आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरुवातीचा थोडासा काळ सोडला तर लतादीदी स्वत:च्या अटी-शर्तींवर आयुष्य जगल्या. द्विअर्थी, कॅब्रेवरची गाणी त्यांनी कधीच गायली नाहीत. दर्जेदार वागणं, बोलणं, एकूणच अभिव्यक्ती. अत्यंत खानदानी. फिल्म आणि संगीतासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात त्यांनी गुणवत्तेने आणि कष्टाने अतुलनीय स्थान निर्माण केलं. जीवनाचा सर्वांगांनी फार लोभस आस्वाद घेतला. क्रिकेट असेल, कारची आवड असेल, हिऱ्यांचे कानातले असतील वा पांढरीशुभ्र पैठणी असेल...
लता मंगेशकर गेल्या...खूप काही वाटतंय. पण हे वाटणं सांगता येत नाहीये, शब्दांत मांडता येत नाही अशी अवस्था आहे. आयुष्यात फार क्वचित वेळा भावना शब्दांत पकडता येत नाही. त्यातली ही वेळ.आणि हे भयंकर त्रासदायक आहे...
काय उत्तुंग जगणं आहे लतादीदींचं...निसर्गानं दिलेल्या प्रतिभेचं, देणगीचं चीज करायला अफाट कष्ट उपसावे लागतात.नुसती देणगी असून उपयोगाची नाही. ते अफाट कष्ट लतादीदींनी केले आणि निसर्गाकडून आणि वडिलांकडून मिळालेल्या गुणाचं सोनं केलं. वयाच्या ५ व्या वर्षी त्या पहिल्यांदा गायल्या. संध्याकाळची वेळ होती. मास्टर दीनानाथ मंगेशकर आपल्या शिष्याला राग पुरिया धनाश्री शिकवत होते. काही काम आलं म्हणून ते बाहेरून जाऊन येतो म्हणाले आणि शिष्याला रियाज करायला सांगितला. तो शिष्य प्रॅक्टिस करायला लागला तशा ५ वर्षांच्या लतादीदी त्याला म्हणाल्या, “तू चुकीचं गातो आहेस.’ त्याने विचारलं, ‘मग बरोबर कसं म्हणायचं?’ दीदींनी त्याला गाऊन दाखवलं. हे सर्व दारात उभं राहून दीनानाथ मंगेशकर ऐकत होते.त्यांना काय समजायचे ते समजले. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता लतादीदींचा दीनानाथ मंगेशकरांसोबत रियाज सुरू झाला.खरं तर पुरिया धनाश्री हा संध्याकाळचा राग आहे, पण तरीही मास्टर दीनानाथांनी त्याच रागाने लता मंगेशकरांच्या गाण्याची सुरुवात केली. या रागात एक गांभीर्य आहे, वजन आहे आणि उदासीही आहे. दीदींचं जीवनही असंच होतं का प्रसन्न, उदास आणि गंभीर!
३७ पेक्षा जास्त भाषा, ७० वर्षे आणि ५० हजारांपेक्षा जास्त गाणी गाणी. हे अशक्य आहे. माणूस जीवनापेक्षा मोठा होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे लता मंगेशकर. सज्जाद हुसेन म्हणाले ते सर्वात अँप्ट आहे. ‘मैं उपर ख़ुदा को और नीचे लता को मानता हूँ...’
आचार्य अत्र्यांनी पण फारच यथार्थ म्हटलंय, ‘अतिपरिचयानेही ज्याची अवज्ञा झाली नाही असा आवाज म्हणजे लताचा आवाज.’
‘अपनी निजता में रहो’...ओशो म्हणत. गाणं आणि स्वर ही ‘निजता’ वयाच्या पाचव्या वर्षीच लता मंगेशकरांना सापडली. ती त्यांनी अव्यभिचारी निष्ठेनं सांभाळली. जावेद अख्तरांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, एकदा सकाळी त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला निघाल्या तर खाली घरात इन्कम टॅक्सचे अधिकारी त्यांच्याकडे येऊन बसले होते. दीदींना त्यांनी सांगितलं, ‘काही समस्या आहेत.’ दीदी म्हणाल्या, ‘मी आता तर तुमच्याशी बोलू शकत नाही, माझं रेकॉर्डिंग आहे. आपण रेकॉर्डिंग झाल्यावर बोलू.’ अधिकारी म्हणाले, ‘हरकत नाही, आम्ही तुमच्या गाड्या जप्त करतो.’ दीदी म्हणाल्या, ‘चालेल.’ दीदींनी लगेच कागदावर सह्या केल्या. दीदी त्यांना म्हणाल्या, ‘रेकॉर्डिंगला गाडी घेऊन जाऊ शकते का?’ तर अधिकारी हसत म्हणाले, ‘हो, रेकॉर्डिंगला घेऊन जा. मग आम्ही नेऊ.’ दीदी गाण्याच्या रेकॉर्डिंगला गेल्या. त्या म्हणाल्या, ‘गाणं म्हणताना इन्कम टॅक्सचे लोक आले आहेत. गाड्या जप्त केल्या. आता काय होईल असा कोणताही विचार माझ्या मनात नव्हता. दुसरी कोणतीही व्यक्ती असती तर गाड्या जप्त केल्या... आता काय होईल? आणखी काय करतील? असे विचार मनात आले असते. रेकॉर्डिंग कॅन्सल केलं असतं. पण लतादीदींनी असं केलं नाही. थोडक्यात, गाण्याशी त्यांचे काय इमान होते ते यातून दिसून येते.
