आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढाई आखर प्रेम का...:माणूस बनविणारे सहजीवन: आजच्या काळातील आव्हाने

मयुरी सामंत21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरदार, नातेसंबंध, शिक्षणव्यवस्था, रोजगाराच्या संधी अशा सर्व क्षेत्रात अनुभवास येणारी कुचंबणा तसेच समाजातील अतिरेकी व्यक्तिवाद यामुळे आजचा तरुण व्यक्तिगत, सामाजिक, राजकीय अशा सर्वच पातळ्यांवर परात्म होत आहे. अशा या भांबावलेल्या तरुणांसाठी मग लग्नाचा अर्थ केवळ लग्नाच्या ‘इव्हेंट’ पुरता आपोआपच मर्यादित होतो. यामध्ये नाते-संबंध, सहजीवन, त्याचा अर्थ, आशय या बाबींना महत्त्वच राहिलेलं नाही असं जाणवतं; मग समतेवर आधारित नाते-संबंध, सहजीवन यासारख्या संकल्पना तर आजच्या तरुणांच्या विचारविश्वाला तसेच भावविश्वाला दूर दूर पर्यंत स्पर्श करत नाहीत.

“आमच्या सहजीवनाचा प्रवास हा जात सोडून माणूस बनण्याचा प्रवास होता”, असे रणजीत आणि विद्या अभिमानाने सांगत होते. लातूर जिल्ह्यातील पाणगाव व रेणापूर सारख्या ग्रामीण भागातून ते दोघे आलेले आहेत. त्यांच्या सहजीवनाची बीजे पुण्यामध्ये MSWचे शिक्षण घेत असतानाच पेरली गेली. घरात आंबेडकरी चळवळीचा वारसा असलेला रणजीत आणि येलम-रेड्डी समाजातून आलेली विद्या यांना घरून खूप विरोध झाला. पण त्यांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आंतर-जातीय लग्नाचा निर्णय घेतला. त्यामुळे परिवर्तनवादी चळवळीशी त्यांची नाळ अधिकच घट्ट झाली.

“आज जन्मदाते आई वडील सोबत नाहीत. पण आम्हा दोघांचे आणि आमच्या मुलाचे सुद्धा पालकत्व स्वीकारलेले परिवर्तनवादी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते, मित्रमंडळी हाच आमचा परीवार आणि सहजीवनाचा खरा आधार आहेत” असे ते दोघे भावूक होऊन सांगत होते. MSWचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मराठवाड्यातील ‘सेवालय’ सारख्या एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेमध्ये राहून या दोघांनी आपल्या सहजीवनाची सुरवात केली. या मुलांसाठी निस्वार्थ भावनेने काम करणे हा विचार आणि स्वप्नं हाच त्यांच्या सहजीवनाचा भक्कम आधार तेव्हा होता. तसेच आपल्या आधीच्या पिढीतील परिवर्तनवादी चळवळीतून उभी राहिलेली सहजीवनाची उदाहरणे हे त्यांचे आदर्श होते.

प्रेम, नाते-संबंध, सहजीवन यांचा आधार मूल्ये आणि त्यातही समताधिष्टीत मूल्ये असावीत. तरच ते सहजीवन खऱ्या अर्थाने फुलू शकेल. पण आपल्या समाजाला याचा एकप्रकारे विसर पडला आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंत ही मूल्ये नीटपणे पोहोचलेली नाहीत हे वास्तव आहे. अशा या आजच्या काळात; तसेच माणसा-माणसातील नात्यात निर्माण झालेला दुरावा, प्रेम या कल्पनेला आलेलं बाजारी स्वरूप, प्रेम करणे म्हणजे ताबा मिळवणे, हक्क मिळवणे, स्वामित्व मिळवणे ही विद्रूप कल्पना जोर धरणे या सर्वाच्या पार्श्वभूमीवर रणजीत आणि विद्या व त्यांच्यासारख्या परिवर्तनवादी चळवळीतील असंख्य कार्यकर्त्यांचे सहजीवन नक्कीच आशेचा किरण ठरते.

