आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दखल:मास्तर... तुम्ही सुद्धा..?

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीने रोपटं लावलं तर ते जगणार नाही, असं कारण सांगत नाशिकमधल्या एका शिक्षकाने तिला वृक्षारोपणास प्रतिबंध केला. भारतीय घटनेने प्रत्येकाला उपासना, श्रद्धा, विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मर्यादा आणि बंधनांसह बहाल केले आहे. किमान शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मानवी घटकांनी तरी याचे जाणीवपूर्वक भान बाळगणे आवश्यक आहे.

मागच्या आठवड्यात संपूर्ण शिक्षण क्षेत्राला आणि समाजाला मान खाली घालायला लावणारी एक घटना घडली. आदिवासी भागातील एका कन्या विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्याने “तिने जर वृक्षारोपण केले तर, ते झाड जगणार नाही, जळून जाते,’ असे अजब आणि अवमानकारक विधान तिच्या एका शिक्षकाने करून, तिला वृक्षारोपण करण्यास प्रतिबंध केला. विशेष म्हणजे या तीनही अंधश्रद्धायुक्त घटनांचे वाहक आणि पीडित हे शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि महिला असल्याने, ही अतिशय चिंतेची व लाजिरवाणी गोष्ट आहे.

समाजपरिवर्तनाच्या प्रमुख साधनांपैकी एक प्रमुख साधन म्हणून, ज्या शिक्षण व्यवस्थेकडे पाहिले जाते, त्याच शिक्षणक्षेत्रात अशा प्रकारच्या अंधश्रद्धायुक्त घटना घडत असतील, तर त्याला जाणीवपूर्वक आणि तातडीने पायबंद घालणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भारतीय घटनेत नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, जो राष्ट्रीय शिक्षणाचा गाभा घटक आहे आणि मूल्य शिक्षणातही जो समाविष्ट आहे, त्याचीच पायमल्ली सातत्याने होत राहील. वरील घटनेची कायदेशीर चौकशी होईलच. कारण त्यामुळे शालेय जीवनात, शालेय व्यवस्थेत अशा प्रकारच्या अंधश्रद्धायुक्त घडणाऱ्या घटनांना थोडा तरी आळा बसण्यास मदत होईल. मात्र हे असे का घडते? अशा अंधश्रद्धायुक्त बाबी का डोके वर काढतात? अशा प्रश्नांच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे आहे. वयात आलेल्या मुलीला मासिक पाळी सुरू होणे हे नैसर्गिक आहे. त्याचे स्वागतच केले पाहिजे. स्त्रीला मासिक पाळी आलीच नसती तर कोणताही जीव जन्मालाच आला नसता हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. मग मासिक पाळी येणारी मुलगी, युवती, महिला अपवित्र, अशुद्ध कशी असू शकेल? महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक स्थळी मुली आणि महिलांना प्रवेशबंदी असल्याचे पाहायला मिळते. हा सर्व धर्मांनी त्यांच्यावर केलेला अन्याय, जुलूम, जबरदस्ती नाही काय? महिलांनी धार्मिक स्थळात प्रवेश करावा की नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु केवळ मासिक पाळी आल्याचा ठपका ठेवून, ते बंधन कायमस्वरूपी त्यांच्यावर लादून, त्यांना प्रवेश नाकारणे ही बाब माणूस म्हणून स्त्रीला कलंकित व सतत अवमानित करणारी आहे. अशा निर्ढावलेल्या मानसिक प्रवृत्ती जर शिक्षण क्षेत्रात काम करीत असतील तर पुढच्या पिढ्यांचे भविष्य काय? त्यांच्या सान्निध्यात मुलीबाळी कशा काय शिक्षण घेऊ शकतील? आज राज्यात जन्माला येणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण विषम आहे. लोकसंख्यावाढीचा प्रश्न जसा भयानक आहे तसाच आणि त्याहीपेक्षा जास्त गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे झपाट्याने घटत चाललेली मुलींची संख्या! हा सामाजिक प्रश्न जर येत्या काळात तातडीने आणि जाणीवपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही, तर नैतिक पातळीवर याचे होणारे दुष्परिणाम सर्वच समाजाला भोगावे लागतील. आता मूळ प्रश्न हा आहे की, आजही समाज स्त्रियांच्या बाबतीत तिच्या जीवनातील प्रत्येक पैलूकडे गांभीर्याने का पाहत नाही? आजही स्त्रीचे सर्व आयुष्य सौभाग्यवती, घटस्फोटिता, परित्यक्ता, विधवा अशा पुरुषांशी संबंधित विविध नात्यांशी जोडलेले असते.

भारतीय घटनेने स्त्री-पुरुष समता मान्य केलेली आहे. घटनेच्या पानात ते लिहिलेले आहे. पण प्रत्यक्षात व्यवहारात ती समता आढळत नाही. समान कामाचे समान दाम स्त्रीला मिळत नाही. नोकरीची समान संधी नाही. मालमत्तेत हक्क नसतो. राजकारणात ३० टक्क्यांसाठी तिला सतत लढा उभारावा लागतो. सर्व प्रकारचे उपासतापास, रोजे, व्रतवैकल्ये, नवससायास हे त्या त्या जाती-धर्मातील बहुतांश स्त्रियांच्याच वाट्याला आलेले असतात. परिणामी कालांतराने स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर त्याचे दूरगामी विपरीत परिणाम होतात. त्यातून मुक्तता मिळण्यासाठी पुन्हा स्त्रिया अंधश्रद्धांकडेच वळतात. देवा-धर्माच्या नावाखाली भोंदूगिरी करणारे त्यांचा गैरफायदा घेण्यासाठी टपलेलेच असतात. अशा ह्या दुष्टचक्राशी स्त्री जन्मापासून मृत्यूपर्यंत झगडत असते. अंधश्रद्धांच्या ह्या बेड्यांना ती बेड्या न समजता, अलंकार समजते. कारण लहानपणापासूनच तसा चुकीचा संस्कार तिच्यावर झालेला असतो. स्त्री शिकली तर ती ह्या जंजाळातून मुक्त होईल, बाहेर पडेल, स्वतंत्र होईल, स्वतः विचार करून, स्वतःचे निर्णय स्वतः घेईल. सर्व दृष्टीने स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करेल. मात्र आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्यांच्या हाती समाजपरिवर्तनाचा वसा समाजाने विश्वासपूर्वक सोपवला आहे, तेच जर श्रद्धेच्या नावाने एखाद्या तथाकथित अल्लाच्या, गाॅडच्या, देवा-धर्माच्या, भोंदूबुवाच्या आहारी जाऊन सेवेत कार्यरत असतील तर विद्यार्थ्यांनी अशा शिक्षकांपासून काय बोध घ्यावा ? अशा वेळी शिक्षणात जाणीवपूर्वक समाविष्ट असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे काय करायचे? भारतीय घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला उपासना, श्रद्धा, विचार, अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य जरूर दिलेले आहे. पण त्याला आवश्यक तेवढ्या मर्यादा आणि बंधनेही घटनेने घातलेली आहेत. किमान शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मानवी घटकांनी तरी याचे जाणीवपूर्वक भान बाळगणे आवश्यक आहे. तरच, त्यांच्या हातून कोणत्याही प्रकारचा प्रमाद घडणार नाही. तरच, अशा शिक्षकांच्या हातून सुसंस्कारित, सक्षम, प्रगल्भ, विवेकी व्यक्तिमत्त्वाच्या नागरिकांची पिढी उदयास येऊ शकेल.

- डॉ. टी. आर. गोराणे

बातम्या आणखी आहेत...