आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Marathi Bhasha Divas Special Article Rasik Divya Marathi | Hemant Desai Marathi Bhasha Divas Special Article Political Marathi | Divya Marathi Rasik Special

मराठी भाषा दिवस:मराठीचे ‘शिवराळी’करण...राजकारणातील मराठी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल जनतेसाठी ठोस काही करण्याऐवजी नाट्यपूर्ण डायलॉगबाजी, अर्वाच्य विनोद आणि करमणूकप्रधानता ही राजकीय शैली प्रचलित होऊ लागली आहे. सार्वजनिक जीवनातील किमान शाब्दिक आणि वाचिक सभ्यता पूर्वीही अधूनमधून भंगत असे. परंतु, आता होलसेल प्रमाणात हे प्रकार घडत आहेत. कृतिशीलतेपेक्षा शाब्दिक कृती वा अपकृती करणे, हीच रोजरहाटी बनली आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेलही, पण राजकीय लोकांनी आपली पातळी सोडत तिचा आणि आपल्या राजकारणाचाही ‘दर्जा’ खालावण्याचा चंग बांधलाय, त्याचे काय करायचे?

महाराष्ट्रात १९९५ मध्ये मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले तेव्हा ते शिवशाहीचे राज्य असल्याचा दावा केला जाऊ लागला. परंतु २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री बनले तेव्हा ही शिवशाही असल्याचा दावा केला गेला नाही. मात्र, शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यात ‘शिवीशाही’ आली आहे हे बाकी खरे.. ‘भाजपचे किरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत,’ असा हल्ला चढवून राऊत यांनी त्यांच्याबद्दल आणखीन भयानक अपशब्द काढले. यासंदर्भात सार्वत्रिक टीका होताच आपली चूक मान्य न करता ते गरजले, ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचे संस्कार आणि संस्कृती अद्यापही कायम आहे, परंतु जे लोक महाराष्ट्रद्रोही आहेत आणि ज्यांना मराठी भाषेबाबत द्वेष आहे त्यांच्याशी त्याच भाषेत बोलले पाहिजे. भाजपमध्ये काही लोक तर हजार मारावे आणि एक मोजावा असे आहेत.’

थोडक्यात, आम्हाला कोणी मराठी शिकवू नये, असा राऊत यांचा पवित्रा आहे, तर ‘मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण ती माझी संस्कृती नाही,’ असे उद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले आहेत. भाजप नेत्यांबाबत राऊतांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही तशाच शैलीत उत्तर दिले. आक्रमकतेच्या नावाखाली ते यापूर्वीही अशी वक्तव्ये करीत आले आहेत. यापूर्वी अभिनेत्री कंगना राणावतची संभावना केल्यानंतर प्रकरण अंगाशी येताच ‘हरामखोर म्हणजे नॉटी’ असा या शब्दाचा नवीनच इंग्रजी अर्थ राऊतांनी समोर ठेवला होता. खान्देशात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोप झडतात. ‘नाथाभाऊंना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे,’ अशी टीका महाजनांनी केली. त्यावर ‘त्यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवले पाहिजे,’ असे प्रत्युत्तर नाथाभाऊंनी दिले. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावातील पहिल्या अक्षरावरूनही नाथाभाऊंनी पातळी सोडून टीका केली. गुलाबरावही खडसेंवर टीका करताना ‘जशास तशी’ पातळी गाठतात हे वेगळे सांगायला नको. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय चर्चेत असतानाच असे प्रकार सुरू आहेत, हा मराठीचा गौरव खचितच नव्हे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आपण ‘टरबुजा’ म्हणणार नाही, असा उल्लेख करून नाथाभाऊंनी सोशल मीडियावरील ट्रोलर्सपेक्षा आपण कमी नाही हे दाखवून दिले. फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना नेहमीच ट्रोल केले जाते. परंतु, मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे अमृताताईंनी अनेकदा आक्षेपार्ह शब्दप्रयोग केले आहेत. दोन वर्षांपूर्वी कलर्स वाहिनीच्या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात सानू नावाच्या स्पर्धकाने, ‘मला मराठी भाषेची चीड येते,’ असे म्हटल्याने खळबळ माजली होती. त्यावर ‘मुंबईत आवाज फक्त मराठी माणसाचा. तुला लवकरच थोबडवणार,’ असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला होता. खोपच्यात घ्या, बडवून काढा, मनसे स्टाइल इंगा दाखवू, हे तर आपण मनसे नेत्यांकडून नेहमीच ऐकत असतो. परंतु, मराठीचा ठेका घेणाऱ्या लोकांची स्वतःची मराठी भाषादेखील धड नसते. माझ्याकडे अनेक विषयांवरच्या ‘माहित्या’ आल्या आहेत, असे एक मराठीवादी नेता नेहमीच म्हणत असतो.. ही यांची मराठी! ‘केवळ धमक्या देऊन मराठी भाषेचे संवर्धन होणार नाही. उलट भाषा ही लोकांच्या व्यवसायाची बनली पाहिजे. ज्या भाषेत लोकांना काम मिळते त्या भाषेत लोक आपली भाषा घेऊन जगतात. भाषा लोकांच्या व्यवसायाची बनली नाही तर तिला उतरती कळा लागते,’ असे प्रतिपादन भाषा चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रसिद्ध भाषातज्ज्ञ गणेश देवी हे रास्तपणे करत असतात. मात्र, हे काम मेहनतीचे व चिकाटीचे असते. त्याऐवजी शिवराळ डायलॉगबाजी करून टाळ्या मिळवणे अनेकांना सोयीचे वाटते. त्यामुळेच मी मोदींना शिव्या देऊ शकतो, मारू शकतो, असे उद्गार काढून नंतर सारवासारव करण्याची पाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आली. शाहिस्तेखानाची फक्त बोटे छाटलेली, नानांनी आपला पंजा सांभाळावा, असा इशारा भाजप नेते अनिल बोंडे यांनी दिला! ‘मालकिणीचा प्रामाणिक कुत्रा’ असे शब्दही त्यांनी नानांसंदर्भात वापरले. प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण अनेकांना न पटणारे असेल, परंतु अगदी शरद पवार अथवा राहुल गांधी यांच्याबद्दलसुद्धा ते कधीही मर्यादा सोडून बोलत नाहीत.