रॉयल्टीवरून मोहंमद रफी आणि राज कपूर यांच्याशी त्यांचा झालेला वाद प्रसिद्ध आहे. स्वत: लता मंगेशकर यांनीच तो किस्सा सांगितला आहे. स्वत:च्या न्याय्य हक्कांबाबत जागरूक असणं हेच यातून दिसतं. राज कपूर जेव्हा त्यांना म्हणाले की, मी इथे व्यवसाय करायला, नफा कमवायला आलो आहे तेव्हा दीदींनी ताडकन ‘मी पण काही राणीच्या बागेत फिरायला आले नाही,’ असं उत्तर दिलं होतं.
आयुष्यात वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी वडील गेल्यावर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मेकअप करून अभिनयही त्यांनी केला, जो त्यांना अजिबात म्हणजे अजिबातच आवडत नसे. चेहऱ्याला रंग लावणे आणि अभिनय करणे हे त्यांच्या अत्यंत नावडीचं काम होतं. ती तडजोडही काही काळ त्यांनी केली. या सगळ्या कठोर वास्तवानं लता मंगेशकर यांची व्यवहाराची समज विलक्षण पक्की झाली. कलाकार हे अनेकदा आत्यंतिक अव्यवहारी असतात, त्यांना व्यवहार समजत नाही आणि समजला तरी त्यात रस असत नाही. पण लतादीदींना असं राहून चालणार नव्हतं. आई, तीन बहिणी आणि भाऊ यांची जबाबदारी होती. १३ वर्षांच्या लतादीदींना जगानंच व्यवहारात पक्कं केलं.
सुरुवातीचा थोडासा काळ सोडला तर त्या आयुष्य आपल्या अटी-शर्तींवर जगल्या. द्विअर्थी, कॅब्रेवरची गाणी त्यांनी कधीच गायली नाहीत. पांढरीशुभ्र साडी आणि खांद्यावर पदर. अत्यंत खानदानी, दर्जेदार वागणं, बोलणं, एकूणच अभिव्यक्ती. फिल्म आणि संगीतासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात त्यांनी गुणवत्तेने आणि कष्टाने अतुलनीय स्थान निर्माण केलं.
जीवनाचा फार लोभस असा सर्वांगांनी त्यांनी आस्वाद घेतला. क्रिकेट असेल, कारची आवड असेल, हिऱ्यांचे कानातले असतील...वा पांढरीशुभ्र पैठणी असेल. आयुष्यात काही तडजोडी अपरिहार्य असतात, त्याचा समंजस स्वीकार केला तर ती तडजोड सुंदर होते. देखणी होते. पण लतादीदींना जीवनानं ‘अनंत हस्ते कमला वराने देता किती देशील तू दो कराने’ असं दिलं ही. अर्थात, हे आपल्याला वाटतं. पुनर्जन्म असला तर तो लता मंगेशकरचा नको असंही त्या म्हणाल्या होत्या. ‘लता मंगेशकर होने की तकलिफे किसी को पता नहीं’ हे त्यांचं विधान होतं.
मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांना मास्टर दीनानाथ मंगेशकरांचे रेकॉर्ड्स मागवले आणि त्या ते ऐकत होत्या.मृत्यूची चाहूल लागल्यावर शेवटी त्यांना वडिलांचीच आठवण यावी. काय विचार करत असतील? १३ वर्षांपर्यंतच्याच वडिलांच्या आठवणी. वडिलांवर किती नितांत प्रेम होतं त्याचं. काय आठवत असतील त्या...
इतकी गाणी आहेत, पण लता मंगेशकर गेल्यापासून त्याचं ‘ये जीवन है, इस जीवन का, यही है, यही है, यही है रंगरूप’...लता मंगेशकर गेल्यापासून मी किमान ५० वेळा तरी हे गाणं ऐकलंय...आणि सतत ऐकतेय...पहिल्यांदाच जाणवलं असं वाटतंय दीदी स्वत:ला आणि आपल्या सर्वांनाच समजावून सांगताहेत...’थोड़े ग़म हैं, थोड़ी खुशियाँ..यही है..यही है..यही है छाँव धूप’....
नाना पाटेकरांचा दीदी गेल्यावर मेसेज आला. इतका वेगळा प्रश्न पडला नानांना... ‘स्वर्गाच्या प्रवासात दीदींनी मृत्यूला कुठल्या गाण्यानं रिझवलं असेल? मधे कुठेतरी थांबले असतील, दीदी गातेय आणि साथीला मृत्यू...काय मैफल असेल...?’
वसुंधरा काशीकर
संपर्क : vasundhara.rubaai@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.