आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:लिझ ट्रस : नवी आयर्न लेडी?

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव करून ब्रिटनच्या माजी परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस यांची सत्ताधारी हुजूर पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. ९६ वर्षांच्या महाराणी एलिझा यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लिझ यांच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी परंपरेनुसार बकिंगहॅम पॅलेसमध्ये न होता महाराणीचं वास्तव्य असणाऱ्या स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये झाला. ब्रिटनमधल्या त्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.१९७५ ते १९९० अशी तब्बल पंधरा वर्षांची कारकीर्द गाजवलेल्या ‘आयर्न लेडी’ मार्गारेट थॅचर यांच्यानंतर ब्रेक्झिटच्या कल्लोळात २०१६ ते २०१९ या काळात वादळात सापडलेल्या थेरेसा मे आणि आता वातावरण बदल आणि आर्थिक अरिष्टानं घेरलेल्या ब्रिटनची सूत्रं महिला पंतप्रधान लिझ ट्रस यांच्याकडे आहेत. राजकारणात स्त्रियांची संख्या आणि प्रभाव जगभरच नगण्य असताना महिला पंतप्रधान ही सर्व स्त्री वर्गासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. लिझ ट्रस यांचं मनापासून अभिनंदन! भारतातही सध्या सर्वोच्च पदावर राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू आहेत. एक आदिवासी महिला राष्ट्राध्यक्ष झाल्याचा तेव्हाही महिलांना आणि आदिवासींना खूप आनंद आणि अभिमान वाटला होता. मात्र अस्मितावादी प्रतीकात्मक राजकारणामुळे खरंच स्त्रियांचे अथवा आदिवासींचे प्रश्‍न, समस्या सुटतात का, हा रास्त प्रश्‍न तेव्हा अभ्यासकांनी उपस्थित केला होता. तोच प्रश्‍न ब्रिटनच्या बाबतीतही आहे. लिझ ट्रस स्त्रियांचे प्रश्‍न विशेषत: गरीब स्त्रियांचे प्रश्‍न, निर्वासित स्त्रियांचे प्रश्‍न संवेदनशीलपणे हाताळतीलच याची खात्री नाही.

डाव्या मजूर पक्षाच्या वडील प्राध्यापक आणि आई शिक्षिका असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या आणि त्या विचारांचं वर्चस्व असणाऱ्या स्कॉटलंड आणि उत्तर इंग्लंडमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या लिझ ट्रस! (४७ वर्षीय लिझ यांना पती आणि दोन मुली आहेत.) ऑक्सफर्डमध्येे तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयांचं शिक्षण घेत असताना त्या लिबरल डेमोक्रॅट्सच्या सक्रिय सदस्य होत्या. त्या वेळी कॅनॅबीजचं कायदेशीरीकरण आणि रॉयल फॅमिलीचं उच्चाटन या मताच्या त्या होत्या आणि आता २०२२ मध्ये डावीकडून पूर्ण उजवीकडे मुख्य प्रवाहातल्या रूढीप्रिय हुजूर पक्षाच्या पंतप्रधान!

लिझ स्वभावानं आक्रमक आहेत. त्यांना हार मान्य नाही. राजकीय ध्येय गाठण्यासाठी त्या जिवाची बाजी लावतात. अथक उत्साह आणि ऊर्जा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. २००१, २००५ मध्ये त्यांना पराभवाचाही सामना करावा लागला आहे. मात्र थेरेसा मे यांच्या कार्यकाळात त्या पहिल्या महिला लॉर्ड चान्सलर झाल्या. त्या मुक्त बाजाराच्या आणि जागतिक भांडवलशाहीच्या कट्टर पुरस्कर्त्या आहेत. नुकत्याच ब्रेक्झिटच्या काळात प्रथम त्यांनी ब्रेक्झिटविरोधात भूमिका घेतली. ब्रेक्झिट ही तिहेरी शोकांतिका असेल, असं म्हटलं आणि नंतर त्यांची बाजू हरल्यानंतर त्यांनी ब्रेक्झिटचं समर्थन केलं. त्यामुळे एकूणच लिझ या एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहेत. त्या आपल्या सोयीनुसार वारा येईल तशी पाठ फिरवतात, सरड्यासारखे रंग बदलतात इ. इ. आक्षेप त्यांच्यावर घेतले जातात. मात्र लिझ यांनी तीन पंतप्रधानांच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्या धाडसी आहेत.

