आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातलं काही:बापाविना माहेरपण..

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई-बाबांच्या छत्रछायेखाली लहानपण कसे सरून जाते कळत नाही. तापाने फणफणलेल्या लेकीजवळ रात्रभर उशाला बसून थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत जागणारे बाबा, सायकल शिकवताना मी मागे धरलंय तू चालव म्हणून आत्मविश्वास देणारे बाबा, लेकरांच्या शिक्षणासाठी कष्ट करणारे बाबा ते सासरी पाठवणी करताना गहिवरून रडणारे बाबा ही सगळी रूपे डोळ्यात साठवून माहेरच्या घराच्या परिपूर्ण वातावरणातून सासरी येतानाही ते प्रेमाचे, काळजीचे सुरक्षाकवच सोबत असतेच. मनातला अदृश्य आधार जाणवत राहतो.

कोरोनाने मात्र माणसांचाच नाही तर अशा कित्येक जाणिवांचा बळी घेतला. कोरोनाने बाबा गेल्यानंतर माहेरी जाण्याचा पहिलाच प्रसंग. माहेरच्या दारात गाडी येऊन थांबली आणि लगबगीने बॅगा घेण्यासाठी, नातवाला जवळ घ्यायला येणारे हात कुठेच दिसेनात तेव्हा मनात धस्स झालं. प्रवासातही कुठपर्यंत पोहोचलात हे वारंवार विचारणारा फोन त्या दिवशी आलाच नाही. घरात आलो. आई सामान घ्यायची धडपड करू लागली. तिच्याकडे तर पाहायचीही हिंमत होईना. इतक्या मोठ्या घरात एकटी कशी राहील, कल्पनेनेच मन सुन्न झाले. बाबा नसताना, तिथे राहताना कित्येक आठवणींनी मन भरून येत होते. आवडीचे पदार्थ करून खाऊ घालण्याची त्यांना हौस होती. घरातल्या प्रत्येक वस्तूला त्यांचा स्पर्श होता. डोळे झाकून शोधलं तरी प्रत्येक वस्तू जागेवर सापडावी अशी शिस्त असणाऱ्या बाबांना नजर एकसारखी शोधत होती. आयुष्यात पहिल्यांदा इतकी कमालीची पोकळी जाणवत होती. दररोज सकाळी चहा, नाष्टा, पुन्हा चहा, भरपूर गप्पा. यात रमलेले दिवस आठवत होते. त्यांच्या हातचे अतिशय सुंदर चवीचे पिठले, वांग्याची भाजी असायची. लेकरं आली म्हणून सारखे पिशवी घेऊन खाण्यासाठी नवनवीन पदार्थ, खेळणी आणायला जाण्यात त्यांना खूप आनंद वाटायचा. हे सगळे आठवून मन गलबलून येत होतं.

रस्त्यावरून येणारा-जाणारा परिचित आठवणी काढत बोलत राहायचा. इतरांना सातत्याने मदत करणे हाच स्थायीभाव असल्याने ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे. संपूर्ण आयुष्य कष्टमय गेलेले. त्यात अपघाताने आलेले अपंगत्व. सगळं स्वीकारून समाधानाने राहायचे. त्यांच्या या साध्या-सरळ स्वभावाचा फायदा अनेकांनी घेतला. पण हे माहिती असूनही ‘ती त्यांची वृत्ती’ म्हणून सोडून द्यायचे. हे सगळे आठवताना मनाला अधिकच अपराधी वाटू लागले. आपले प्रयत्न कमी पडले का? वाचवता आले असते का ? या विचाराने मन बधिर झाले. ना शेवटचे दर्शन घेता आले ना मनोभावे नमस्कार करता आला. सहजपणे बॅग घेऊन माणूस गावाला निघावा तसे त्यांचे जाणे. घरातले चैतन्यतत्त्वच नाहीसे झाल्यासारखे वाटू लागले. संपूर्ण घर जिथे पोरके झाले होते त्याच घरात मी आपुलकीचा माणूस शोधत होते. घराच्या मागच्या खोलीत कव्हर घालून ठेवलेला मृदंग आणि हार्मोनियमकडे लक्ष गेलं अन् मनाचा बांध फुटला. हार्मोनियमवर सहजतेने फिरणारे त्यांचे हात आणि आवाजात कमालीची आर्तता. दर एकादशीला भजनात पांडुरंगाच्या मूर्तीसमोर गाणे म्हणणारे बाबा मला दिसू लागले. ‘देवा तू माझी माउली...’ बाबांनी आयुष्यभर ज्या विठ्ठलाची भक्ती केली त्या पांडुरंगाने आम्हा लेकरांची ‘माउली’ अशी हिरावून न्यायला नको होती...

स्वाती कुलकर्णी - फलटणकर संपर्क : ९८५०८८३०८८

बातम्या आणखी आहेत...