आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी भूमिका:हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरं तर राज्यपाल या प्रतिष्ठित घटनात्मक पदावरील व्यक्तीचे भाष्य ज्ञानाधारित सत्याला प्रमाण मानून केलेले असायला हवे. इथे तसे झाले नाही. राज्यपालांनी पुन्हा मनाचे संदर्भ जोडत महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा... आपला अपमान केला हे दुर्दैवच. राज्यपालांच्या वक्तव्याने वाद व्हावा एवढ्यापुरतेच हे दुर्दैव नाही, तर उत्तराखंडचा एक माणूस महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाला कमी लेखतो आणि तो महाराष्ट्राचा राज्यपाल आहे, हे खरे दुर्दैव आहे. आता वाद पेटल्यानंतर राज्यपालांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत सारवासारव सुरू केली आहे. वाद पेटल्यानंतर राज्यपाल “मी आता मराठी शिकलो आहे,’ असे सांगत आहेत. ते मराठी भाषा शिकलेही असतील, परंतु मराठी माणूस त्यांना अजूनही पुरता समजलेला नाही. राज्यपालांचे कार्य, वर्तणूक आणि जबाबदाऱ्या याबाबत राज्यघटनेत स्पष्ट उल्लेख आहेत. परंतु, या राज्यपालांनी ते वाचले असेल असे वाटत नाही.

मुंबई आणि ठाण्याच्या प्रगतीमध्ये गुजराती आणि राजस्थानी माणसाचे योगदान काय आहे हे जाणून घेण्यासाठी मराठी माणसाला राज्यपालांची काय गरज? मुंबई आमची, ठाणे आमचे, इथे पैसा कुणाचा आहे हे तुम्ही आम्हाला शिकवणार? गुजराती आणि राजस्थानी लोकांविरुद्ध मराठी माणसाला भडकावून राज्यपाल इंग्रजांच्या “फोडा आणि राज्य करा’ नीतीसारखे हे कोणते राजकारण करत आहेत? आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आज आणि यापुढेही मुंबई हीच देशाची आर्थिक राजधानी राहील. मुंबई-ठाण्यातील आर्थिक शक्ती ही मराठी माणसाचीच शक्ती आहे. उद्या हे राज्यपाल नसतील, पण हा मराठी बाणा आणि शक्ती अबाधित राहणार आहे. आज आपल्याकडे राज्यपालपद आहे, ते उद्या नसेल हे भान भगतसिंह कोश्यारींनी ठेवायला हवे. ते ठेवायचे नसेल तर मराठी माणसाचा असा अपमान महाराष्ट्र आता सहन करणार नाही.

प्रणव गोळवेलकर,

राज्य संपादक

बातम्या आणखी आहेत...