आजच्या तरुण–तरुणींचा एकूणच लग्नसंस्थेकडे, नाते-संबंधांकडे बघण्याचा दृष्टीकोन, स्त्री-पुरुष संबंधांबाबत, लिंगभाव वर्तनाबाबतच्या त्यांच्या मुल्यसंकल्पनांच्या चौकटी जशा जात-पितृसत्ताक आहेत तशाच त्या आजच्या बदलत्या भांडवली बाजारपेठेला साजेशा अशाच आहेत. आजच्या काळातील लग्न सोहळ्यांना आलेलं बाजारी स्वरूप हे त्याचं एक महत्वाचं लक्षण आहे. चार-चार दिवस चालणारे खर्चिक लग्न सोहळे, प्री-वेडिंग शूट, डेस्टीनेशन वेडिंग सारख्या कल्पनांना तरुणांच्या लेखी आलेलं अवाजवी महत्व जसे बाजारपेठी चंगळवादाचे प्रतीक आहे तसेच ते आजची तरुण पिढी एकप्रकारच्या विचारहीनतेच्या मनोवस्थेत ढकलली जाण्याचे देखील प्रतीक आहे. आजच्या भांडवली समाजात ज्या स्वार्थाच्या, एकाकीपणाच्या, स्वातंत्र्यहीनतेच्या, प्रेमहीनतेच्या, अतिउपभोगाच्या प्रवृत्ती निर्माण होत आहेत त्याचा बळी आजची तरुण पिढी देखील आहेच. ग्रामीण, शहरी, विविध जात-वर्गातील तरुणांची वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पातळ्यांवर कुचंबणा होत असताना कोंडीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे बाजार व्यवस्थेने पुरवलेले मार्गच शेवटी उपलब्ध असतात.

घरदार, नातेसंबंध, शिक्षणव्यवस्था, रोजगाराच्या संधी अशा सर्व क्षेत्रात अनुभवास येणारी कुचंबणा तसेच समाजातील अतिरेकी व्यक्तिवाद यामुळे आजचा तरुण व्यक्तिगत, सामाजिक, राजकीय अशा सर्वच पातळ्यांवर परात्म होत आहे. तो एकप्रकारचा तुटलेपणा अनुभवत आहे. अशावेळी यातून मार्ग काढण्यासाठी आवश्यक अशा सर्जनशील पर्यायांच्या अभावामुळे या तरुणांच्या गोंधळलेल्या, विवेकहीनतेच्या मनोवस्थेत अधिकच भर पडत आहे. अशा या भांबावलेल्या तरुणांसाठी मग लग्नाचा अर्थ केवळ लग्नाच्या ‘इव्हेंट’ पुरता आपोआपच मर्यादित होतो. यामध्ये नाते-संबंध, सहजीवन, त्याचा अर्थ, आशय या बाबींना महत्त्वच राहिलेलं नाही असं जाणवतं; मग समतेवर आधारित नाते-संबंध, सहजीवन यासारख्या संकल्पना तर आजच्या तरुणांच्या विचारविश्वाला तसेच भावविश्वाला दूर दूर पर्यंत स्पर्श करत नाहीत. आजच्या या तरुण पिढीला आदर्श प्रेमाचं प्रतीक म्हणून पुरुषी धारणा बाळगणारा, हिंसा हा उत्कट प्रेमाचा अविष्कार मानणारा कबीर सिंग, अर्जुन रेड्डी यासारख्या चित्रपटातील नायक आपला वाटतो आणि हेच हिंसक प्रारूप स्त्री-पुरुष नात्याचे, प्रेमाचे आदर्श प्रारूप वाटते तेंव्हा आपण आज २१ व्या शतकात अंगिकारलेली आधुनिकता ही खरी आधुनिकता नाही हे ठासून सांगावे लागेल. त्याचबरोबर ६०-७० च्या दशकातील युवक क्रांती दल, छात्र युवा संघर्ष वाहिनी सारख्या अनेक परिवर्तनवादी जनचळवळींनी निर्माण केलेल्या आंतर-जातीय, आंतर-धर्मीय तसेच समताधिष्टीत सहजीवनाच्या, स्त्री-पुरुष नाते संबंधांच्या ऊर्जा आणि जाणीवांना पुन्हा एकदा नव्याने जागृत करण्याची देखील गरज आहे.

