आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Madhurima Special Article | Nitin PotlaSheru Special Madhurima Article | Divya Marathi | Chehyyamgachan Unhealthy Reality...

मधुरिमा स्पेशल:चेहऱ्यांमागचं अस्वस्थ वास्तव...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २०२५ पर्यंत अभ्रक खाणीतील बालमजुरी संपवण्याचे ध्येय

अभ्रक खाणीतील बालमजुरी रोखण्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांनी मोठे काम केले आहे. कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन (Kailash Satyarthi Children’s Foundation-KSCF) ही वेबसाइटही चालवली जाते. यावर विविध क्षेत्रांतील बालमजुरीवर लक्ष वेधले असून त्यांच्यासाठी केलेल्या कार्याची माहिती आहे. याच साइटवर दिलेल्या माहितीनुसार, झारखंडच्या कोडरमा, गिरिडीह जिल्ह्यांत ४५४५ तर बिहारच्या नवादा जिल्ह्यात ६४९ बालकामगार अभ्रक खाणींमध्ये काम करतात. एका जागतिक रिपोर्टनुसार तर येथे २२ हजारांपेक्षा अधिक बालकामगार असल्याचे म्हटले गेले आहे.

बालकांची पिळवणूक थांबवण्यासाठी व त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सत्यार्थी यांच्या फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रम राबवला जात आहे. यात झारखंड सरकार, स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन मुलांना शिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याचेच फलित म्हणून खाणीत काम करणाऱ्या अनेक मुलांनी दहावी, बारावीत सर्वोत्तम गुण घेत स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली आहे. २०२५ पर्यंत बालमजुरी पूर्णपणे रोखण्याचा उद्देश फाउंडेशनने ठरवला आहे. फाउंडेशनने ‘बालमित्र ग्राम’ ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली.

या माध्यमातून गावातीलच शिकलेली खाणीत काम करणारी मुले गावातील इतर मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगतात आणि त्यांना हक्काची जाणीव करून दिली जाते. बालकांच्या मानसिक, शैक्षणिक विकासासाठी हे पाऊल अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

मनगटावरील घड्याळाव्यतिरिक्त अंगावर एकही दागिना नाही. मेकअप तर सोडाच, चेहऱ्यावर साधी पावडरही लावलेली नाही, अशा केरळमधील मल्लकपुरमच्या जिल्हाधिकारी राणी सोईमोई कुठल्या तरी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. तितक्यात एक मुलगी त्यांना “मॅडम, आपण मेकअप का करत नाही?’ असा प्रश्न विचारते. त्याचे उत्तर देताना राणी झारखंडच्या कोरडमा जिल्ह्यातील अभ्रक खाणींमधील बालपण आणि मेकअप न वापरण्याचे कारण सांगू लागतात तेव्हा वातावरण एकदम धीरगंभीर होऊन जाते.

उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणवतात. तीन, पाच मिनिटांचे प्रेरणादायी, अंगावर शहारे आणणारे भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागते अन् त्या महिला आयएएस प्रत्येक तरुणाच्या रोड मॉडेल बनून जातात. मूळ मल्याळी लेखकाच्या ‘थ्री वुमेन’ या पुस्तकातील ‘शायनिंग फेसस’ या लघुकथेतील हे काल्पनिक पात्र पाहता पाहता व्हॉट‌्सअॅप स्टेटस, इन्स्टाग्रामवर रील्स आणि फेसबुकच्या वॉलवर झळकू लागते. सोशल मीडियावर ही संघर्षकथा वाचताना वा पाहताना ती खरी मानून आपण त्या राणीच्या कर्तृत्वाला सलाम करतो.

संघर्षाची परिसीमा म्हटलं की, सोशल मीडियावर प्रसारित झालेला राणीचा तो चेहरा समोर यायला लागतो. पण, काल्पनिक राणीच्या वाटेला आलेले अठराविश्वे दारिद्य्र, दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठीचा संघर्ष झारखंड, बिहारच्या हजारो बालकामगारांना दररोज करावा लागतो, याकडे मात्र कुणाचे लक्ष जात नाही. राणीची कथा काल्पनिक असली तरी या कथेच्या माध्यमातून समोर आलेले वास्तव आपण नाकारू शकत नाही.

