आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:अन्नामुळे नव्हे, तर प्रेमामुळे मिळते दीर्घायुष्य!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

या गणेश चतुर्थीला एक मोबाइल फॉरवर्डमध्ये श्रीगणेश आणि त्याचा उंदीर तक्रार करताना दाखवण्यात आले की, आम्ही इतक्या वेळेपासून इथे आहोत, पण ते कुटुंब बघा, सर्व जण आपापल्या फोनमध्ये व्यग्र आहेत. हे बघून मला हसू आले. मग मीही पूजेनंतर तेच करत होतो, कारण त्या दिवशी मुंबईत सुटी होती. तेवढ्यात आणखी दोन मेसेज आले. एक फ्रान्सचा होता. त्यात १२ भावंडांच्या कुटुंबाबद्दल सांगण्यात आले, त्यात सर्वात मोठी व्यक्ती ११३ वर्षांची आणि सर्वात छोटी ९० वर्षांची आहे आणि ते सर्व जिवंत आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड््समध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. दुसऱ्या मेसेजमध्ये आपण सात प्रकारचे आरोग्यदायी स्नॅक्स कसे खाऊ शकतो हे सांगितले होते. माणसे मुळात स्वार्थी असल्याने मी प्रथम सात निरोगी स्नॅक्सकडे वळलो. स्नॅक्सची नावे वाचून मला धक्काच बसला, कारण त्यात सफेद मुसळी बार, पीनट बटर ग्रॅनोला (फायबर रिच ओट्स), प्रोटीन बार, ग्रॅनोला कुकीज आणि मखाने यांचा समावेश होता. विश्वविक्रम करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी हे पदार्थ कधी खाल्ले असतील का, असा प्रश्न मला पडला. मग मी त्या लोकांनी काय खाल्ले आणि ते कसे जगले यावर संशोधन करायला सुरुवात केली.

डिक्रूझ कुटुंबातील सर्व १२ सदस्यांच्या नावावर सर्वाधिक एकत्रित वयाचा विक्रम नोंदवला गेला आहे. १५ डिसेंबर २०२१ रोजी या कुटुंबाचे एकूण वय १०४२ वर्षे, ३१५ दिवस होते. २०२१ मध्ये डिक्रूझ भावंडांचे वय ७५ ते ९७ वर्षे होते, म्हणजेच व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीमध्ये सांगितलेले ९० ते ११३ वर्षे वय चुकीचे होते. याचा अर्थ फेक न्यूज हा संपूर्ण जगाचा आजार आहे. या सर्व भावंडांचा जन्म कराचीत झाला. गेल्या काही वर्षांत त्याचे कुटुंब कॅनडा, अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये पसरले. सर्वांचा जन्म २२ वर्षांच्या कालावधीत झाला असल्याने त्यांच्या आईचे सर्वात महत्त्वाचे काम त्यांच्या मुलांची काळजी घेणे होते. त्यापैकी एका ८४ वर्षीय व्यक्तीने सांगितले की, मला माझ्या आईची सर्वात जास्त आठवण येते ती म्हणजे तिने आम्हा सर्वांची खूप काळजी घेतली. नऊ दशकांपूर्वी घराघरात असलेले साधे अन्नपदार्थ सर्व बंधू-भगिनी जेवत. पण, या मोठ्या कुटुंबात प्रेम, काळजी आणि एकमेकांसोबत शेअर करण्याच्या भावना होत्या. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ-बहिणी जगाच्या वेगवेगळ्या भागांत गेले, पण एकमेकांच्या संपर्कात राहिले. ते लंडनच्या वेळेनुसार दररोज सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतात. यादरम्यान ते आपल्या जुन्या दिवसांबद्दल बोलतात. त्यांची चर्चा कधीच संपत नाही आणि ते दररोज दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओ कॉलची वाट पाहत असतात.

हे ऐकून मला माझे बालपण आठवले, तेव्हा मी माझी बहीण आणि इतर नातेवाइकांसह २१ किंवा १० दिवसांच्या उत्सवात दररोज १०८ गणेश मंडळांना भेटी देत ​​असे. त्या काळी पायी चालणे आणि सायकलिंग हेच वाहतुकीचे साधन असल्याने आमच्याकडे बोलण्यासाठी खूप काही असायचे. आमच्याकडे हे तथाकथित हेल्दी बार विकत घेण्यासाठी पैसे नसायचे आणि त्या काळी मिळतही नसत, म्हणून आम्ही घरूनच आमचे स्नॅक्स नेत असू. कधी कधी स्नॅक म्हणून दही-भात, सोबत लोणचे असायचे.

फंडा असा ः ज्यांना दीर्घायुष्य जगायचे आहे त्यांनी घरी शिजवलेले, ताजे अन्न अवश्य खावे; पण त्याहीपेक्षा प्रेम, काळजी आणि कुटुंबात परस्पर संबंध यांसारख्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...