आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रा मीण भागातील प्रवाशांची हक्काची सोबती म्हणजे ‘लालपरी’! असंख्य उन्हाळे-पावसाळे सहन करत, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत तिने वेगळेपण जपले. तिच्या आजवरच्या खडतर मार्गात आर्थिक तोटा, संप, आंदोलने, तोडफोड असे गतिरोधक आले; पण ती थांबली नाही. आबालवृद्धांपासून सर्वांनाच तिने कायम सामावून घेतले. कालांतराने, लांबच्या प्रवाशांच्या गरजा ओळखून परिवर्तन, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही, शिवाई अशी कातही टाकली. प्रवाशांशी असणारा तिचा जिव्हाळा कायम राहिला. अशी सर्वसमावेशक एसटी, महिलांना प्रवास तिकिटात पन्नास टक्के सवलतीमुळे पुन्हा चर्चेत आली. या निर्णयातून एसटीला नवी उभारी देण्याचा प्रयत्न होताना दिसतो. शहरातल्या, स्वतःचे दुचाकी, चारचाकी वाहन असणाऱ्या, क्वचितच एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना यामुळे फारसा फरक पडणार नाही कदाचित. परंतु, आजही दळणवळणाचे एकमेव साधन म्हणून यावर अवलंबून असणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी, होतकरू तरुणी, शेतकरी महिला, लघुउद्योजिका, वयस्कर महिला अशा मोठ्या वर्गास मात्र ही योजना लाभदायी ठरेल. दैनंदिन एसटीने प्रवास करणाऱ्या महिला वर्गालाही याचा थेट फायदा होईल. ज्या विद्यार्थिनी, तरुणींची तालुका, शहरात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा अपुरी राहिली असेल त्यांनाही हा निर्णय अप्रत्यक्षपणे फायदेशीर ठरेल. एरवी ग्रामीण भागात काही मैलांवर जाण्यासाठी दुचाकीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या जर या निर्णयाने लक्षणीय प्रमाणात घटली तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम इंधन बचत व रहदारी नियंत्रणावरही नजीकच्या काळात होताना दिसेल. नव्याचे नऊ दिवस न राहता ही योजना दीर्घकालीन आणि यशस्वीरीत्या राबवण्यासाठी सरकार आणि महिला प्रवासी यांचे समान योगदान हवे. सवलतीमुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्यासाठी संभाव्य आर्थिक तरतूद व त्याची नियोजनपूर्वक आखणी हवी. महिलांसाठी राखीव आसनव्यवस्था, स्वच्छतागृहांची देखभाल आणि वेळोवेळी साफसफाई यासारखे बदलही येत्या काळात अपेक्षित आहेत. ही योजना सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी एसटी प्रवाशांनीदेखील समान हातभार लावायला हवा. एसटी स्थानकांची स्वच्छता, सार्वजनिक मालमत्तेची काळजी प्रत्येकाने सुजाण नागरिक म्हणून घ्यायला हवी. तसे झाले तरच ही योजना महामंडळ व प्रवाशांसाठी फलदायी ठरेल आणि अर्थाने तिचा हेतू साध्य होईल. { संपर्क : ९८५०३७११६१
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.