आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजा गतिक बॉक्सिंग (मुष्टियुद्ध) चॅम्पियनशिप स्पर्धेत लवलिना बोर्गोहेनचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. या आधी तिने जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन वेळा कांस्यपदक जिंकलं आहे. लवलिनाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारी लवलिना दुसरी बॉक्सर आहे. यापूर्वी तिने मोठ्या स्पर्धांमध्ये कांस्यपदकांची कमाई केली आहे. त्यामुळं सुवर्णपदकासाठी तिचे प्रयत्न सुरू होते. बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटातून खेळताना ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करून दाखवणारी लवलिना आसामची पहिलीच महिला बॉक्सर आहे. चायनीज तैपेईच्या निएन चिन चेन या बॉक्सरला धूळ चारत तिने पुढच्या फेरीत प्रवेश केला होता. चिन चेन ही माजी जागतिक विश्वविजेती खेळाडू आहे. तिने अनेक वेळा लवलिनाला पराभूत केलं होतं. २०१८ च्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिने लवलिनाला हरवलं होतं. लवलिनाने आपल्या या पराभवाची परतफेड तर केलीच, शिवाय पदकावरही स्वत:चे नाव कोरले. लवलिनाला माइक टायसन आणि मोहंमद अली यांच्यासारख्या बॉक्सर्सची शैली आवडते. पण, कठोर मेहनतीच्या बळावर तिने स्वतःची एक वेगळी शैली विकसित केली आहे. ती ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करते. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारो मुखिया गावात ती राहते. तिचे वडील छोटे व्यावसायिक आहेत, तर आई गृहिणी. लवलिनाने खेळात आपलं करिअर बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची परिस्थिती अतिशय गरीब होती. पण, त्या अडचणींना मागे टाकत तिने हे यश प्राप्त केलं. लवलिना आणि तिच्या दोन मोठ्या बहिणी मिळून एकूण तीन मुली त्यांच्या घरात आहेत. मोठ्या बहिणींप्रमाणेच लवलिनानेही किक बॉक्सिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना आजूबाजूच्या लोकांकडून अनेकदा टोमणेही ऐकावे लागायचे पण त्याकडे साफ दुर्लक्ष करून लवलिनाने खेळावर आपलं लक्ष केंद्रित केलं. तिच्या बहिणींनी राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावलं. पण, लवलिनाचं स्वप्न त्याहून मोठं होतं. ती प्राथमिक शाळेत शिकत असताना एका चाचणीदरम्यान प्रशिक्षक पादुम बोरो यांनी तिच्यातील कौशल्य ओळखले आणि तिला मार्गदर्शन केले. तेव्हापासून म्हणजेच २०१२ पासून तिचा बॉक्सिंगमधील प्रवास सुरू झाला. पाच वर्षांच्या आतच लवलिनाने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदकापर्यंत मजल मारली. नंतर मजल-दरमजल करत ती ऑलिम्पिकपर्यंत पोहोचली. आता जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत निर्णायक पंच मारत सुवर्णपदक पटकावून तिने आपलं सोनेरी स्वप्न साकार केलं आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.