आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:माऊलीची माया दिसे शिवाराच्या ठायी...

डॉ. सदानंद देशमुख16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपलं आयुष्य घडवण्यात जन्म देणाऱ्या आईप्रमाणे आपल्या अवतीभवतीच्या निसर्गातील अनेक मातांचा मोठा वाटा असतो. मग ती गावशिवारातील ‘काळी आई’ असो, गावाशेजारून वाहणारी ‘गंगामाय’ असो की गायरानातली वनराई; या सगळ्यांमध्येही एक आई दडलेली असते. म्हणूनच मातृदिन साजरा करताना, सभोवतीही थोडं डोळसपणे पाहावं अन् अशा ज्या-ज्या माता आपल्या अंतर्मनाला दिसतील, त्यांना मनोमन वंदन करावं. समाजातील नि निसर्गातील आईच्या अशा अनेकविध रूपांपुढंही नतमस्तक व्हावं!

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. सदानंद देशमुख यांनी ‘मदर्स डे’निमित्त उलगडलेली ही मातृबंधाची ठेव...

पलं जीवन जगत असताना माणूस सारखा विकास करीत असतो. कालच्यापेक्षा आजचा दिवस प्रगतीचा असला पाहिजे, यासाठी कोणत्याही सुज्ञ आणि संवेदनशील माणसाचा प्रयत्न असतो. बाल्यावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था या टप्प्यातून विकास होत असताना शिक्षण, व्यवसाय, नोकरी, लग्न, मुले-बाळे असा सगळा गोतावळा आपोआपच भोवती तयार हाेत असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो अदलत-बदलत अन् वाढत-बिघडत असतो. प्रत्येक वळणावर नवे नातेसंबंध निर्माण होत असतात. ते अनेक प्रकारचे असतात. त्या नात्याचा पोतही विलक्षण आणि विविध भावरंगांनी ओतप्रोत भरलेला असतो. मात्र, या सगळ्या बदलत्या नातेसंबंधात एक नातं श्रेष्ठ असतं, ते म्हणजे आई आणि मुलांचं नातं! ते श्रेष्ठ याचं कारण त्या नात्याशी आपली नाळ जुळलेली असते. त्यातल्या त्यात या नात्याचं भावतुंबी जखडलेपण हे आईचं अधिक असतं. आयुष्याच्या प्रवाहात एखादवेळी मुलं आईचा दु:स्वास करू शकतील, विशेषत: मुलाचं लग्न झाल्यावर, त्याला बायको आल्यावर तो आईकडे दुर्लक्ष करू शकतो. आईच्या मनातली मुलावरची माया मात्र पहिल्यासारखीच अतूट असते.

उत्सवी मानसिकता असणाऱ्या समाजव्यवस्थेत बारा महिन्यांच्या काळात अनेक वैशिष्ट्यपूर्ण दिवस येतात. त्यातच “मातृदिवस’ किंवा “मदर्स डे” सुद्धा असतो. या दिवशी आईचा सन्मान करावा, आपल्यासाठी, आपल्याला घडवण्यासाठी तिने जो हाडाचा मणी आणि रक्ताचं पाणी केलेलं असतं, ते आठवून हे मातृऋण फेडण्यासाठी तिचा विशेष सन्मान करावा, असा संकेत असतो. आई जिवंत असेल, तर उत्कटतेने तिची सेवा करावी. ती स्वर्गवासी झालेली असेल, तर मनोभावे तिचे स्मरण करून ऋणभाव व्यक्त करावा. मातृदिनाचा हा संकेत पाळण्याचा प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो.

मौखिक आणि लिखित कथनपरंपरेत आईविषयीच्या अनेक कथा पौराणिक, एेतिहासिक आणि आधुनिक साहित्य विश्वात रूढ असतात. आईच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कारांमुळे घडलेल्या अनेक महापुरुषांचा इतिहास आपल्याला माहीत असतो. आईच्या संस्काराचे स्वरूप हे कुटुंबसापेक्ष असते. तिचे आयुष्य बऱ्याच प्रमाणात तिच्या पतीच्या व्यवसायानुसार घडत असते. ती व्यापारी क्षेत्रातील असेल, तर तशा पद्धतीच्या परिघात राहून ती मुलांवर संस्कार करते. नोकरी करणारी आई असेल, तर ती आपल्या मर्यादेत मुलांची जडण-घडण करते. मुलांचे हट्ट पुरवण्यात ती थोडी वरचढ ठरू शकते.

