आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Marathi Language Day | Special Article Rasik Divya Marathi | Bharat Sasne Rasik Article Marathi Bhasha Divas | Divya Marathi 

मराठी भाषा दिन विशेष:‘मराठी’चा प्रवाह अखंडित राहो...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषा सक्षम, समर्थ आणि सुंदर आहे. गोमटी आहे. संतकवींच्या काव्यातून वाहणारी आहे. आजच्या तंत्रयुगातही ती टिकून आहे, जिवंत आहे, हे अधिक महत्त्वाचे. आपल्या व्यक्तिमत्त्वातून, आकलनातून, अस्तित्वातून मराठी भाषा स्पंद पावत असते, हे लक्षात घेतले तर मराठी अक्षय आहे, हे जाणवेल. व्यर्थ चिंता बाळगली नाही, तरी मराठी भाषेचे जतन मात्र झाले पाहिजे. आणि ती आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे तितकेच खरे.

माध्यमांतील मराठी चिंताजनक

सध्याच्या काळात वृत्तपत्रे, नियतकालिके तसेच समाज माध्यमांतील मराठी भाषा पाहता जरा चिंताजनक परिस्थिती आहे, असे वाटते. येथे उच्चारली, लिहिली जाणारी मराठी अशुद्ध असते. त्यातून विनोद निर्माण होतात आणि ते विषादाकडे घेऊन जातात. पण, आपण आशावादी असले पाहिजे, कारण मराठी भाषा पुरेशी लवचिक, आघात पचवणारी; तरीही सक्षम आहे. सर्वसामान्यांच्या लोकजीवनात, गीतांमध्ये, कथांमध्ये आणि जगण्यात मराठी आहे. ती बदलत आली असली, तरी दृश्यमान आहे आणि राहील.

मित्रहो,
आज आपण आपल्या मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करत आहोत, यानिमित्त सर्वांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो. मराठी भाषेच्या संदर्भात सांगायचे तर लक्षात येईल, की काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली मराठी भाषा बदलत आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रमाण भाषा म्हणून जिला मान्यता होती, ती भाषा आता एकविसाव्या शतकात वेगळी झाली आहे. त्याहून मागे जायचे तर शिवकाळात मराठी वेगळी होती आणि त्याही आधी ज्ञानोबांची मराठी निराळी होती. स्थित्यंतराच्या काळात मराठी भाषेवर अनेक संस्कार झाले आहेत. मराठीने अरबी, फारशी इत्यादी भाषांमधून शब्द स्वीकारले आहेत, तसेच संदर्भही घेतले आहेत. त्या काळात आणि मुघल कालखंडात ज्याला सैनिकी भाषा म्हणत, त्या सरमिसळ होऊन सिद्ध झालेल्या उर्दू भाषेनेही मराठी भाषेला बरेच काही दिले आहे. इतकेच नाही, तर शेजारच्या भूप्रदेशातूनही अनेक शब्द, संदर्भ मराठी भाषेने स्वीकारले आहेत. कन्नड, तेलगू या भाषांचाही खोलवर पडलेला प्रभाव अभ्यासकांनी दाखवून दिला आहे. उदाहरणार्थ - अडगुलं मडगुलं इत्यादी. हा प्रभाव बोलीभाषेवर होता, लोकभाषेवर होता आणि त्यातूनच मराठी भाषा प्रवाही झालेली आहे.

हा झाला प्रभावाचा परिणाम. यातून महाराष्ट्रातीलच वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मराठी भाषा बोलली जाते. आपला विदर्भ अनेक अन्य भाषक राज्यांना जोडलेला आहे. त्यामुळे राज्याच्या सीमेवरील भाषा सरमिसळ होऊन बोलीभाषेच्या रूपाने लोकजीवनात प्रकट होत आल्या आहेत. अशी उदाहरणे अन्य प्रदेशांतही देता येतील. म्हणूनच दर बारा कोसांवर भाषा बदलते, अशी उक्ती रूढ झाली. तरीदेखील इतक्या सगळ्या बदलांना आपल्या पोटात सामावून घेत मराठी भाषा समृद्ध होऊन आपल्या धमन्यांमध्ये वाहते आहे. आपली मराठी अमृताशीही पैजा जिंकते, असे ज्ञानेश्वरांनी जे म्हटले आहे, त्याची आजही ठायी ठायी प्रचिती येते.

