आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Marathi Bhaha Divas Special Article Rasik Divya Marathi | Social Media Marathi | Vishram Dhole Marathi Language Day Article Divya Marathi 

समाज माध्यमांतील मराठी:जगण्यात मराठी ‘लाइक’ केली,तरच ती ‘व्हायरल’ होईल!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी भाषा शिकणे म्हणजे एक नवी व्यक्ती बनणे, असे म्हणतात. त्याच चालीवर एक नवे संवाद तंत्रज्ञान शिकणे म्हणजे एक नवी भाषा शिकणे, असेही म्हणता येऊ शकते. अर्थात ही नवी भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी अशा अर्थाने भाषा नसते. ती अभिव्यक्तीची, समजुतींची, संवादाची एक नवी पद्धत आणि शैली असते. संवाद तंत्रज्ञानाच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे ही पद्धत किंवा शैली निर्माण होते. आणि मग ती हळूहळू आपल्या व्यवहारातील भाषेमध्ये रुजायला आणि रुळायला लागते. तिला कळत नकळत घडवायला-बिघडवायला लागते.

समाज माध्यमांच्या रूपाने गेल्या सुमारे पंधराएक वर्षांमध्ये संवाद तंत्रज्ञानाचे एक नवे आणि मोठे अवकाश आपल्याला खुले होत गेले. तिथल्या संवादाची एक शैली आणि पद्धत हळूहळू विकसित होत गेली. आता त्याचा प्रभाव विविध भाषांवर पडताना दिसत आहे. प्रत्येक भाषेगणिक, भाषिक समूहागणिक हा प्रभाव अर्थातच वेगवेगळा आहे. मराठीतील भाषिक व्यवहारावर त्याचे काय परिणाम दिसत आहेत, हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा. आणि मराठी दिनाच्या दृष्टीने औचित्यपूर्णही.

एक तर समाज माध्यमांवर मराठी लिपीचा लेखी वापर करण्यामध्येच सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये बरेच अडथळे होते. समाज माध्यमांच्या सर्व व्यासपीठांवर सहज वापरता येईल असे मराठी कळफलक वगैरे येण्याला आणि ते लोकांच्या हातवळणी पडायला इंग्रजी किंवा दाक्षिणात्य भाषांच्या तुलनेत थोडा उशीरच झाला. पण, लिपीसंबंधी तांत्रिक गुंते सुटल्यानंतर आणि इथे मराठीत लिहिलेले चालतेय, हे लक्षात आल्यानंतर समाज माध्यमांवर मराठीतील लिखाणाचा प्रवाह वाढू लागला. आज हिंदी, बांगला, तामिळइतका नसला, तरी समाज माध्यमांवरील मराठीचाही प्रवाह लक्षणीय आहे, हे मान्य करावे लागते. आणि मराठी भाषकांची डिजिटल व्यासपीठांवरील बाजारपेठ जसजशी मोठी होत जाईल, तसतशी बाजारपेठेच्या तर्काला महत्त्व देणारी समाज माध्यमे मराठीलाही प्राधान्य देत जातील.

आजमितीला बीबीसी, स्टोरीटेलसह बऱ्याच आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय, प्रादेशिक माध्यम कंपन्या मराठीत आल्या आहेत. समाज माध्यमांसोबतच या कंपन्यांच्या आशयातूनही डिजिटल विश्वातील मराठीचा प्रवाह संख्यात्मकदृष्ट्या बराच वाढत आहे, हे नक्की.

हे सारे वरकरणी समाधानकारक आहे. पण, या संख्यात्मक वाढीतून दिसणारी मराठीतील अभिव्यक्ती कशी होत आहे, हेही पाहणे गरजेचे आहे. तिथे मात्र या वाढीतील कंगोरे आणि खाचखळगे लक्षात यायला लागतात. जगण्यातील औपचारिक आणि अनौपचारिक व्यवहारांमध्ये एखादी भाषा कशी आणि किती वापरली जाते, यावर त्या भाषेची समृद्धी अवलंबून असते. शिक्षण, साहित्य व कला, ज्ञाननिर्मिती, माध्यम व्यवहार, शासकीय व्यवहार, व्यापारउदीम, तंत्रज्ञानाची क्षेत्रे, समाजधुरीणांकडून सार्वजनिक व्यासपीठांवर होणारा संवाद ही झाली भाषेच्या औपचारिक वापराची महत्त्वाची क्षेत्रे. आणि यांच्याबाहेर लोकांमध्ये जो सतत चाललेला असतो तो संवादाचा प्रचंड असा अनौपचारिक भाषिक व्यवहार.

