आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Maharashtra Corona Divyamarathi Opinion We No Longer Have Room For Shameless Politics!

दिव्य मराठी भूमिका:निर्लज्ज राजकारणाला यापुढे आमच्याकडे जागा नाही!

9 महिन्यांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

आम्ही आज असा निर्णय घेत आहोत - निरर्थक आणि संवेदनशून्य राजकीय शेरेबाजीच्या बातम्या खातरजमा केल्याशिवाय आम्ही यापुढे प्रसिद्ध करणार नाही. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. पण इथे पेटलेल्या चितांमुळे राज्य होरपळत असताना तुम्हाला हे गलिच्छ खुर्चीकारण सुचतेच कसे?

‘कोरोना’चा कहर वाढत चालला आहे. अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पंढरीचा विठुराया स्वतः भक्तांपासून दूर उभा आहे. पण, त्याच पंढरपुरात राजकारण्यांची मात्र एकमेकांवर चिखलफेक सुरू होती. सरकार पाडण्यासाठी आसुसलेले विरोधक आणि विरोधकांवर हल्ला चढवणारे सरकार. यात कोणालाही लोकांचे काही पडलेले नाही.

राजकारण्यांनी जो स्तर आज गाठला आहे, त्यामुळे हे नक्की आपलेच प्रतिनिधी आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप खरे असतील, तर ते फारच भयंकर आहे. रेमडेसेविर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी महाराष्ट्रात इंजेक्शन पुरवठा करायला नकार दिला, कारण केंद्राने त्यांना धमकी दिली. हे खरे असेल तर कोणाकडून काय अपेक्षा करायची? महाराष्ट्राला केंद्राकडून पुरेशी लस मिळत नाही. जीएसटीचे राज्याचे पैसे केंद्राने थकवून ठेवले. गेल्या वर्षी पीपीई किट आणि इतर साहित्याची निर्यात सुरू ठेवली, नंतर बंद केली. पण राज्यांना खरेदीचे अधिकार नाकारले, असेही आरोप आहेत.

भारतासारख्या प्रगल्भ लोकशाही देशातच, केंद्र आणि राज्य यांच्यात हे असे वैमनस्य असेल; राज्यातील नेते एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग असतील, तर अशा नेत्यांची, नेतृत्वाची लायकी लोकांनी ओळखली पाहिजे. राज्यातल्या भाजप नेत्यांनी आपली सगळी शक्ती एकवटून केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळवून दिली पाहिजे. पण, ते इकडे बघत नाहीत. सरकारलाही पुरेसे गांभीर्य नाही. तिकडे सहकारातल्या एकाही दिग्गजाला ‘कोरोना’वर मात करण्यासाठी मदतीचा हात पुढे करावासा वाटत नाही.

राज्य सरकारला ‘क्लिनिकल मॅनेजमेंट’ करता येत नाही. सगळीकडे चित्र विषण्ण करणारे आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी फोन केला, तरी बेड वा व्हेंटिलेटर मिळू नये, अशी स्थिती आहे. त्यात राज्य सरकारच्या व्यवस्थापनाचा अभाव कसा आहे, हे आम्ही साधार सिद्ध केले आहे. केंद्राला तर इथेही राजकारण दिसते. निवडणुकांच्या सभांसाठी हवा तेवढा वेळ असणारे पंतप्रधान महाराष्ट्र जळत असताना नक्की कोणते वाद्य वाजवत आहेत? आणि, त्यांचे राज्यातले नेते कोणत्या मस्तीत रोज तोंड वाजवत आहेत? प्रवीण दरेकरांना रेमडेसेविर मिळत असतील, तर त्या कंपन्या राज्य सरकारला इंजेक्शन का देत नाहीत? या अशा काळात कुंभमेळा मात्र होत असतो. त्याला कोणी रोखत नाही. पाच राज्यांतल्या निवडणुकांचा ज्वर उतरत नाही. राज्यातच नाही, देशात शब्दशः स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मध्य प्रदेश आणि गुजरात सरकार मृतांचे आकडे कसे लपवते, हेही आम्ही साधार मांडले आहे. महाराष्ट्रात अशी आकड्यांची फसवाफसवी दिसत नाही, हे चांगलेच आहे. पण, बाकी आघाड्यांवर इथेही निराशा आहे.

सगळ्यांनी मिळून लढायला हवे, असे संकट समोर उभे असताना राजकीय नेत्यांचे हे काय सुरू आहे? ‘कोरोना’वर मात करता येऊ शकते. पण, या घाणेरड्या राजकारणावर कशी मात करणार? या कठीण काळातही यांना गलिच्छ ‘खुर्चीकारण’ सुचत असेल, तर हीच ती योग्य वेळ आहे, या निर्लज्ज राजकारण्यांना धडा शिकवण्याची.

म्हणून, आम्ही असा निर्णय घेत आहोत - आजपासून आम्ही अशा निरर्थक आणि संवेदनशून्य राजकीय शेरेबाजीच्या बातम्या खातरजमा केल्याशिवाय प्रसिद्ध करणार नाही. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. पण, इथे घरोघरी माणसं व्याकुळ असताना, बेड- ऑक्सिजनसाठी, औषधांसाठी रांगा लागलेल्या असताना, पेटलेल्या चितांमुळे राज्य होरपळत असताना तुम्हाला हे गलिच्छ खुर्चीकारण सुचतेच कसे? तुमच्या या पापात वाटेकरी व्हायची आमची तयारी नाही. आणि, हेही लक्षात ठेवा : तुमच्या पापाचा घडा आता भरलेला आहे. महाराष्ट्राची जनता तुम्हाला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही.

संजय आवटे, राज्य संपादक

बातम्या आणखी आहेत...