आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामकृष्णहरी जय जय राम । राजाराम रामकृष्णहरी जय जय...
हे स्वर पखवाज - मृदुंगावरची थाप, झांज - टाळांचा नाद, नामाचा घोष आणि सर्वशक्तिमान परब्रह्माचा जयजयकार करणाऱ्या अशा कीर्तन क्षेत्राकडे मूलतः सात्त्विक प्रवृत्तीचा कोणीही मनुष्य आकर्षिला जाणारंच. आजपर्यंत पुरुष कीर्तनकारांच्या या क्षेत्रात आता महिला कीर्तनकारही अत्यंत समर्थपणे स्वत:चा ठसा उमटवताना दिसतात. समर्थ रामदास स्वामींच्या अनुग्रहाने कीर्तन करणाऱ्या वेण्णास्वामी, तुकारामांच्या अनुग्रहाने कीर्तन करणाऱ्या शिऊरच्या बहेणाबाई पाठक यांंनी कीर्तनामधून प्रपंचाकडून परमार्थाकडे जाण्याचा मार्ग जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. कीर्तनात अशी शक्ती आहे की देव डोलतो, म्हणजे त्यातून आत्मप्रकाशाचे स्वच्छ भान येते. माणसे जोडली जातात. सर्वांना समान पातळीवर आणणारे कीर्तन ही भक्ती आहे आणि नवरसात्मक अनुभूती देणारे प्रबोधनाचे दृकश्राव्य माध्यमही आहे.
सुमारे तीन हजार वर्षापूर्वी उत्तर वैदिक पुराणकाळात भारतीय परंपरेचा उदय झाला. नारद, शुकाचार्य, परीक्षिती यांनी कीर्तन केल्याचे उल्लेख भागवतात मिळतात. मध्ययुगाच्या तेराव्या – चौदाव्या शतकात परचक्रे परसत्तांचा प्रादुर्भाव झाला. प्राचीन संस्कृतीचे वैभव लुप्त होऊ लागले. अशा परिस्थितीत देश, धर्म, संस्कृती आणि समाजरक्षणाचे अवघड कार्य भक्ती संप्रदायांनी पार पडले. यासाठी कीर्तन हे प्रसार-प्रचाराचे प्रभावी माध्यम म्हणून वापरले गेले. आजही पाश्यात्य संस्कृतीचे अंधानुकरण, भोगवादी विचारसरणी, ताणतणावाचे जीवन, विचारांचा संकुचितपणा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विज्ञानयुगामध्ये झपाट्याने बदलणारे विचारप्रवाह हे भारतीय संस्कृती प्रदूषित करत आहेत. संस्कृती हे इतिहासाचे प्रधान अंग मानले तर कीर्तन हा संस्कृतीचा सर्वोच्च मानबिंदू आहे. साहित्य, शास्त्र, तत्त्वज्ञान, कला, संगीत, अभिनय या संस्कृतीच्या मुख्य अंगांचे मूर्तिमंत दर्शन कीर्तनातून घडते. मराठवाड्याचा विचार करता महिला नारदीय कीर्तनकार कमीच आहेत. पुरुषी संस्कृतीचे प्राबल्य, तत्कालीन निजामी राज्यातील दडपशाही, स्त्री शिक्षणाचा अभाव, धार्मिक आणि सामाजिक सनातनीपणा, स्त्री वर्गाचा बुजरेपणा तसेच महिला मुक्ती चळवळीचा अभाव या कारणांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळात येथे फारसे स्त्री कीर्तनकार निर्माण झाले नाहीत. मात्र, हैदराबाद मुक्तिआंदोलनात काही धैर्यवान महिला कार्यकर्त्यांचा उदय झाला. मराठवाड्याच्या मुक्तीनंतर महाविद्यालयीन, विद्यापीठीय उच्च शिक्षणाचा प्रसार झाला. अनेक ठिकाणी संगीत विद्यालये, सभा, संमेलने, शिबिरे, परिषदा आणि व्याख्याने यामधून सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले. या पोषक वातावरणाचा परिपाक म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षित महिला कीर्तनकारांचा उदय झाला.
