आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:महाविकास आघाडीची एकी भाजपसाठी धोक्याची घंटा, तीन दशकांपासून वर्चस्व असलेली ‘कसबा पेठ’ गमावली

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ महिन्यांपूर्वी सत्तानाट्य घडवून शिंदे- फडणवीस सरकार सत्तारूढ झाले. ‘महाराष्ट्राच्या जनतेने अडीच वर्षांपूर्वी दिलेला हाच खरा कौल आहे. २०२४ मध्येही जनता आम्हालाच सत्ता देईल,’ असा दावा दोन्ही पक्ष करत आहेत. पण सत्तेवर आल्यानंतरही शिक्षक, पदवीधर निवडणुकीत मात्र भाजपवर नागपूर, अमरावती या बालेकिल्ल्यातच पराभवाची नामुष्की ओढवली. याचे कारण म्हणजे मविआने एकत्रित दिलेले आव्हान. याच कारणामुळे भाजपला तीन दशकांपासून वर्चस्व असलेली ‘कसबा पेठ’ गमवावी लागली. सहानुभूतीच्या लाटेवर चिंचवडची जागा राखली तरी तिथेही मविआचा उमेदवार व उद्धव सेनेचा बंडखोराच्या मतांची बेरीज केली तर ती भाजपवर भारी पडते, हे दुर्लक्षित करून चालणार नाही.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देशात मोदी लाटेचा कितीही फायदा झाला तरी महाराष्ट्रात मात्र मविआच्या आव्हानाला तोंड देताना भाजपची कसोटी लागणार आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्याची जी खेळी खेळली गेली त्यामुळे उद्धवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेसमध्येही भाजपविरोधात प्रचंड असंतोष आहे. याचा हिशेब चुकता करण्यासाठी तिन्ही पक्षांकडून आगामी निवडणुका एकसंघपणे लढवण्याची रणनीती आखली जात आहे. या एकीचे ‘फळ’ आघाडीने नागपूर, अमरावती व कसब्यात चाखले आहे. आघाडीची ही एकी भाजपसाठी धोक्याची घंटा असेल. त्यामुळे तिन्ही पक्षांत बिघाडीचे डावपेच खेळले जाऊ शकतात. पण हे करताना हक्काच्या मतदारांना गृहीत धरण्याची व उमेदवार लादण्याची जी चूक कसब्यात केली गेली ती भविष्यात सुधारली नाही तर भाजपला त्याचा मोठा फटका राज्यभर बसू शकतो.

बातम्या आणखी आहेत...