथानकावरील ‘लिटिल रेड फ्लॉवर्स’ नावाच्या एका चित्रपटात चेंग नावाचा चार वर्षांचा मुलगा असाच बंडखोर आहे. जगाशी जुळवून घेणाऱ्या मुलांच्या घोळक्यात हे लेकरू हार मानायला तयार नाही आणि त्यानं अख्ख्या शाळेशी उभा दावा मांडला आहे.

१९७० च्या काळात चीनमधल्या एका निवासी शिशुशाळेत चेंगला त्याचे वडील सोडून जातात. आई-वडिलांना काम करण्यासाठी फॅक्टरीत जावं लागत असल्यानं या काळात चीनमध्ये अनेक आई-वडील मुलांना निवासी शाळांमध्ये सोडून देत. चेंगही अशाच एका शाळेत आला आहे. आल्या आल्या ली नावाची टीचर कात्री घेऊन त्याचे केस कापून टाकते. आपल्या केसांना कात्री लावली हे चेंगला आवडत नाही आणि रडण्याशिवाय आपले म्हणणे कसे मांडायचे, हे या लहानग्याला माहीत नसल्याने तो रडून रडून गोंधळ घालतो. इथं त्याला समजावणारे, चुचकारणारे कुणी नाही. अर्थात बेयांग आणि तिची बहीण त्याला कपडे काढायला आणि घालायला मदत करतात. त्याचे शाळेतले आयुष्य सुरू होते. इथे सगळ्या गोष्टी हुकूमानुसार होतात. ली आणि तिच्या सहकारी टीचर मुलांना स्वच्छता, शिस्त आणि स्वतःच्या गोष्टी स्वतः करण्याचे प्रशिक्षण देतात. या गोष्टी नीट करणाऱ्या मुलांना कागदाची लाल फुलं बक्षिस म्हणून मिळतात. एका फळ्यावर मुलांची नावे लिहिलेली असतात, आणि त्याच्या पुढे त्यांना मिळालेली फुलं चिकटवलेली असतात.

चेंगच्या नावापुढं एकही फूल नसतं. कसं असेल? त्याला स्वतःचे कपडे कसे काढायचे , हेच माहीत नाही. पण, चेंग मोठा गोड मुलगा असतो. मोठे मोठे डोळे आणि सदैव खोड्या करायला तयार असलेल्या चेंगवर लीची सहायक टीचर खुश असते, मात्र त्याच्या न ऐकण्याच्या स्वभावामुळं ती पण काही करू शकत नाही. इतर मुलं ऐकतात आणि हा ऐकत नाही म्हणजे काय? गोष्टी त्या कोणत्या - पहिल्याच दिवशी चेंग सगळ्या मुलांबरोबर बाथरूममध्ये जातो, तिथं एका रांगेत मुलं बसतात आणि दुसऱ्या रांगेत मुली. टीचर ली एक – दोन - तीन म्हणून शिट्टी वाजवते. लगेच सगळे जण शी करतात. जो आधी शी करेल त्याला जास्त गुण आणि जो शी करणार नाही त्याला उभे राहायची परवानगी नाही. सगळे जण गेले तरी चेंग बसूनच राहतो, कारण त्याला शी आलेली नसते, मग मी कशी करु? हा प्रश्न तो डोळे मोठ्ठे करुन विचारतो. शी केली नाही तर मग जेवायला परवानगी नाही. भात हवा असेल, तर डावा हात वर करायचा. सूप हवं असेल, तर उजवा हात वर करायचा, हे नियम सुध्दा चेंग पाळत नाही. रोज रात्री पलंग ओला करतो. आणि कपडे? स्वतःच्या शर्टाची बटनं या चार वर्षाच्या घोड्याला लावता येत नाहीत... मग या अशा मठ्ठ फुलाला कसे मिळणार सुबक, लाल फुल? हे फूल कोणताही प्रतिप्रश्न न विचारता शाळेचे नियम पाळणाऱ्या मुलांनाच मिळते. चेंग शाळेशी जुळवून घेतच नाही, उलट खोड्या करुन शिक्षकांना, इतरांना भंडावून सोडतो. रात्री सगळे जण झोपल्यावर अंगणात येऊन चंद्र प्रकाशात उभं राहणं, कधी हिमतुषार बघत बसणं, कधी चक्क पायऱ्यांवर शू करणं.. असले उद्योग चेंग करत असतो. जणू रात्री सगळे जण झोपल्यावर त्याला हवं तसं स्वातंत्र्य मिळत असावं. त्याच्या वागण्याने टीचर ली फार फार वैतागते. कितीही प्रयत्न केला, तरी हा मुलगा काही ऐकत नाही. मग ती त्याला शिक्षा करते. सरळ त्याला एका कोपऱ्याच्या खोलीत बंद करून ठेवते. एकटा चेंग आधी घाबरतो, रडतो; पण त्याच्या मदतीला कुणी येत नाही. या शिक्षेचा चेंगवर परिणाम होत नाही. म्हणजे परिणाम होत नाही, असे ली टीचरला वाटते. प्रत्यक्षात चेंगवर शिक्षेचा परिणाम होतो. तो शाळेपासून, इतरांपासून स्वतःला अजून वेगळे करतो. एवढं सगळं होत असताना ‘मला लाल फूल का मिळत नाही?’ या प्रश्नाचं उत्तर चेंगला मिळत नसतं...