मराठी भाषा आधुनिक जगात येता येता, पुनश्च वेगवेगळ्या संस्कारांना सामोरी जाते आहे. इंग्रजी, हिंदी या भाषांचा प्रभाव मराठीवर आहेच, परंतु तंत्रयुगातली अपरिहार्य भाषाही मराठीवर लादली जात आहे. भोवताल बदलतो आहे, समाज बदलतो आहे, धारणा बदलत आहेत, विचार बदलत आहेत. त्यामुळे मातृभाषादेखील वेगळ्या स्वरूपात दिसू लागली आहे. सर्वच तांत्रिक शब्दांना पर्यायी मराठी शब्द उपलब्ध नसल्याने आणि उपलब्ध शब्द मराठीत रूढ न झाले नसल्याने तांत्रिक कामकाजासाठी इंग्रजी शब्द जसेच्या तसे मराठीला स्वीकृत करावे लागत आहेत, हे तथ्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. तरुण पिढी इंग्रजी भाषेत शिक्षण घेत आहे, त्यापैकी अनेकांना मराठी भाषा आता वाचताही येत नाही, असे दिसून येते.

या पार्श्वभूमीवर अशी भीती व्यक्त केली जात आहे, की पुढची पिढी कदाचित मराठी वाचणारीच नसेल, तर मग मराठी साहित्याचे काय होणार? जे ज्ञान (मराठी भाषेच्या) परंपरेने सांभाळले, त्या ज्ञानसंचिताचे काय होणार? ही भीती अनाठायी नसली, तरी मराठी भाषा जिवंत आणि शक्तिमानच राहील, असा आशावाद व्यक्त केला जातो, याचे कारण मराठी लयाला जाणे शक्य नाही. परकीय आक्रमणांच्या काळातही मराठी भाषा टिकून राहिली आणि हे तिचे वैशिष्ट्य आहे. येत्या काळात मराठी पुस्तकांना भवितव्य नाही, अशीही चर्चा होत असली, तरी पुस्तके प्रकाशित होतच आहेत आणि ती वाचलीही जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

मराठी भाषेचे भवितव्य काय असेल, अशी आपण चर्चा करतो तेव्हा मराठी भाषेची लवचिकता, टिकून राहण्याची क्षमता आपण लक्षात घेत नाही, असे वाटते. मराठी भाषा ही लोकभाषा आहे, मराठी भाषा मराठी लोकांच्या जीवनपद्धतीचा आधारही आहे. लोकसंस्कृती चिवट आणि अक्षय असते. लोकजीवनातून जी भाषा वाहते, ती सहजासहजी नष्ट होत नाही, हा अनुभव आपल्याला एक आश्वासन देऊन जातो. अर्थात मराठी भाषेचे जतन केले पाहिजे आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नही केले पाहिजेत, हे खरे आहे. मोहेंजोदडो आणि हडप्पा येथील भाषा आज उत्खनित, लिखित स्वरूपात उपलब्ध होत असली, तरी ती अद्याप वाचता आलेली नाही. ती भाषा वाचणारा समाज नष्ट झाला आहे, हा इतिहास बोलका आहे. भाषेच्या साक्षरतेपासून दूर गेलेला समाज आणि संस्कृती नष्ट पावते, असे विद्वानांनी नोंदवून ठेवले आहे, याची आठवण आपण ठेवली पाहिजे.

आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे, सर्वत्र मराठी भाषेचा वापर (बोली, लिखित) केला पाहिजे. अगदी अपरिहार्य असेल तेव्हाच अन्य भाषांचा उपयोग केला जाऊ शकतो. अन्य भाषांचा द्वेष करण्याचे काहीच कारण नाही. पण, मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणामुळे आकलनशक्तीमध्ये सकारात्मक वाढ होते, हे विसरता कामा नये. एकूण मराठी भाषा सक्षम, समर्थ आणि सुंदर आहे. गोमटी आहे. संतकवींच्या काव्यातून वाहणारी आहे. आजच्या तंत्रयुगातही ती टिकून आहे, जिवंत आहे, हे अधिक महत्त्वाचे. आपल्या व्यक्तिमत्त्वातून, आकलनातून, अस्तित्वातून मराठी भाषा स्पंद पावत असते, हे लक्षात घेतले तर मराठी अक्षय आहे, हे जाणवेल. व्यर्थ चिंता बाळगली नाही, तरी मराठी भाषेचे जतन मात्र झाले पाहिजे. आणि ती आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे तितकेच खरे. पुन्हा एकदा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

भारत सासणे
९५ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष

(शब्दांकन : जयश्री बोकील, पुणे)

बातम्या आणखी आहेत...