मात्र, कृषी व्यवस्थेतील, कामगार वस्तीतील किंवा रोजमजुरी करणाऱ्या घरातील आई असेल, तर वाट्याला आलेल्या अभावग्रस्त परिस्थितीमुळे तिला आपली मुलं घडवताना संघर्ष करावा लागतो. पण, तो करतानाही ती कुठे कमी पडत नाही. त्यातूनच गॉर्कीची आई, श्यामची आई अशासारख्या कितीतरी पुस्तकातून जगभरात या आईवर सकस साहित्य निर्मिती झाल्याचे दिसते.

आपल्याकडच्या अभिजात अशा लोककथा आणि लोकगीतांतून आईची महती सांगणारे असे कितीतरी साहित्यबंध दिसून येतात. त्यातल्या त्यात मुलीचं लग्न होतं आणि ती सासरी नांदायला जाते, तेव्हा तिला आपल्या कनवाळू माहेराची खूप तीव्र, व्याकूळ करणारी हळवी अशी आठवण येत असते. माहेराची ही आठवण खरं म्हणजे तिच्या आईचीची आठवण असते. माहेरी असताना आईने जी शिकवण दिलेली असते, ती तर तिला आठवतेच; पण अंतरंगी उसळून येणाऱ्या आईच्या प्रेमाचा तो पूर तिच्या काळजात गच्च गच्च भरून असतो. त्यातूनच मग माहेरी म्हणजे मायेच्या भेटीला जाण्याच्या कल्पनेने तिच्या मनात कोणते भावतरंग उमटतात, हे सांगताना बहिणाबाई चौधरी म्हणतात...

आज माहेराले जाणं, झाली झाली व पहाटं आली आली डोळ्यापुढे माह्या माहेराची वाट...

तर माहेराच्या म्हणजे मायेच्या आठवणीने कासावीस झालेली लेक ना. धों. महानोरांच्या शब्दांत म्हणते... पुसाच्या सावल्यांनी आभाळ पांघरावं

पक्ष्यांच्या पंखावरी माहेरी रोज जावं!
‘मातृदिना’च्या निमित्ताने तुम्हा साऱ्यांप्रमाणे माझ्याही मनात तिच्याविषयीच्या भावना दाटून येतात. माझ्या आईचं नाव होतं पार्वती. पण, आम्ही सगळे तिला ‘माय’ म्हणायचो. ही पार्वतीमाय म्हणजे एक कृषिकन्याच होती. आपल्या माहेरचे कृषी संस्कृतीचे संस्कार घेऊन ती सासरी आली होती. आमच्या घरी बऱ्यापैकी, शेतीवाडीच्या भाषेत सांगायचं म्हणजे, सहा बैलांची शेतजमीन होती. त्यामुळं तिला पहाटेच उठून कामाला लागावं लागायचं. आधी गोठ्यातलं शेण काढून उकिरड्यावर टाकायचं, त्यातलंच थोडं बाजूला काढून चुलीतल्या जळणासाठी रोजच्या रोज चार-सहा गोवऱ्या थापायच्या, शेणाचा काला करून अंगणात सडा टाकायचा, एवढ्या मोठ्या घराचं तळकूट शेणकाल्याने सारवून घ्यायचं, गायीच्या दुधाच्या धारा काढायच्या, मग स्वयंपाकाला लागायचं. चुलीचा अन‌् भानोशाचा उपयोग करून वरण शिजवायचं, भाकरी थापायच्या. ते झालं की बायकांसोबत शेतकामासाठी शेतावर जायचं!

