आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Marathi Bhasha Divas Special Article Rasik Divya Marathi | Camil Parkhe Marathi Bhasha Divas Special Article  Marathi Language | Divya Marathi Rasik Special

भवताल:‘मराठी’च्या समृद्धीचे काय?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानपीठ किंवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्या न मिळाल्यामुळे कुठल्याही साहित्यिकाचे, त्यांच्या साहित्यकृतीचे मोल आणि योगदान वाढते अथवा कमी होते असे नाही. अभिजात भाषेच्या दर्जासाठी प्रयत्न होत असलेल्या मराठीच्या समृद्धीसाठी काय केले जाते, हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. हा दर्जा मिळाल्याने एखाद्या भाषेचे किंवा त्या भाषेतील साहित्यकृतींचे महत्त्व वाढते असे थोडेच आहे? तरीही दरवर्षी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी कागदी घोडे नाचवले जातात. मराठी अधिकाधिक वाचली जावी, या भाषेत दर्जेदार-विपुल लिखाण व्हावे आणि त्यातून ही भाषा आणखी समृद्ध व्हावी, यासाठी किती प्रयत्न केले जातात?

पुण्यात एका इंग्रजी वृत्तपत्रात नुकताच रुजू झालो होतो तेव्हाची गोष्ट. प्रा. दि. ब. देवधर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात, चाळीसच्या दशकात क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या आणि फर्ग्युसन कॉलेजचे माजी शिक्षक असलेल्या दिनकर बळवंत देवधर यांनी काही दिवसांपूर्वी शंभरी पूर्ण केली होती. योगायोगाने देवधर यांच्याप्रमाणेच शकुंतलाबाई परांजपे यांनाही त्याच वेळी ‘पद्मभूषण’ मिळाला होता. या दोन्ही पद्मभूषण पुरस्कारार्थींवर मी लेख लिहिले होते. त्या वेळी मला एक गोष्ट जाणवली की, ‘पद्मभूषण” मिळालेल्या प्रा. देवधर आणि शकुंतलाबाई परांजपे यांच्यामध्ये काही समान धागे होते. त्या दोघांनाही खूप वर्षांपूर्वी ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आले होते. मग आता त्यांना हा त्याहून वरच्या दर्जाचा पुरस्कार देण्याचे तात्कालिक कारण काय होते? देवधर यांनी अलीकडेच शंभरी ओलांडली होती. भारतात संतती नियमनाची चळवळ राबवणारे रघुनाथ धोंडो कर्वे यांना मदत करणाऱ्या आणि त्यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकात नियमितपणे लिहिणाऱ्या, माजी आमदार-खासदार असलेल्या शकुंतलाबाईंचीसुद्धा नव्वदीकडे वाटचाल चालू होती. या दोघांनाही त्यांच्या या दीर्घायुष्यानिमित्ताने हा सन्मान दिला जात होता हे स्पष्टच होते.

साहित्य अकादमी, ज्ञानपीठ आणि इतकेच नव्हे, तर नोबेल वगैरे पुरस्कार मात्र आजही फक्त हयात व्यक्तींनाच दिले जातात. पेन्शन चालू राहण्यासाठी संबंधित व्यक्तींना दरवर्षाच्या अखेरीस आपण जिवंत आहोत हे सिद्ध करणारा हयातीचा पुरावा दाखल करावा लागतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की मग नोबेल आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी ती व्यक्ती अपात्र ठरते. एखादा सन्मान वा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला देण्यामागचे (किंवा न देण्यामागचे) कारण शोधायचा प्रयत्न केल्यास अशी काही गमतीदार, अविश्वसनीय किंवा धक्कादायक माहिती मिळते. अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना नोबेल पुरस्कार मिळाला नाही, मात्र वर्णभेदाच्या संघर्षात अहिंसेचे साधन यशस्वीरीत्या हाताळणाऱ्या अमेरिकेतील मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अगदी तरुण वयात मिळाला. वर्णभेदाच्या संघर्षात महत्त्वाचे योगदान देणारे दक्षिण आफ्रिकेतील नेते नेल्सन मंडेला आणि नुकतेच दिवंगत झालेले आर्चबिशप डेसमंड टुटू यांनाही ‘नोबेल’ने गौरवण्यात आले. दुसरीकडे, मानवतेवरचा कलंक असलेली अस्पृश्यता राज्यघटनेच्या माध्यमातून कायमची संपवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवालाही नोबेल मिळाला नाही.

वि. स. खांडेकर यांना त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर दोन वर्षांनी, वयाच्या ७८ व्या वर्षी खांडेकरांचे निधन झाले. याचा अर्थ वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत खांडेकरांना दीर्घायुष्य लाभले नसते तर मराठीतले पहिले ज्ञानपीठ मिळण्याचा सन्मान त्यांना लाभला नसता. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा या कादंबरीची वाचनालयातील प्रत लगेच मिळवून मी ती अधाशीपणे वाचून काढली होती. इंग्रजी किंवा इतर भाषेतल्या कुठल्याही साहित्यकृतीला एखादा पुरस्कार मिळाला की त्या पुस्तकाकडे वाचकांचे लक्ष जाते. पुढे वर्षानुवर्षे त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघत असतात. उदाहरणार्थ, ‘टू किल अ मॉकिंग बर्ड’ हे पुस्तक माझ्या हातात पडले तेव्हा ते एक नावाजलेले पुस्तक असल्याचे मला आठवले. किती मराठी पुस्तकांबाबत असे म्हणता येईल? ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाल्यावही खांडेकरांच्या या पुस्तकाच्या फार आवृत्त्या निघाल्या नाहीत. इतरही अनेक पुरस्कारप्राप्त मराठी पुस्तकांची बहुधा हीच कथा असेल.

वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांना १९६७ ते १९८१ या काळातील त्यांच्या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ सन्मान मिळाला. ‘घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे,’ अशा अनेक आशयघन कविता लिहिणाऱ्या विंदा ऊर्फ गोविंद विनायक करंदीकर यांनी खूप वर्षांपूर्वी, म्हणजे ऐंशीच्या दशकातच ‘आपल्याकडे आता लिहिण्यासारखे नवीन असे काही नाही,’ असे जाहीरपणे सांगून लेखणी म्यान केली होती. त्यांना वयाच्या ८५ व्या वर्षी २००३ चा ज्ञानपीठ पुरस्कार ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी देण्यात आला. विंदांची ही ‘ज्ञानपीठ’प्राप्त साहित्यकृती मात्र किती जणांनी वाचली असेल वा हे नाव ऐकले असेल याविषयी मला शंका आहे.

एखाद्या व्यक्तीला विशिष्ट निर्मितीसाठी पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने त्या व्यक्तीचे वा त्या कलाकृतीचे श्रेष्ठत्व ठरत नाही. तसे गृहीतही धरता कामा नये. उदाहरणार्थ, गेल्या शतकातील एक महान तत्त्वज्ञ असलेल्या, अपारंपरिक मते मांडणाऱ्या आणि युद्धविरोधी भूमिका घेऊन लोकप्रिय जनमताचा आणि शासनाचाही रोष पत्करणाऱ्या बर्ट्रांड रसेलला मिळालेला नोबेल पुरस्कार साहित्यातील होता!

भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेले ज्ञानपीठ पुरस्कार १९६५ पासून दिले जात आहेत. मराठी साहित्यातील दिग्गज असलेल्या अनेक साहित्यिकांना या पुरस्काराने हुलकावणी दिली आहे. वानगीदाखल विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, शांता शेळके, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर, मंगेश पाडगावकर, वसंत कानेटकर, जी. ए. कुलकर्णी, नारायण सुर्वे, वसंत बापट अशी कितीतरी नावे घेता येतील. विजय तेंडुलकर आणि नामदेव ढसाळ यांची नावे वगळून केवळ मराठी साहित्याचाच नव्हे, तर भारतीय साहित्याचाही इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. अशांना ज्ञानपीठ पुरस्कार का बरे दिला गेला नसेल? याचाच अर्थ इतर पुरस्कारांप्रमाणेच केवळ मेरिट म्हणजे उच्च दर्जाच नव्हे, तर इतरही अनेक गोष्टी साहित्य अकादमी किंवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आवश्यक असतात. यामध्ये लॉबिंग प्रक्रिया, तांत्रिक आणि इतर बाबींचे पालन वगैरे अनेक गोष्टींचा समावेश असतो. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यावर त्या साहित्यकृतीच्या पात्रतेबद्दल तांत्रिक मुद्द्यावर संशय निर्माण झाल्याने अत्यंत उद्विग मनाने जी. ए. कुलकर्णी यांनी आपला पुरस्कार परत केला होता, हे एक उदाहरण आहेच.

इतर भारतीय भाषांच्या तुलनेत मराठी साहित्याला फार कमी साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. याची कारणमीमांसा काही वर्षांपूर्वी दिल्लीत राहणाऱ्या आणि तेथील समीकरणांची पूर्ण जाणीव असलेल्या मराठीतील एका ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षकाने केली होती. दुसऱ्यांचे पाय ओढण्याचे प्रकार आणि पुरस्कारांसाठी लॉबिंग करण्यात अपयश अशी दोन मुख्य कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले होते. असे असले तरी ज्ञानपीठ किंवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्या न मिळाल्यामुळे कुठल्याही साहित्यिकाचे, त्यांच्या साहित्यकृतीचे मोल आणि योगदान वाढते अथवा कमी होते असे नाही. सातशे-आठशे वर्षांपूर्वीचे चक्रधर स्वामी आणि संत ज्ञानेश्वर यांचा तसेच सतराव्या शतकातील जन्माने ब्रिटिश असलेल्या, ‘ख्रिस्तपुराण’कार फादर थॉमस स्टिफन्स यांचा वारसा सांगणाऱ्या आणि आता अभिजात भाषेच्या दर्जासाठी प्रयत्न होत असलेल्या मराठीच्या समृद्धीसाठी काय केले जाते हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. हा दर्जा मिळाल्याने एखाद्या भाषेचे किंवा त्या भाषेतील साहित्यकृतींचे महत्त्व वाढते, असे थोडेच आहे? तरीही दरवर्षी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी कागदी घोडे नाचवले जातात. मराठी अधिकाधिक वाचली जावी या भाषेत दर्जेदार, विपुल लिखाण व्हावे आणि त्यातून ही भाषा आणखी समृद्ध व्हावी यासाठी किती प्रयत्न केले जातात?

कामिल पारखे
camilparkhe@gmail.com
संपर्क : 9922419274

बातम्या आणखी आहेत...