किलो, दीड किलो अभ्रक खाणीतून काढण्यासाठी आजही झारखंडच्या कोडरमा, गिरिडीह व बिहारच्या नवादा जिल्ह्यात हजारो कोवळे हात खाणींमध्ये भुयार खोदून अंधकारमय भविष्याची वाट धुंडाळत आहेत. एकीकडे ही बालके व त्यांचे पालक खाणींमध्ये अख्खे आयुष्य खपवत आहेत, तर दुसरीकडे, त्यांनी खणून काढलेल्या अभ्रकाच्या बळावर ब्यूटी इंडस्ट्रीचा पसारा जगभरात वाढत आहे. कोरोनानंतर तर खाणीत काम करणाऱ्या बालकांना व कामगार असलेल्या त्यांच्या पालकांना अभ्रकाची किलोमागे मिळणारी ३५ ते ४० रुपयांची मजुरी २०-२५ रुपयांवर येऊन ठेपली आहे.

बिहार व झारखंडमधील तीन जिल्ह्यांत अभ्रक उद्योगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. येथे हजारो मुलांना खाणींमध्ये अभ्रक खणून काढण्यासाठी कामाला जुंपले जाते. मुलांचे शरीर लवचिक असल्याने ते खाणीमध्ये सहजपणे बोगदा करत खोलवर जाऊ शकतात आणि जास्तीत जास्त अभ्रक मिळेल यासाठी त्यांचा अधिकाधिक वापर होतो. कुटुंबातील मोठ्यांनाही या भागात रोजगार मिळत नसल्याने मुलांचा आधार घ्यावा लागतो. तसे केले नाही तर दोन वेळचे अन्नही त्यांना मिळणार नाही अशी भयावह परिस्थिती सध्या आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील मुले या दुष्टचक्रात अडकलेली आहेत. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून तर ही मुले खूप दूर गेली आहेत.

शाळेत का जात नाही, असा प्रश्न जर त्यांना कुणी केला तर पोट कसे भरणार, असा प्रतिप्रश्न मुलांकडून आणि त्यांच्या पालकांकडून केला जातो. त्यांच्या आरोग्याचे प्रश्नही भयंकर आहेत. आठ ते दहा तास खाणीत खोदकाम करून त्वचेचे, श्वसनाचे आजार त्यांना जडत आहेत. दिवस उजाडला की छन्नी व हातोडा घेऊन खाणींमध्ये दिवस जात असल्याने बाहेरचे जगच जणू ते विसरून गेले आहेत. पुरेसे अन्न मिळत नसल्याने कुपोषणाची समस्याही येथे निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी अवैधरीत्या अभ्रकासारखे खनिज उपसण्याचे काम केले जाते. त्यामुळे येथे कायदा पाळण्याचा प्रश्नच नसतो. जास्तीत जास्त मुलांना येथे जुंपले की कमी पैशात अधिक खनिज संपत्ती मिळवता येत असल्याने बालहक्कांचा कुणीही विचार करत नाही.

अनेकदा तर खाणीतील बोगद्याचा मलबा पडून अनेक मुलांना जीव गमवावा लागला. एकीकडे कोवळे जीव गमावले जात असताना दुसरीकडे मात्र अभ्रक उद्योग वेगाने पसरत असल्याचे दिसते. लुसिंटेल ग्लोब मॅनेजमेंट कन्सल्टिंग व मार्केट रिसर्च कंपनीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी २०२५ पर्यंत जगभरातील अभ्रक उद्योग ५३ अब्जांपेक्षा अधिक असणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा उद्योग विस्तारत असेल तर आणखी किती जीवांना गमवावे लागेल, किती मुलांचे बालपण हिरावले जाईल याचा विचार करून अंगावर काटा उभा राहतो.