रशिया - युक्रेन संघर्षात त्या पंतप्रधान जॉन्सन यांच्यापेक्षा युद्धाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हेच जबाबदार आहेत, असं म्हणत स्वत: युक्रेनमागे ठाम उभ्या राहिल्या होत्या. चीन आणि रशियावर त्या बारीक लक्ष ठेवून असतात. आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे भारताबरोबर सहकार्य करण्यास त्या उत्सुक असतात. त्या भारत भेटीवरही येऊन गेलेल्या आहेत.

या वेळची ब्रिटनमधली पंतप्रधानपदासाठी झालेली निवडणूक भारतीयांसाठी विशेष महत्त्वाची होती. कारण भारतीय वंशाचे, त्यातही भारतातले नावाजलेले उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक पंतप्रधानपदासाठीच्या शर्यतीत महत्त्वाचे उमेदवार होते. ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीही बुडत नाही अशा वर्चस्ववादी ब्रिटनने भारतावर दीडशे-दोनशे वर्षं राज्य केलं. त्या देशावर भारतीय वंशाच्या व्यक्तीनं सत्ता गाजवणं हा काव्यगत न्याय होईल असं भारतीयांना वाटत होतं. पण... सुनक यांचा पराभव झाला. (कारण जॉन्सन यांच्यावर सर्वाधिक चर्चेत असलेला आरोप होता तो कोविड लॉकडाऊनमधल्या प्रतिबंधाचं उल्लंघन केल्याचा. पार्टीगेट म्हणून ते प्रकरण गाजलं. त्यात ऋषी सुनकही होते. पण आपल्या नेत्याच्या खांद्याला खांदा लावून आरोपांचा सामना करण्याऐवजी सुनक यांनी राजीनामा देऊन स्वत:च पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत उडी घेतली. त्यामुळे सुनक यांनी दगाबाजी केली, पाठीत खंजीर खुपसला असा प्रचार निर्णायक ठरला. शिवाय राजघराण्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या परंपराप्रिय ब्रिटिशांना सुनक यांची पत्नी राणीपेक्षा श्रीमंत आहे हेही मानवणारं नव्हतं. सुनक यांना भारतीय वंशाच्या सदस्यांनी भक्कम पाठिंबा दिला तरी इतर रूढीप्रिय, वर्चस्ववादी ब्रिटिशांना भारतीय वंशाच्या व्यक्तीनं त्यांच्या देशाचं पंतप्रधान होणं मान्य नव्हतं. ते त्यांनी निवडणुकीत दाखवून दिलं.) मात्र आत्ताच्या संकटाच्या गर्तेत असणाऱ्या ब्रिटनला त्यातून बाहेर काढण्यात लिझ यांना यश न मिळाल्यास दोन वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सुनक यांना पंतप्रधान होण्याची मोठी संधी आहे, असं जाणकारांना वाटतं.

सध्या ब्रिटनची अर्थव्यवस्था आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. ब्रिटनमध्ये चलनवाढ दहा टक्क्यांवर पोहोचली, ऊर्जेवरचा खर्च, महागाईचं दुष्टचक्र यावर लिझ कशी मात करणार? रेल्वे, आरोग्य, शिक्षण, वकील यांच्यासह अनेक संघटनांचा आंदोलनाचा पवित्रा आहे. सगळ्याच नोकरदारांना महागाई भत्ता तातडीनं वाढवून हवा आहे. तो वाढवणं म्हणजे नव्या चलनवाढीला निमंत्रण! ब्रेक्झिटच्या निर्णयाची गुंतागुंत अजून संपलेली नाही. निर्वासितांचा प्रश्‍न अजूनही संपलेला नाही. उलट संख्या वाढण्याची शक्यता आहे. वाढतं तापमान, दुष्काळ, कमी पाऊस, तर दुसरीकडे वेधशाळा महापूर आणि अतिवृष्टीचे इशारे देत आहे. असं चहुबाजूच्या संकटानं वेढलेल्या ब्रिटनला संकटातून बाहेर काढण्याचं डोंगराएवढं आव्हान लिझ यांच्यासमोर आहे.