एकदा एका मुलाचे वडील शाळेला भेट देतात. ते सरकारी अधिकारी असल्याने सगळ्या शिक्षिका त्यांच्याशी अगदी अदबीने वागत असतात. पाहुणे चेंगच्या नावापुढे एकही फूल नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतात आणि लगेच शिक्षिका उसनं हसत त्याच्या नावापुढं एक फूल लावतात. एकूण चेंगची लॉटरी लागते. टीचर ली म्हणजे एक राक्षसीण आहे, असं चेंगला वाटत असतं. आणि हळूहळू सगळ्या मुलांना तो हे सांगतो. त्याला असं वाटतं कारण टीचर लीने एकदा मुलांना चिंपांझीची नक्कल करून दाखवलेली असते आणि त्या वेळी ती राक्षसी आहे, असा साक्षात्कार चेंगला होतो. मग काय, सगळी मुलं लीच्या मागे लागतात, तिची शेपटी शोधायला लागतात. कधी तिला पकडायला दोरी करून आणतात. शांतपणे मान खाली घालून फिरणारी मुलं आता वेगळी वागू लागतात. सगळ्या शिक्षिका मिळून हे बंड कसेबसे थोपवतात. एकदा मध्यरात्री भटकणाऱ्या चेंगला सगळ्या शिक्षिका पकडतात आणि त्याला एका टेबलावर उभं करून त्याची गंमत बघतात, हसू लागतात. त्यांचं आपल्याकडं लक्ष आहे, या विचारानं चेंग खुश होतो आणि हसू लागतो, पण लगेच जोरजोरात रडू लागतो. तो हसतोय की रडतोय, हेच एक क्षण कळत नाही आणि त्याची घुसमट आपल्यालाच असह्य होते. चेंगला सुधारण्यासाठी आता सगळ्या शिक्षिकांनी एक जालिम उपाय योजला आहे. आपण बोललेले तो ऐकत नाही ना, मग ठीक आहे, आता आपण त्याच्याशी बोलायचे नाही. चेंग आता इतरांसाठी अदृश्य होतो. तो सैरभैर होतो, आपल्याकडं कुणीच लक्ष देत नाही, आपल्याशी कुणीच बोलत नाही. हे का होतंय, हे कळण्याचं त्याचं वय नाही. पण, आपण सुधारावं म्हणजे काय करावं, हेही त्याला माहीत नाही. त्याच्याकडं कुणाचंच लक्ष नसल्यानं एक दिवस तो शाळेच्या बाहेर सुरू असलेली परेड बघायला निघून जातो. बराच वेळ तो सैनिकांच्या कवायती बघतो अन् ज्या व्यवस्थेनं त्याला सामावून घेण्यासाठी अट्टहास केलेला असतो, तिच्यापासून पूर्ण दुरावलेला चेंग तिथंच एका कोपऱ्यात असलेल्या शिळेवर डोकं ठेवून झोपून जातो. आणि इथंच चित्रपट संपतो...

मुला-मुलांमधील संभाषण, त्यांचे निवासी शाळेतले रोजचे आयुष्य, शिक्षकांची त्यांना सांभाळण्याची कसरत या सगळ्यांमधून हा चित्रपट पुढे जात राहतो. तो फक्त चेंगची गोष्ट सांगतोय की व्यवस्थेने गळा आवळला तर स्वतंत्र अभिव्यक्ती कशी घुसमटते, हे सांगण्याचाही प्रयत्न करतोय, हा विचार आपल्या मनाभोवती फेर धरू लागतो. चेंगची घुसमट मग आपल्यालाही अस्वस्थ करू लागते. शाळेपासून दुरावलेल्या, आई-वडिलांनी सोडून दिलेल्या या लहानग्याला कुणीतरी जवळ घ्यावं आणि काहीही न बोलता त्याच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालावी, असं राहून राहून वाटत राहतं.

बातम्या आणखी आहेत...