प्रतिस्पर्ध्याविषयीही व्यक्तिगत आकस न ठेवणे, चिखलफेक न करणे, भाषा जपून वापरणे ही पथ्ये पूर्वी पाळली जात. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आपल्या शाहिरीने ऐतिहासिक कार्य करणारे अमरशेख यांच्यावर एका मराठी कथाकाराने ‘तो मुसलमान आहे. त्याने हिंदू मुलगी पळवली आणि तो आपल्या मुलीला स्टेजवर नाचवतो,’ अशी अत्यंत गलिच्छ टीका केली होती. परंतु ज्ञानदेव-तुकारामांच्या मराठी संस्कृतीवर अस्सल प्रेम करणाऱ्या अमरशेख यांनी या टीकेला उत्तरही दिले नाही. नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि महात्मा गांधी राजकारणाचे आध्यात्मीकरण करण्याचा विचार मांडत. आता आध्यात्मीकरण सोडाच, उलट गुन्हेगारीकरण आणि शिवराळीकरण झाले आहे. ‘गलिच्छ बोलणारे आणि गलिच्छ लिहिणारे यांच्या घरांवर महिलांनी आता चप्पल मोर्चे नेऊन अशा लेखकांची थोबाडे फोडून काढावीत,’ असे आवाहन पूर्वी आचार्य अत्रे यांनी पुणे नगरवाचन मंदिरातील भाषणात केले होते. भाऊ पाध्ये यांच्या ‘वासूनाका’वरही त्यांनी सडकून टीका केली होती. या एका कादंबरीवरून विधानसभेत राडा झाला होता. मात्र, राज्यपालनियुक्त सदस्य असलेल्या ग. दि. माडगूळकरांनी त्या पुस्तकात काहीही अश्लील नसल्याचा निर्वाळा दिला होता.

मधू मंगेश कर्णिक यांच्या ‘माहीमची खाडी’ या कादंबरीच्या भाषेवरूनही वादंग निर्माण झाले होते. पूर्वीच्या काळात गदिमा, ना. धों. महानोर, रामदास फुटाणे, शांताराम नांदगावकर (ते तर शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून गेले होते) यांच्यासारखे साहित्यिक विधिमंडळात सक्रिय होते. साहित्यिक आणि राजकारणी यांच्यात साहचर्य होते. यशवंतराव चव्हाण यांची तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, कुसुमाग्रज, गोविंद तळवलकर यांच्याशी मैत्री होती. शरद पवार यांचाही साहित्यिकांबरोबर सहवास असतो. ग. प्र. प्रधान हे तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व सभापती आणि ‘साता उत्तराची कहाणी’सारखी उत्कृष्ट कादंबरी लिहिणारे साहित्यिकही होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लखोबा, मैद्याचं पोतं, साहित्यिक की बैल अशा अनेक शब्दांची मुक्त उधळण करायचे. ‘ही वडिलोपार्जित शब्दसंपत्ती’ आता तरी मला वापरू द्या, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पूर्वी काढले होते! आजकाल जनतेसाठी ठोस काही करण्याऐवजी नाट्यपूर्ण डायलॉगबाजी, अर्वाच्य विनोद आणि करमणूकप्रधानता ही राजकीय शैली प्रचलित होऊ लागली आहे. राजकीय नेते हे समाजाचे आदर्श आहेत ही समजूत खोटी ठरवण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. सार्वजनिक जीवनातील किमान शाब्दिक आणि वाचिक सभ्यता पूर्वीही अधूनमधून भंगत असे. परंतु, आता होलसेल प्रमाणात हे प्रकार घडत आहेत. खालच्या पातळीवर बोलणाऱ्या लोकांचा आज प्रत्येक पक्षात सुकाळ आहे. विचार आणि उद्दिष्टांपासून एकूणच राजकारणाची फारकत होऊ लागली आहे. कृतिशीलतेपेक्षा शाब्दिक कृती वा अपकृती करणे हीच रोजरहाटी बनली आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेलही, पण राजकीय लोकांनी आपली पातळी सोडत तिचा आणि आपल्या राजकारणाचाही ‘दर्जा’ खालावण्याचा चंग बांधलाय, त्याचे काय करायचे?

हेमंत देसाई hemant.desai001@gmail.com संपर्क : 9820479688

बातम्या आणखी आहेत...