त्यांच्या मंत्रिमंडळात विविध वंशांच्या मंत्र्यांना महत्त्वाची खाती दिली आहेत. भारतीय वंशांचे अालोक शर्मा आणि गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन (४२) यांची आई तामिळी आणि वडील गोव्याचे मूळ रहिवासी आहेत. क्वासी क्वार्नेग हे पहिले कृष्णवर्णीय चान्सलर आहेत. त्यांचे पूर्वज घानाचे रहिवासी आहेत. लिझ यांच्या मंत्रिमंडळात २३ पैकी आठ स्त्रिया म्हणजे फक्त ३५% आणि प्रत्यक्ष लोकसंख्येत ५१% स्त्रिया आहेत. मात्र भारतात अजूनही स्त्रियांचं प्रमाण नगण्य आहे. ते वाढण्यासाठी विधानसभा, लोकसभेमध्ये महिलांना किमान ३३% आरक्षण हवं. पण हे बिल गेली पंचवीस वर्षं लोंबकळत आहे. स्त्रिया राजकारणात आल्यानं स्त्रीवादी राजकारण म्हणजे वंचित-शोषितांच्या, दुर्लक्षित अल्पसंख्याकांच्या आणि स्त्रियांच्या हिताचं राजकारण होईल याची काहीच शाश्‍वती नाही. उलट या पुरुषप्रधान राजकारणात आक्रमक, सत्ताकांक्षी स्त्रियाच उतरून ‘यशस्वी’ होऊ शकतात हे दु:खद वास्तव आहे. तरीही राजकारणात स्त्रियांची संख्या तरी वाढायलाच हवी, असं ठामपणे म्हणायला हवं. महिला पंतप्रधान लिझ बड्या उद्योगपतींना बढावा देणाऱ्या, आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीच्या पाठीराख्या आहेत. ग्रीन लेव्ही काढून टाकत रिन्युएबल एनर्जीला पुरस्कृत करण्याऐवजी पर्यावरणाला घातक असणारा गॅस आणि खनिज तेल जास्तीत जास्त मिळवण्याच्या त्या मागे आहेत. हे पर्यावरणाची हानी करणारं आहे. श्रीमंतांचे टॅक्स कमी करण्यावर त्यांचा भर आहे. त्यांच्या परदेश मंत्री निर्वासित आणि आसरा शोधणाऱ्या बेघरांविरुद्ध कडक कारवाई करणार आहेत. एकूणच गरीब आणि विशेषत: महागाईमुळे हैराण झालेल्या एकल महिलांना आपल्या मुलांचं पोट भरणंही अवघड होणार आहे. असं महिला नेतृत्व आम्हाला अपेक्षित नाही, असं आमच्या स्त्रीवादी आणि पर्यावरणवादी ब्रिटिश मैत्रिणींचं स्पष्ट मत आहे.

चोहोबाजूंनी संकटानं घेरलेल्या ब्रिटनला त्यातून बाहेर काढण्यासाठी लिझ यांच्या कारभार कौशल्याचा, मुत्सद्देगिरीचा आणि धडाडीचा कस लागणार आहे. अतिशय आत्मविश्‍वासानं त्यांनी त्रिवार घोषणा दिली आहे, ‘We will deliver!’ त्यात या तरुण ‘आयर्न लेडी’ला यश मिळो ही सदिच्छा!

डॉ. गीताली वि. म. संपर्क : saryajani@gmail.com

बातम्या आणखी आहेत...