आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Madurima Valentine Day Special Article Divya Marathi | Pallavi Dalal Special Valentine Day Article Madurima | Marathi News

व्हॅलेंटाइन डे स्पेशल:मुरलेलं लोणचं

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालपणापासूनची मैत्री, नंतरच्या अल्लड वयात बहरलेलं प्रेम आणि या नात्यावर कळस चढवणारं विवाहबंधन... कुठल्याही सिनेमाला साजेशी इतर चारचौघांसारखी प्रेमाची गोष्ट. फक्त या गोष्टीत एकच ट्विस्ट होता - ‘ग्लुकोमा’मुळे त्याची दृष्टी क्षीण होत जाणार याची तिला पूर्ण कल्पना होती. तिने त्याच्या दृष्टीपेक्षा स्वत:चा दृष्टिकोन चाचपडला आणि त्याच्याशीच विवाह करण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. आज त्यांचा संसार म्हणजे १५ वर्षांचं मुरलेलं लोणचं आहे...

९० च्या दशकातला तो काळ. ‘दिल तो पागल हैं’ आणि ‘कुछ कुछ होता हैं’ सारख्या चित्रपटांनी तरुणाईला घातलेली भुरळ. आजच्यासारखा समाजमाध्यमांचा गंधही नसलेली तेव्हाची पिढी एकमेकांकडे चोरून बघणं, त्याच्यासाठी असणारी ती आणि तिच्यासाठी असणारा तो यांचा भिरभिरत्या नजरेने कायम शोध ठेवणं, मैत्रिणींनी चिडवलं की ‘आला बघ तुझा बॉबी देओल..’ तेव्हा पुस्तकातून चमकून वर बघणं आणि मित्रांच्या कंपूतून समोरच्या मुलींच्या घोळक्यात नेमकी तिची अनुपस्थिती सतावत राहणं अशा एक ना अनेक गोष्टींचे भावविश्व असणारे ते वय आणि त्याच वयात माझी आणि निकेतची ओळख वाढली. लहानपणापासून सोबत खेळणारे आम्ही आता कॉलेजच्या कट्ट्यावर तासन् तास घालवत असू. प्रेमाच्या कुठल्याही आणाभाका घेतलेल्या नसतानाही मला आणि त्याला मनातून पक्के ठाऊक होते की आपले नाते आयुष्यभरासाठी आहे.

एखाद्या वेळी माझ्यापेक्षा इतरांना जास्त वेळ दिल्यावर होणारी माझी तगमग आणि माझ्या तीन-चार दिवसांच्या अबोल्यानंतर त्याच्या मनाची अस्वस्थता हे आमच्या पुढच्या सहजीवनाचे सुंदर चित्र रंगवायला पुरेसे होते. प्रत्येक व्हॅलेंटाइन डेला घेतलेला तो निर्णय आजही मला प्रत्येक व्हॅलेंटाइन डेला आठवतो. आज निकेतच्या आणि माझ्या संसाराला १५ वर्षे पूर्ण होतील. अनेक चढउतार या काळात अनुभवले. क्षीण होत जाणारी त्याची दृष्टी कायमस्वरूपी जाऊनही बराच काळ लोटला. या काळात निकेतने स्वतःच्या कर्तृत्वावर अनेक यशाची शिखरे पार केली. दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो हे आम्हा दोघांना वेळोवेळी पटले. खचून न गेलेल्या निकेतने दृष्टी गेल्यानंतर क्रीडाविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. माझ्यासाठी आनंदाचा परमोच्च क्षण तो होता - जेव्हा आयर्नमॅन स्पर्धा यशस्वी करणारा प्रथम अंध भारतीय व्यक्ती तो ठरला. याव्यतिरिक्तही सायकलिंग, स्विमिंग, रनिंगच्या वेगवेगळ्या स्पर्धांतील पदकांनी कपाटं गच्च भरली आहेत.

त्याच्यासोबत विश्वासाने बाइकवरून मागे बसून लांब लांब फिरताना दिवस, महिने आणि वर्ष भराभर संपत होते. आजही तो दिवस स्पष्टपणे आठवतो, ज्या दिवशी आमच्या नात्याने एक वेगळे वळण घेतले. “इथून पुढे भेटायला नको” असे त्याच्या तोंडून ऐकल्यावर क्षणभर मन सुन्न झाले. कारण होते त्याची क्षीण होत जाणारी दृष्टी. याची मला पूर्वीपासूनच कल्पना होती की, निकेतला ग्लुकोमा नावाचा डोळ्यांशी संबंधित डोळ्यांचा आजार आहे. पण याची तीव्रता इतकी वाढेल अन् आमचे नाते कायमस्वरूपी तुटेल याची मात्र कल्पना नव्हती. आणि इतके दिवस होत नसलेला निर्णय पक्का झाला की आपण लग्न करायचे. त्याच्या मनाची अस्वस्थता मी समजू शकत होते. पण तो माझ्यासाठी इतका महत्त्वाचा होता की इतर कोणत्याही गोष्टींची मला फिकीर नव्हती. मला त्याच्या मन, बुद्धी आणि कर्तृत्वावर पूर्णपणे विश्वास होता. मी त्याला एकच प्रश्न विचारला ‘हेच माझ्या बाबतीत लग्न झाल्यावर झाले असते तर तू काय केले असते?’

माझ्यापुरती मी खंबीर होते. उलट कुटुंबाला आणि समाजाला हे वास्तव पटवून देण्याची दुहेरी जवाबदारी माझ्यावर होती. नोकरदार गृहिणीपासून ते आज एक यशस्वी उद्योजिका हा प्रवास आमच्यातील प्रेम-विश्वास, एकमेकांना समजून घेण्याची तयारी आणि एकमेकांच्या चुका दाखवून देण्याची हिंमत यामुळेच शक्य झाला.

मुरलेले लोणचं जसं जास्त चविष्ट लागतं तसंच मुरलेल्या प्रेमाचेही असते असे मला वाटते. कारण प्रेमाचा अनुभव आणि आपल्या माणसाचं प्रेम अनुभवत राहणं यासारखी दुसरी कुठलीही गोष्ट आयुष्याला सुंदर बनवू शकत नाही.

माझ्याप्रमाणेच कुटुंबातील सर्व व्यक्तींनाही माझा निर्णय योग्य होता हे कधीच मान्य केले आहे. निकेत त्याच्या या आयुष्यात परत उभे राहण्याचे व यशाचे श्रेय नेहमी मला देत असतो. पण मनातून मला माहीत आहे की मीच त्याच्याकडे बघून वेळोवेळी उभारी घेत असते. मला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तो खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा असतो.

पल्लवी दलाल
संपर्क : 7776907353

बातम्या आणखी आहेत...