समाज माध्यमांचे अवकाश आकाराला आले ते मुख्यत्वे लोकांमधील अनौपचारिक संवादासाठी. त्यामुळे या माध्यमांचा सर्वाधिक प्रभाव पडणार तो अनौपचारिक संवादांतील भाषेवर. मुळात समाज माध्यमे ही सतत गर्दीने भरलेल्या रस्त्यासारखी असावी, अशीच ती निर्माण करणाऱ्यांची आणि चालवणाऱ्यांची इच्छा असते. त्याचे अल्गोरिदमही त्यासाठीच लिहिलेले असतात. म्हणजे असे, की गर्दीच्या रस्त्यावर तुम्हाला निवांतपणे थांबून कशाचा आस्वाद घेता येत नाही, गर्दीचा प्रवाह तुम्हाला पुढे ढकलत असतो. फक्त नजर भिरभिरवतच पुढे सरकावे लागते. समाज माध्यमांवरील आपला व्यवहारही असाच असतो. तिथे थांबून, विसावून, आरामात अभिव्यक्ती करता येत नाही. म्हणजे ते तांत्रिकदृष्ट्या अशक्य असते असे नाही. पण, या माध्यमांचा अल्गोरिदम आणि आपण ज्यात ही माध्यमे वापरतो त्या स्थळ-काळाची मानसिकता आपल्याला असे रेंगाळू देत नाही. म्हणून तिथली भाषिक अभिव्यक्तीही बहुतेक वेळा अल्पाक्षरी, वरपांगी, जाताजाता केलेली, साचेबद्ध अशा प्रकारची असते. फेसबुक पोस्टवर किंवा व्हॉट‌्सअॅप मेसेजवर येणाऱ्या प्रतिक्रिया वाचा.. व्वा, सुंदर, अभिनंदन, बढिया, जबरा, ऑस्सम, अमेझिंग, तोडलस.. या पलीकडे जाणारी भाषिक प्रशंसा वाचायला मिळण्याचे प्रमाण तसे कमीच. अगदी निधनाच्या संदेशावरही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’च्या पलीकडे बऱ्याचदा प्रतिक्रिया आणि भाषिक अभिव्यक्ती जात नाही. अनेकदा तर फक्त RIP आणि दोन फुलं.. बास!

मृत व्यक्तीबद्दल दोन वाक्यं लिहावी, त्याचे थोडक्यात का होईना; गुणवर्णन करावे, आपला आणि त्या व्यक्तीचा संबंध कसा होता वगैरे सांगावे, ही निधनानंतरच्या सांत्वनात एरवी पाळली जाणारी औपचारिकताही अशा प्रसंगी बरेचदा पाळली जात नाही. असे लिहिणाऱ्यांच्या भावना वरपांगीच असतात, असे नाही. पण आपल्याला नेमके काय वाटते, ते थोडेही विस्ताराने भाषेतून व्यक्त करावे एवढा मानसिक-भाषिक निवांतपणा समाज माध्यमे आपल्याला देत नाहीत. हाच तर्क साहित्याला लावला तर लक्षात येते, की कविता, लघुकथा वगैरे साहित्य प्रकार समाज माध्यमी प्रवाहामध्ये चालू शकतील, पण थोडी मोठी कथा, कादंबरी वगैरेसाठी ही माध्यमे, ब्लॉग फार उपयोगी नाहीत. समाज माध्यमांवर साहित्यिक मातब्बरी असते ‘टायनी टेल्स’ची.

अर्थात भाषिक अभिव्यक्ती अल्पाक्षरी, वरपांगी होत जाणे हा समाज माध्यमांचा एकमेव परिणाम नाही. या माध्यमांवरील भाषिक अभिव्यक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक अशिष्ट, आक्रस्ताळी, संदर्भहीन होत आहे. एरवी बऱ्यापैकी शिष्टसंमत पद्धतीने वागणाऱ्या मंडळींची या माध्यमांवरील अभिव्यक्ती बरेचदा ‘भ’कार आणि “म ’काराने सुरू होणाऱ्या शिव्यांनी बरबटलेली असते. ज्यांच्या एरवीच्या वागण्यातही या शिष्टसंमत वागण्याला काही महत्त्व नाही, त्यांच्या समाजमाध्यमी भाषेबद्दल तर बोलायलाच नको! पुणे परिसरातल्या जेमतेम अठरा वर्षांच्या दोन मुलींवर त्यांच्या समाज माध्यमांवरील शिवराळ आणि धमकीवजा भाषेबद्दल अलीकडेच गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण पोलिसात गेल्यामुळे या प्रकाराची बाहेर चर्चा झाली इतकेच. एरवी समाजमाध्यमी भाषेमध्ये शिवराळपणा, आक्रस्ताळेपणा वरचेवर प्रत्ययाला येतोच आहे.