मुंबई- पुण्याप्रमाणे मराठवाड्यात कीर्तनाचे प्रशिक्षण देणारी महाविद्यालये आणि संस्था नाहीत. मोठ्यांची कीर्तने ऐकून, अनुकरण करून, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून, संगीताची साधना करून स्वकष्टाने या महिला कीर्तनकार नावारूपाला आल्या. यामध्ये अभ्यासू, निष्ठावंत कीर्तनकार म्हणून शैलजा नीलकंठ भोगले यांचे नाव घ्यावे लागेल. डॉ. विजयालक्ष्मी श्रीकांत बर्जे या शासकीय महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापिका आवड म्हणून कीर्तन करत असत. कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्त्या, आकाशवाणीच्या ‘ब’ श्रेणीच्या कीर्तनकार, प्रसिद्ध कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या धर्मपत्नी आणि देविदासराव मांडे यांच्या कन्या असलेल्या प्रज्ञा भरतबुवा रामदासी एक अभ्यासू कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. दासगणू पद्धतीने कीर्तन करणाऱ्या आणि गोरठे संस्थानची यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या व्यासंगी व अभ्यासू कीर्तनकार म्हणून वसुमती उर्फ गार्गी देशपांडे यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या परंपरेत प्रसिद्धिपराङ्मुख, पण निष्ठावंत पाईक म्हणून बासरीबाई मोहनपूरकर, प्रा. मीरा शेंडगे, सौ. दमयंती पाचलेगावकर, मंगला कुलकर्णी, प्रभाताई कुलकर्णी, प्रमिलाताई रोजेकर, शशिकला देव, सौ. सामग, गोदावरीबाई आणि राधाबाई साठे यांचा उल्लेख करावा लागेल. प्रा. स्मिता प्रभाकरराव आजेगावकर, सुषमाताई धांडे याही प्रथितयश आघाडीच्या कीर्तनकार आहेत. याच उज्ज्वल परंपरेची पाईक होण्याची पात्रता रुजवण्याचा प्रयत्न मी सुद्धा करीत आहे. आकाशवाणीची कीर्तनाची परीक्षा ‘बी हाय ग्रेड’मध्ये उत्तीर्ण केली असून, कीर्तनशास्त्र विषयात पी. एचडी. देखील पूर्ण केली आहे. या क्षेत्रामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. अनेक महिला कीर्तनाचे शास्त्रोक्त शिकण घेत आहेत. कीर्तनकाराला आवश्यक गुणांमध्ये वक्तृत्व, संगीत, नाट्य, संवाद, अभिनय, विनोद यांचा समावेश होतो. महिलांमध्ये यापैकी काही गुण देवदत्त असतात. “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी” असे म्हणतात. संस्कार-संस्कृतीचे बाळकडू आईकडून मिळते, त्याच्या उद्धाराची धडपड मातृत्वाकडून कर्तृत्वाकडे सतत प्रवाही असते, नव्हे हा स्त्रीचा मूलभूत गुण आहे. गृहलक्ष्मीपद सांभाळून ती प्रबोधन मनरंजन, भजन, भोजन सतत करत असते. आपले मत उत्तमपणे बोलून श्रोत्यांना प्रभावीपणे पटवता आले पाहिजे. आई ही न बोलणाऱ्या आपल्या बाळाशी बोलते, संवाद साधते त्याला शहाणे करते, असे शहाणे करण्याचे कौशल्य जन्मजात घेऊन आलेली स्त्री उत्तम कीर्तनकार आहे. साने गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे, स्त्रीकडे उत्तम प्रतिभा, प्रतिमा ठासून भरलेली आहे, याचे दर्शन महिला कीर्तनकारांच्या कीर्तनातून प्रत्ययास येते. महिला दारासमोरील रांगोळी काढण्यापासून ते देवासामोरील दिवा लावण्यापर्यंत छोट्या छोट्या कृतीतून संस्कृती-संस्कार करते. प्रबोधनकार महिला सृजनाचा हुंकार जपते. म्हणूनच महिला कीर्तनक्षेत्रातून प्रभावी कार्य करताना दिसतात. त्या पोटभर खाऊ घालतात आणि हिताच्या चार गोष्टी सांगतात. कीर्तनातून देहप्रदर्शन नाही, तर बुद्धिमत्तेचे दर्शन घडते. मूलतः स्त्रिया चिकित्सक आणि संशोधकवृत्तीच्या असतात. स्वतःला पटल्याशिवाय कृती करत नाहीत. हे गुण प्रबोधन करण्यासाठी पोषक ठरतात. ‘श्यामची आई’ आपल्या रोजच्या प्रबोधनातून ‘श्याम’ घडवते. इरावती कर्वे यांना ‘दिनूची आई’ हा परिचय परिपूर्णता देतो. हे माउलींच्या कीर्तनातून प्रगटते तेव्हा कीर्तन मनोरंजनाबरोबर अंजन घालणारे ठरते. हे सामर्थ्य महिला कीर्तनात असते.
महिला आपल्या घरासाठी, आपल्या कामासाठी हातचं राखून काही ठेवत नाहीत, सतत उभ्याच असतात. कीर्तनाचा हा स्थायीभाव आहे की ‘जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे’ त्यामुळे कीर्तनाकडे महिलांची स्वभावतः ओढ आहे. काळानुरूप अभ्यासून, परिश्रमपूर्वक कीर्तन आत्मसात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले. ही खूप आनंददायी अभिमानाची बाब आहे. आपला व्याप आवरून सावरून जेव्हा झांज घेऊन नामाच्या गजरातून नाद प्रकट होतो तेव्हा लोकांचे लक्ष आपल्या हिताचे बोल ऐकायला मिळणारा हा भाव जागा करते. कीर्तनातून चिंतन हे चिंताहरणाचे साधन आहे, याचे दर्शन घडते. सर्व कलांची जननी म्हणजे कीर्तनकला असे म्हटले जाते. काव्यशास्त्रविनोद याबरोबर संगीत-नृत्य-नाट्य यांचा पूर्ण समावेश कीर्तनात आढळून येतो. स्थळ कालानुरूप या सर्वांचा प्रयोग करून कीर्तन समृद्ध होताना दिसते. महाराष्ट्राची ओळख म्हणजेच कीर्तन. पारंपरिकतेबरोबरच आधुनिकताही जोपासली जाईल इतके कीर्तन सृजनशील आहे. त्यामुळे वेळोवेळी अनेक वर्षे याच्या स्वरूपात बदल होताना दिसतात. कीर्तनाच्या या वारशाने महिलांची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. समाजप्रबोधनाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी भविष्यात आणखीही ‘सरस्वती’च्या साधक महिला पुढे सरसावतील, अशी आशा आहे... (लेखिका कीर्तनशास्त्र विषयात पी.एचडी. मिळवणाऱ्या मराठवाड्यातील पहिल्या महिला कीर्तनकार आहेत.)
संपर्क : 9423778651
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.