आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परग्रहा’वरून पत्र:प्रेम आणि क्रौर्य

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय मित्र-मैत्रिणींनो, सध्या दोन घटनांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. एका घटनेत एका पुरुषाने लिव्ह-इन नात्यातील जोडीदाराने लग्नाचा आग्रह केल्यामुळे तिचा खून केला आणि मृत देहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले आणि त्यांची एकेक करून विल्हेवाट लावली. दुसऱ्या घटनेत एका सुस्थितीतील तरुणाला अनेक मुलींनी लग्नासाठी नकार दिला, म्हणून त्याने आत्महत्या केली. आपण सध्या प्रेमाविषयी बोलत आहोत. या दोन्ही घटनांत प्रेमाशी संबंधित एक पैलू– हिंसा व क्रौर्य–आपल्या समोर आलाय.

वरकरणी दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. पहिल्या घटनेतील पुरुष नि:संदेह क्रूरकर्मा आहे. जी मुलगी सारे काही सोडून, घराचा, समाजाचा विरोध पत्करून त्याच्याबरोबर राहत होती, तिचा त्याने अतिशय क्रूरपणे खून केला आणि त्यानंतरचे त्याचे वर्तन तर महाभयंकर होते. दुसऱ्या घटनेतील पुरुष मात्र सर्वांच्या सहानुभूतीचा विषय झालाय. त्याला नकार देणाऱ्या मुली दुष्ट, असंवेदनशील आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होतेय. त्याशिवाय पहिल्या घटनेतील पुरुषाचा धर्म वगैरे अनेक बाबींना घेऊन उलटसुलट चर्चा होतेय. मी या दोन्ही घटनांच्या विशिष्टतेत न शिरता त्या निमित्ताने पुरुषी मानसिकता आणि सामाजिक वर्तन याबद्दल आपल्याला काय शिकता येते एवढेच मांडणार आहे. लिव्ह-इन नाते नैतिक की अनैतिक, हा लव्ह जिहादचा प्रकार आहे का, हे मुद्दे माझ्या लेखी गैरलागू आहेत. कारण यापूर्वी विविध धर्मांतील पुरुषांकडून आपली प्रेयसी-मैत्रीण-गर्लफ्रेंड-पत्नी-नकार देणारी कोणतीही स्त्री यांच्या अमानुष हत्येची अनेक उदाहरणे देशात, महाराष्ट्रात घडली आहेत. लिव्ह-इन नात्यातील बहुदा पहिलेच असे प्रकरण बाहेर आले परंतु, विवाहांतर्गत किंवा विवाहबाह्य संबंधांत असे प्रकार घडल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे पहिल्या प्रकरणातील मुख्य मुद्दा आहे पुरुषाचे अमानुष वर्तन, त्यातून साकार होणारी हिंसा व क्रौर्य. नव्वदच्या दशकात कोणा रिंकू पाटीलला तिच्या तथाकथित प्रियकराने परीक्षा हॉलमध्ये जिवंत जाळले होते आणि त्या क्रौर्याने अवघा महाराष्ट्र हादरला होता. गेल्या काही वर्षांत आपण इतकी ‘प्रगती’ केली आहे की या घटनांचे आपल्या (एकूणच भारतीय) समाजाला फारसे काही वाटेनासे झाले आहे. ‘मला हवी असलेली स्त्री मला नाही म्हणते म्हणजे काय? मी तिला तिच्या या मर्यादाभंगाची शिक्षा देणारच’, या पुरुषी वृत्तीतून अशा शेकडो घटना घडल्या आहेत. एखाद्या स्त्रीने संबंध ठेवले, पण त्याचबरोबर सुरक्षिततेची, लग्नाची अपेक्षा व्यक्त केली आणि ती पुरुषाला मान्य नसली, तर तेव्हाही तिला धडा शिकविण्यासाठी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावून ती क्रूरपणे अंमलात आणणे हादेखील त्याच पुरुषी वृत्तीतील मालकी हक्काचा आविष्कार आहे. आपल्या समाजरचनेतून पुरुषप्रधानतेची मूल्ये पुरुषांच्या आणि स्त्रियांच्याही मनात खोलवर रुजतात. त्यातूनच अशा घटना घडतात व त्यांचे समर्थन करण्याची प्रवृत्तीही फोफावते. एखाद्या निर्भयाला न्याय मिळावा म्हणून आपण मोर्चा काढतो किंवा बलात्कारी पुरुषाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून तावातावाने बोलतो तेव्हा आपल्यातली पुरुषी वृत्ती, मालकी हक्काची भावना उखडून फेकण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. आपल्या ‘फ्रेंडशिप’च्या प्रस्तावाला किंवा ‘व्हॅलेंटाईन डे’च्या गुलाबांना नकार देणाऱ्या मुलीला ‘पाहून घेण्याची’ भाषा आपण करत असू किंवा तिची बदनामी करत असू तर आपल्याला बलात्काराबद्दल बोलण्याचा काहीही हक्क नाही, हे तरुणांनी ध्यानात ठेवावे. दुसऱ्या जातिधर्माच्या स्त्रीवर बलात्कार करण्यात ‘आपल्या’ पुरुषांचा पुरुषार्थ आहे, असे मानणाऱ्या स्त्रियाही त्याच पुरुषी मानसिकतेच्या प्रतिनिधी आहेत. स्त्री-पुरुषांचे नाते कोणतेही असो, त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रीच्या मतांचा, नाही म्हणण्याच्या अधिकाराचा सन्मान व्हायलाच हवा. ज्या प्रेमात मालकी हक्काची भावना आहे, समोरच्या व्यक्तीला गृहीत धरणे आहे, तिच्या मताचा आदर नाही, ते मुळात प्रेमच नाही. दुसऱ्या घटनेतील पुरुषाने स्त्रीवर अन्याय केलेला नाही, तिच्यावर हिंसा केली नाही, पण त्याने स्वतःवरच हिंसा केली आहे. एका अर्थाने तेही क्रौर्यच आहे. त्यामागील कारण आहे त्याची हताशा, आपण कोणालाच हवेसे वाटत नाही, ही भावना. पुरुषांच्या बाबतीत असे क्वचित घडते. हे कृत्यदेखील मनाच्या असुरक्षिततेतून घडले आहे. असुरक्षित, भीतीग्रस्त माणसे नेहमीच हिंसेकडे वळतात – ती जमावाचा भाग असतात, तेव्हा ती इतरांवर हिंसा करतात. एकटे पडतात तेव्हा ते स्वतःवर हिंसा करतात. अशी माणसे, मग ती स्त्री असोत वा पुरुष, कोणावर प्रेम करू शकत नाहीत. कारण इतरांवर प्रेम करण्यापूर्वी तुमचे स्वतःवर प्रेम असणे आवश्यक असते.