संध्याकाळी घरी आल्यावर, शेतकामानं कितीही अंग आंबून गेलं असलं तरी.. ‘चाल देवा, तुले कुठी इसावा’ असं स्वत:शी बोलून पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. रात्रीची जेवणं झाल्यावर पोरासोरांच्या गराड्यात बसून त्यांच्याशी गुजगोष्टी करायच्या. अभ्यासाला बसवायचं. विरंगुळा म्हणून आपल्या मनाच्या तळाशी असलेली लोकगीतं किंवा लोककथा सांगायच्या.. अशा संसाराच्या रगाड्यात तिचे दिसामासी दिस, सालामागं सालं संपून गेली. या सगळ्या रगाड्यात विरंगुळा असायचा, तो बारा महिन्यांच्या काळात क्रमश: येणाऱ्या सण-उत्सवांचा. नागपंचमी, पोळा इथून सणाला सुरुवात व्हायची. दसरा-दिवाळी अन‌् अजून कुठल्या अधल्या-मधल्या सणावाराला चांगला-चुंगलं, गोडधोड करून घरातल्या सगळ्यांना खाऊ घालणं, हा तिचा आनंद सोहळा असायचा. या सोहळ्यासाठी तिचं काम रोजच्या तुलनेत दुपटीनं वाढलेलं असायचं. फरक एवढाच की, सणावाराला ती घरी असायची. इतर दिवशी मात्र दिवसभर शेतावर राबावं लागायचं. अशा दिवसांत त्या राबणुकीतून सुटका व्हायची. तिच्यासाठी तेवढं एक समाधानही आभाळाएवढं मोठं असायचं... घरात आणि शेतात पार्वतीमायच्या सोबत मी नेहमी असायचो. तेव्हा ती जगण्याचं अनुभवसिद्ध तत्त्वज्ञान बोलता-बोलता सांगत राहायची. जसं की, जन्म देणाऱ्या आईसोबत आपल्या आणखी काही आया असतात. त्यांचं आपलं जगणं घडवण्यामध्ये, आपल्याला पुढं नेण्यामध्ये मोलाचं योगदान असतं, असं त्या बोलण्याचं सार असायचं. त्यामुळंच आपल्या आयुष्याला वेढून असणाऱ्या इतरही अनेक गोष्टी असतात. त्यांचेही ऋण आपण मानले पाहिजेत, असा संस्कार मनावर होत गेला. जसे की, गावाजवळ एक टेकडी असते. टेकडीवर देवीचं मंदिर असतं. ती गावदेवी आध्यात्मिक शक्ती देत असते. म्हणूनच विशिष्ट दिवशी आणि नवरात्रीच्या दिवसात तिची आराधना केली पाहिजे. त्यामुळं आपलं मन प्रसन्न आणि भयमुक्त राहतं. आपल्या गोठ्यातली गाय आपल्याला दूध देऊन भरणपोषण करते, तिची वासरं मोठी झाल्यावर, त्यांना बैलश्रंग आल्यावर ती कुणबिकीत औत-फाट्याला कामी येतात. शेतरानावर आईसोबत कामाला असणाऱ्या सुभद्राकाकू, गंुपामामी, प्रयाग वहिनी, शारदा मावशी आणि गल्लीतील शेजारच्या पोक्त बायका, ज्या आपल्याला मुलासारखं जपतात, त्या सुद्धा मायेच्याच तर भूमिकेत असतात!

सगळ्यात महत्त्वाची म्हणजे, गावशिवारात असणारी आपली शेती. तिला तर आपण “काळी आई’च म्हणतो. आपलं आयुष्य घडवण्यात या काळ्या आईचा मोठा हातभार असतो. गावाशेजारून वाहणाऱ्या नदीचं सात्त्विक रूप अन् तिच्यातून वाहणारं ‘जीवन’ पाहिलं, तर या ‘गंगामाये’तही आपल्याला आईचंच प्रतिबिंब दिसतं. नदीकाठावरची किंवा गायरानातली वनराईसुद्धा आईच असते. म्हणूनच मातृदिन साजरा करताना, सभोवतीही थोडं डोळसपणे पाहावं अन् अशा ज्या-ज्या आया आपल्या अंतर्मनाला दिसतील, त्यांना मनोमन वंदन करावं. समाजातील नि निसर्गातील आईच्या अशा विविध रूपांपुढंही नतमस्तक व्हावं! शेवटी असं म्हणावंसं वाटतं... अंतरंग वाहताना असे तिच्या पायी

डॉ. सदानंद देशमुख sadananddeshmukh11 @gmail.com
(स्व.) पार्वती नामदेवराव देशमुख यांचे पुत्र

संपर्क : ९४२०५६४९८२