आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव:आदमी औरत के साथ सोता है, जागता क्यों नहीं?

राखी राजपूत4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“मर्द ने औरत के साथ अभी तक सोना ही सिखा है, जागना नहीं...’ अमृता प्रीतमचं हे वाक्य जितक्या वेळा वाचलं तेव्हा हे कालातीत सत्य आहे, जे कधीच बदलणार नाही, असंच वाटतं. कारण काळ बदलला तरी परिस्थितीनुरूप समाजाची बाईकडे बघण्याची दृष्टी मात्र बदलू शकली नाही. याचा अनुभव गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या विषयांवर काम करण्याची वेळ आली तेव्हा जास्त आला. त्यातही नुकताच स्त्रीत्वाचा अर्थ कळू लागलेल्या वयात गौरी देशपांडे, अमृता प्रीतम, नीरजा, तस्लिमा नसरीन, इस्मत चुगताई अशा अनेक विद्रोही, बंडखोर लेखिकांचे साहित्य वाचण्यात आल्याने वेगळ्या स्त्रीवादी विचारधारेने मनात घर केलं.

पण या लेखिकांच्या साहित्यातील नायिका जगत असलेल्या आयुष्यापेक्षा वास्तवातल्या माझ्या आजूबाजूच्या आणि खरं तर सगळ्याच बायकांचे आयुष्य किती वेगळं आहे हे जाणवलं. अर्थात विद्रोह, बंडखोरी सगळ्यांनाच जमते असं नाही. शिवाय स्त्रियांच्या विद्रोहाकडे फारसं लक्षं दिलं जात नाही. त्यामुळे स्त्रिया गप्प राहणं पसंत करतात.

“स्त्रियां उतारी गई सिर्फ कागज़ और केनवास पर, नहीं उतारी गई तो बस रूह में..’ किती खरं आहे अमृता प्रीतमचं हे वाक्य! किती गृहीत धरतो आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच बायकांना. आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, बायको, मुलगी... नात्यांची लेबलं बदलली तरी गृहीत धरणं बदललेलं नाही. घरातली सगळी कामं तिच्यावर टाकून घरातले पुरुष निवांत होतात! आपल्या सगळ्या जबाबदाऱ्याचं ओझ बाईच्या पाठीवर टाकून बाहेरच्या जगात मोकळेपणाने वावरण्याची पुरुषांची सवय नवीन नाही. आजच्या काळात शहरी-निमशहरी भागात नवरा-बायको दोघे नोकरी करतात. संध्याकाळी घराकडे परतताना फक्त बायकांच्या डोक्यातच मुलांचा अभ्यास, रात्रीचा स्वयंपाक, वाणसामानाची यादी अशा कितीतरी गोष्टी असतात. पुरुषांकडून घरचा रस्ता धरला जातो तो फक्त आराम करण्यासाठीच. सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषांचा वाटा किती असतो? एखाद्या दिवशी हौस म्हणून नवीन पदार्थ बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाणाऱ्या पुरुषांची संख्या खूप असली तरी रोज जबाबदारी म्हणून ऑफिसमधून आल्यावर स्वयंपाकघराकडे वळणारे किती पुरुष असतील? सगळेच पुरुष सारखे असतात असं नाही. पण जे पुरुष समाजाने आखलेली पुरुषार्थाची चौकट मोडून घरातल्या कामात लक्ष घालतात, त्यांना ‘बायकोच्या ताटाखालची मांजर’, ‘बैलोबा’ असे टोमणे मारून त्यांचं खच्चीकरण केलं जातं. या सगळ्याला फक्त पुरुषी व्यवस्था दोषी नसते. या परिस्थितीला स्त्रियाही तितक्याच जबाबदार असतात. घरसंसारात पडती बाजू बाईनेच घ्यावी, भावनांना मुरड घालावी, हे सर्व बाळकडू आजीपासून स्त्रियांना मिळतं.

खरं तर कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी संवाद फार महत्त्वाचा असतो. कारण आजवर असं कोणतंच तंत्र बनलं नाही जे समोरच्या व्यक्तीच्या मनातली गोष्ट ओळखू शकेल. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी संवाद सुरू राहणं फार गरजेचं ठरतं आणि स्वत:ला होणाऱ्या त्रासाबद्दल, वाटणाऱ्या भावनांबद्दल बायका स्वत: बोलणार नाहीत तोवर पुरुषांनाही आपलं काय चुकतंय हे कळणार नाही. मग व्यक्त होणं या सगळ्या परिस्थितीवर एकमेव उपाय नाही का? संपर्क : ७०५८७०४८१२

बातम्या आणखी आहेत...