समाज माध्यमांचे एक अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील दृश्यात्मकता. तिथे छायाचित्रे, चित्रफिती, मीम्स यांची जास्त चलती. या माध्यमांचा अल्गोरिदमही अशाच अभिव्यक्तीला प्राधान्य देणारा. त्यामुळे नुसत्या लिखित पोस्ट किंवा संदेशांपेक्षा चित्र, दृश्यांनी नटलेल्या पोस्ट आणि संदेशांचा प्रसार अधिक वेगाने होतो. त्या पाहिल्याही जास्त जातात. सार्वजनिक अभिव्यक्तीची संधी ज्यांना कधी फार मिळाली नाही अशा स्त्रिया, समाजातील दुर्लक्षित आणि परिघावरच्या घटकांना समाज माध्यमांमुळे व्यक्त होण्याचे एक मोठे अवकाश मिळाले, हे खरेच. मराठीच्या बाबतीत बोलायचे तर प्रमाण आणि शहरी मराठीपेक्षा वेगळ्या भाषिक संवेदना आणि क्षमता असलेले अनेक जण समाज माध्यमांवर लिहिते झाले. पण, हे लिहितेपण तसे मर्यादितच ठरले. कारण लिहिण्यापेक्षा दाखवण्याने किंवा ऐकवण्याने लाइक्स मिळण्याची, शेअर होण्याची, व्हायरल होण्याची शक्यता जास्त हे या नव अभिव्यक्त होऊ पाहणाऱ्यांच्या लवकरच लक्षात आले. मोबाइलचा कॅमेरा, एडिटिंगचे सोपे अॅप आणि कमी खर्चिक व सुलभ इतर तांत्रिक सोयी यांमुळे व्हिडिओ बनवणे तितके कठीण नाही, हेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सार्वजनिक अवकाशात नव्यानेच व्यक्त होऊ पाहणारी ही नवी पिढी लिहिण्याचे वळण टाळून थेट व्हिडिओ आणि मीम्स्मधून व्यक्त होऊ लागली. भाषा तिथेही लागतेच, पण तिची लेखीएवढी मातब्बरी तिथे नाही. एका अर्थाने समाज माध्यमांमुळे मराठीने पुन्हा एकदा मौखिक संस्कृतीचे वळण घेतले आहे.

समाज माध्यमांच्या अनेक अभ्यासांतून त्याच्या काही खोलवरच्या प्रवृत्ती स्पष्ट झाल्या आहेत. त्यातील एक नियमवजा प्रवृत्ती असे सांगते की, व्यक्तींच्या, समाजाच्या प्रत्यक्ष जगात जे वास्तव किंवा मूल्य असते ते समाजमाध्यमी नेटवर्कवर अनेक पटीने मोठे होऊन समोर येते. याला ते नेटवर्कची कलवर्धन (ट्रेंड अॅम्प्लिफिकेशन) प्रवृत्ती म्हणतात. त्यामुळे मुळातच मराठी भाषेबाबत आपले जे वास्तवातले चित्र आहे, तेच समाज माध्यमांवर मोठे होऊन आणि काहीसे वेगळे होऊन पाहायला मिळते. मराठीबद्दल आपण मुळातच आग्रही आणि प्रामाणिक नसलो, तर समाज माध्यमांवर तरी वेगळे काय दिसणार? भाषेचा डौल, शब्दांचे, वाक्यांचे, उच्चारांचे मराठीपण याकडे वास्तव जगात आपणच दुर्लक्ष करीत असू, तर समाज माध्यमांतील मराठी अभिव्यक्ती आणखीच अशुद्ध आणि सपक होत जाईल. आपल्या सामाजिक, राजकीय धुरीणांची भाषा ‘या ठिकाणी..’ ‘त्या ठिकाणी..’ अशा बेंगरूळ शब्दयोजनांच्या बाहेर पडू शकत नसेल, तर समाज माध्यमांवरील मराठी तरी कशी डौलदार दिसेल? आता या वर्णनाला सणसणीत अपवाद ठरू शकतील, अशीही उदाहरणे समाज माध्यमांवर सापडतात, हे खरेच. मराठीतही ते आहेत. पण, तिथला एकूण भाषाव्यवहार पाहिला, तर ते दुर्दैवाने अपवादच ठरतात.

एरवी समाज माध्यमांच्या अंगभूत वैशिष्ट्यामुळे निदान लेखी भाषिक अभिव्यक्तीचा संकोच होण्याची शक्यताच जास्त. त्यात मराठी भाषिक म्हणून आपण प्रत्यक्ष जगण्यामध्ये आपल्या भाषेकडे, तिच्या समृद्धीकडे दुर्लक्ष करणार असू, तर या माध्यमांच्या कलवर्धन प्रवृत्तीमुळे त्याचे गांभीर्य आणखी वाढणार. त्यामुळे मुळात आपल्या प्रत्यक्ष जगण्यामध्ये आपण मराठी ‘लाइक’ करण्याची गरज आहे. तसे झाले तरच समाज माध्यमांवर मराठी ‘व्हायरल’ होईल.

मुळातच मराठी भाषेबाबत आपले जे वास्तवातले चित्र आहे, तेच समाज माध्यमांवर मोठे होऊन आणि काहीशा वेगळ्या रूपात पाहायला मिळते. भाषेचा डौल, शब्दांचे, वाक्यांचे, उच्चारांचे मराठीपण याकडे वास्तव जगात आपणच दुर्लक्ष करीत असू, तर या माध्यमांतील मराठी अभिव्यक्ती आणखीच अशुद्ध आणि सपक होत जाईल. त्यामुळे आधी प्रत्यक्ष जगण्यात आपण मराठी ‘लाइक’ करायला हवी. तसे झाले तरच समाज माध्यमांवर ती ‘व्हायरल’ होईल...

विश्राम ढोले
संपर्क : 9545268245
vishramdhole @gmail.com

बातम्या आणखी आहेत...