‘माझ्यावर समोरच्या व्यक्तीने प्रेम करावे, यासाठी मी काय करावे?’ असे विचारणारे फोन अलीकडे मला वारंवार येतात. मी काही ‘लव्हगुरू’ नाही पण, मी एवढे नक्कीच सांगेन की तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःला आहोत तसे स्वीकारा. आत्मपरीक्षण करून आपल्यातील दोषांचे निराकरण करून गुणांना उजाळा देण्याचा प्रयत्न करा. मोकळे व्हा, व्यापक व्हा. नकार मिळाल्यावर रडत बसू नका. कोणत्याही अपयशाने खचू नका. काहीही विनासायास, सहज मिळेल अशी अपेक्षा करू नका. लढणारी, झुंजार, प्रेमळ माणसे नक्कीच ‘लव्हेबल’ असतात. रूप, पैसा, शारीरिक सामर्थ्य या खूप छोट्या बाबी आहेत. स्वतःचे (तसेच समोरच्या व्यक्तीचे) मूल्यांकन या निकषांवर करू नका. प्रेम ही सशक्त, सुदृढ मनाच्या, खंबीर, ‘देण्यातील आनंद समजलेल्या’, झुंजार स्त्री-पुरुषांनी करण्याची, समजून घेण्याची, निभावण्याची गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला प्रेमाच्या लायक बनवा. या निमित्ताने साऱ्या आईवडिलांना विनंती - तुमची मुले – मुलगे व मुली – ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे आहेत, हे ध्यानात ठेवा. त्यांचा आत्मविश्वास फुलवा, तो खच्ची करू नका. त्यांच्या चुकांची जाणीव त्यांना करून द्या. त्यांना झुंज द्यायला, अपयश पचवायला शिकवा. मुख्य म्हणजे प्रेम म्हणजे हळुवारपणा, संवेदनशीलता, समजून घेणे आणि समजावणे. प्रेम म्हणजे मालकीहक्क नव्हे, तर आपलेपणा, प्रेम म्हणजे शौर्य, क्रौर्य नव्हे, हे आपल्या वर्तनातून त्यांच्यासमोर ठेवा. कबीराच्या उक्तीप्रमाणे प्रेमाची अडीच अक्षरे वाचून आपण सारेच पंडित होऊ या! तुमचा प्रेमळ मित्र

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ संपर्क : ravindrarp@gmail.com

बातम्या आणखी आहेत...