अभ्रक आणि सौंदर्य प्रसाधन उद्योग
अभ्रकाचा वापर बांधकाम उद्योग, प्लास्टिक इंडस्ट्री, पेंट, कोटिंग, छपाईची शाई, तेल उद्योग, ऑटोमोटिव्ह उद्योगात होतो. परंतु सर्वाधिक वापर कॉस्मेटिक आणि पर्सनल केअरच्या उद्योगात होतो. सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील नामांकित ब्रँड्स झारखंड व बिहारच्या अभ्रकाच्या साठ्यावर चालतात. ज्या मजुरांना एका किलोमागील अभ्रकासाठी ४० ते ५० रुपये दिले जातात, त्याच अभ्रकाचा वापर करून तयार केलेल्या ब्यूटी प्रॉडक्ट‌्सच्या काही ग्रॅमसाठी हजारो रुपये उकळले जातात. यातील किती कंपन्या खरोखर अभ्रक खाणीत राबणाऱ्या बालकामगारांचा विचार करत असतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

अनेक कंपन्या आपल्या उत्पादनाची विक्री वाढावी व सामाजिक कार्य म्हणून उत्पादन खरेदी करा, त्यातील काही पैसे गरीब, वंचित मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करू, असा आव आणतात. पण असे करताना मदत कमी अन् स्वत:च्या उत्पादनाची ब्रँडिंग अधिक केली जाते. एखादे उत्पादन घेऊन आपणही समाजातील वंचित घटकाची मदत करतोय आणि राष्ट्रीय विकासात आपणही हातभार लावत असल्याचा गैरसमज ग्राहकांमध्ये व्यवस्थितरीत्या पसरवला जातो. उजळ रंगाच्या व्यक्तीपर्यंत एखादे उत्पादन पोहोचले की सावळ्या रंगांच्या लोकांपर्यंत तेच उत्पादन पोहोचवण्यासाठी कंपन्या ब्रँडमधील ‘फेअर’ शब्द वगळतात आणि तेथे ‘ग्लो’ करून टाकतात. अनेक वर्षे झाल्यानंतर आपल्या उत्पादनाच्या नावातून वर्णभेद होत असल्याची उपरती होते.

प्रत्यक्षात मात्र अधिकाधिक लोकांपर्यंत उत्पादन पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुसरीकडे, जागतिक पटलावर भारताला मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. जगातील प्रत्येक नामांकित ब्रँड भारतात त्यांची उत्पादने विकण्यासाठी उत्सुक आहे. येथील बाजाराची क्षमता मोठी असल्याने प्रत्येक जण येथील स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज आहे. सुश्मिता सेन, ऐश्वर्या राय-बच्चन, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियंका चोप्रा, लारा दत्ता या सौंदर्यवतींनी जागतिक पटलावर देशाचे नाव कोरले आणि यंदाच्या वर्षीही चंदीगडच्या हरनाज संधूने विश्वसुंदरीचा किताब मिळवला. जगात भारताला इतका बहुमान मिळत असताना जगातील ब्यूटी इंडस्ट्रीतील नामांकित ब्रँडचे लक्ष येथील व्यवसायावरही आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

केरळमधील मल्लकपुरमच्या जिल्हाधिकारी राणी सोईमोई यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. हा व्हिडिओ काल्पनिक असला तरी त्यानिमित्तानं पुढं आलेलं वास्तव सद्सद‌्विवेक जागा असणाऱ्यांना अस्वस्थ करणारं आहे. व्यवस्थेवर, समाज मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. सौंदर्य प्रसाधनांत होणारा अभ्रकाचा वापर, हे अभ्रक मिळवण्यासाठी केलं जाणारं बालकामगारांचं शोषण, सौंदर्य प्रसाधन निर्मिती कंपन्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन अशा विविध अंगांविषयी चर्चा करणारा हा लेख.

नितीन पोटलाशेरू
{ संपर्क : 888884008

बातम्या आणखी आहेत...