आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातीगोती:आदर आणि प्रेमाने करा वैवाहिक नाते दृढ

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीचे नाते खूप दृढ असते. परंतु बदलत्या काळानुसार हे नातेही बदलत आहे. एकमेकांच्या सवयी न आवडणे किंवा न आवडणाऱ्या व्यवहारामुळे या नात्यात कटुता येणे अशाच समस्यांमध्ये आणि सवयींमध्ये बदल कसे करता येतील याबाबतच जाणून घेऊया. एकमेकांच्या वेळेचा आदर लग्नापूर्वी एकमेकांना असलेल्या काही सवयी पती-पत्नी बदलण्याचा प्रयत्न करतात. अशाच छोट्या गोष्टींचे रूपांतर भांडणात होत असते. म्हणून दोघांनीही एकमेकांच्या वेळेचा आणि पसंतीचा आदर करायला हवा. प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची एक स्पेस असते ती परस्परांना द्यायला शिका.

अवास्तव दखल नको पसंती सारखी नसल्यामुळे पती-पत्नींमध्ये कायम भांडणे होतात. उदा. खरेदीला गेल्यावर पसंती वेगवगेळी असल्यामुळे दोघांमध्ये कुरबुर होते. खर्च जास्त होणं, खरेदीसाठी खूप वेळ लागणं यामुळेही भांडणं होतात. अवास्तव दखल देण्याच्या सवयींमुळे तणाव येऊ नये वाटत असेल तर एकमेकांच्या पसंतीचा आदर करा. स्वत:ची पसंती समोरच्यावर थोपवू नका.

खोटं बोलण्याची सवय पती-पत्नीच्या नात्यांचा पायाच विश्वास असतो. बरेचदा पती-पत्नी एकमेकांपासून गोष्टी लपवतात आणि एकमेकांशी खोटं बोलायला लागतात. एखादी गोष्ट छोटी असो वा मोठी, खोटं बोलणं किंवा खरं लपवणं वैवाहिक नात्यांमधील भांडणाचं मोठं कारण बनतं. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरची एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती स्पष्टपणे आणि प्रेमाने त्यालाच सांगा, दुसऱ्यांना सांगू नका. स्पष्ट बोलल्यामुळे तुमच्यातला दुरावा कमी होऊ शकतो. स्पष्ट बोलणे तुमच्या पार्टनरलाही आवडू शकते. खोटं बोलणं,गोष्टी लपवणं ही सवय नात्यात दुरावा आणू शकते.

टोमणे मारण्याची सवय सोडा एकमेकांना टोमणे मारल्यामुळं नातं बिघडतं. कडू-गोड कुरबुर प्रत्येक नात्यासाठी गरजेची असते. परंतु टोमणे मारण्याच्या सवयीमुळे व्यक्तीच्या मनावर आघात होतो. मन दुखावलं जातं. जे पती-पत्नी एकमेकांना मित्र मानतात, त्यांचे वैवाहिक आयुष्य खूप आनंदी आणि सुखी होते. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीने त्रस्त असाल तर आपल्या पार्टनरसोबत शेअर करा, “तू समजूच शकत नाहीस’, असे जर टोमणे मारले तर त्याला किंवा तिला इच्छा असूनही तुमची समस्या जाणून घेण्यास त्याला भीती वाटेल.

मतभेद आणि मनभेद होऊ देऊ नका थोडीफार भांडणं सर्वच नात्यांमध्ये होतात. मतभेद हा पती-पत्नीच्या नात्यातील एक भाग आहे, परंतु मतभेदाचे रूपांतर कधी मनभेदात होते हे कळतच नाही. काही लोकांना एखाद्या गोष्टीचा कीस पाडण्याची किंवा जुने उकरून काढण्याची सवय असते. या सवयीमुळे मतभेद होतात आणि मग हळूहळू एकमेकांबद्दल मनात अढी निर्माण होण्यास सुरुवात होते. भांडण किंवा वादविवादात स्वत:चा अहंकार मध्ये आणू नका. यामुळे गोष्टी बिघडतात. जुन्या गोष्टींना मागे सोडून पुढे चला.

टीम मधुरिमा

बातम्या आणखी आहेत...