परंतु हे करत असताना बदलत्या काळानुसार जुन्या प्रारुपांची तपासणी करत आजच्या काळातील आव्हानांना यशस्वीरीत्या पेलू शकतील अशी समताधीष्टीत प्रारूपे निर्माण होण्याच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे असे प्रकर्षाने वाटते. उदाहरणार्थ : आज परिवर्तनवादी चळवळीच्या बदललेल्या आणि बदलत्या स्वरूपाचा विचार केल्यास असे दिसते की ‘पूर्णवेळ कार्यकर्ता’ ही संकल्पना काहीशी कालबाह्य झालेली आहे. तसेच १९९० नंतरच्या जागतिक भांडवलशाहीच्या टप्प्याने निर्माण केलेल्या विशिष्ट अशा आर्थिक-सामाजिक व्यवस्थेमध्ये उदरनिर्वाहाचे प्रश्न देखील बिकट बनलेले आहेत. अशा या काळात ‘दोघांपैकी एकाने अर्थार्जन करावे व एकाने पूर्णपणे चळवळीला झोकून द्यावे’ या सारख्या ६०-७० च्या दशकात उभ्या राहिलेल्या सहजिवनाच्या प्रारुपाची व्यवहार्यता प्रश्नांकित झालेली आहे. आजच्या काळात सहजीवनाची चर्चा या बदलत्या संदर्भात केली पाहिजे असे अनेक तरुण कार्यकर्त्याना प्रकर्षाने वाटते. युवाभारत संघटनेशी जोडला गेलेला पूर्णवेळ कार्यकर्ता दयानंद म्हणाला, “ आज चळवळी पुढील आव्हानांचा विचार केल्यास असे जाणवते की कार्यकर्त्याचे सहजीवन हा आजच्या चळवळीसाठी कधी नव्हे इतका कळीचा मुद्दा बनला आहे. परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्याचे सहजीवन कसे असावे याची चर्चा परिवर्तनवादी चळवळीच्या अवकाशात अधिक गंभीरपणे आणि एक राजकीय प्रश्न म्हणून होणे गरजेचे आहे”.

परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ता/कार्यकर्ती म्हणून घडत असताना एखादी व्यक्ती बदलाच्या ज्या विविध प्रक्रियांमधून जात असते त्यातली एक महत्वाची पण काहीशी दुर्लक्षित राहिलेली बाब म्हणजे कार्यकर्त्याच्या ‘खाजगी’ मानल्या गेलेल्या कुटुंबाच्या पुनर्मांडणीची प्रक्रिया! कार्यकर्त्याच्या सहजीवनाची चर्चा या कुटुंबाच्या पुनर्मांडणीच्या प्रक्रियेच्या संदर्भात होणे गरजेचे आहे. परंतु असे करत असताना कार्यकर्त्यांच्या सहजीवानाबद्दलची ही चर्चा ‘सर्वच बदलले’ आणि ‘काहीच नाही बदलले’ या दोन धृवांमध्ये तसेच ‘यश’ आणि ‘अपयश’ अशा द्वैतामध्ये अडकवून करणे योग्य ठरणार नाही. बदल समजून घेण्यासाठी विकसित झालेल्या आतापर्यंतच्या ठोकताळ्यामुळे किंवा मोजपट्ट्यांमुळे या कार्यकर्त्यांचे, त्यांच्या सहजीवनाचे वैविध्यपूर्ण प्रवास, हस्तक्षेप, छोटे छोटे प्रयोग काळाच्या ओघात कुठेतरी विरून जातील आणि ते राजकीय आणि वैचारिक पातळीवरचे खूप मोठे ऐतिहासिक नुकसान ठरेल.

samant.mayuri@gmail.com

बातम्या आणखी आहेत...