आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराका ही वाचकांनी ‘मीरा’ चित्रपटाच्या संगीतामध्ये आलेल्या समस्या आणि अडचणींबद्दलचा लेख वाचून मला सोशल मीडियावर सुचवले की, या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये आणखी काही अडचणी आल्या असतील, तर त्याही सांगून टाका. त्यामुळे आजचा लेख प्रेमजी निर्मित आणि गुलजार दिग्दर्शित ‘मीरा’ चित्रपटातील मीराच्या पतीच्या (नायकाच्या) शोधावर आधारित आहे. या चित्रपटाचा शुभ मुहूर्त १४ ऑक्टोबर १९७५ रोजी झाला. हेमामालिनी यांना त्यांच्या आध्यात्मिक गुरू माँच्या आशीर्वादाने मीराची भूमिका स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली, म्हणून त्यांनी लगेचच चित्रीकरणाच्या तारखा दिल्या. त्यामुळे मुहूर्तानंतर हेमामालिनी यांच्या दृश्यांचे चित्रीकरण सुरू झाले. हेमामालिनी त्या काळातील सर्वात मोठ्या स्टार होत्या, त्यामुळे त्यांचे मानधनदेखील खूप जास्त होते. निर्माते प्रेमजींना हा चित्रपट बनवायचा होता, तर हेमामालिनी यांचे मानधनही द्यावे लागणार होते! पण, मीराच्या पतीच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड अजून व्हायची होती. आपल्या मुलीसाठी सुयोग्य वर शोधताना आई-वडिलांची जशी कसरत होते, तशीच वेळ प्रेमजी आणि गुलजार यांच्यावर मीराच्या पतीचा शोध घेताना आली. मीरासाठी त्यांनी कुठं कुठं वर नाही शोधला? कुठं कुठं आमंत्रणाच्या विड्याचं ताट नाही पाठवलं? अनेक ठिकाणांहून नकार आल्यानंतर अखेर अमिताभ बच्चन यांनी मीराच्या पतीची भूमिका साकारण्यास होकार दिला! पण १९७५ पर्यंत जंजीर, शोले, दीवार, जमीर, चुपके चुपके, मिली आदी यशस्वी चित्रपटांनंतर अमिताभ बच्चन यांचे नशीब आकाशाला गवसणी घालू लागले होते. त्यांच्यावर सतत कामाचे ओझे पडत होते. प्रत्येक दिवस मौल्यवान होता. त्यामुळे एकत्र चित्रीकरण करण्यासाठी हेमामालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्या तारखा मिळणे कठीण होते. या स्थितीमुळे अमिताभ बच्चन यांनी चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच “मीरा’ सोडला. आता मीरासाठी पुन्हा नव्या वराचा शोध सुरू झाला, पण तो घेण्यासाठीही अनेक महिने लागले. तेवढा काळ उलटूनही एकही स्टार मिळत नसताना, मीराचा पती राजा भोजराज सिसोदिया यांची भूमिका नव्या अभिनेत्याला का देऊ नये, असा विचार केला गेला. पण, निर्माते प्रेमजी यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून ही सूचना योग्य वाटली नाही. नवीन कलाकाराला घेऊन चित्रपट विकणे कठीण होईल, म्हणून त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि ही भूमिका फक्त एखादा स्टारच करेल, हे निश्चित केले. त्यामुळे सर्वजण पुन्हा मीराच्या पतीचा शोध घेण्यात गुंतले. शेवटी १९७८ च्या जानेवारीमध्ये, चित्रपटाच्या मुहूर्तानंतर सुमारे सव्वादोन वर्षांनंतर मीराला अखेर तिचा वर मिळाला आणि हा वर होता विनोद खन्ना! विनोद खन्ना यांनी केवळ एक दिवसाच्या बैठकीनंतर हा चित्रपट करण्यास होकार दिला. हा होकार शाब्दिक होता. कोणताही लेखी करार नव्हता. पण, मीराचा भोजराज मिळाल्याने सर्वांना आनंद झाला. विनोद खन्ना यांनी चित्रीकरणासाठी १९७८ च्या सप्टेंबरमधील वेळही दिली. याच काळात चित्रपटसृष्टीतील काही लोकांच्या मनात जी वैचारिक आणि आध्यात्मिक क्रांती घडत होती, त्याचा परिणाम ‘मीरा’ या चित्रपटावरही झाला. संगीत दिग्दर्शक कल्याणजी यांनी त्यांच्या घरी आलेल्या भगवान रजनीश यांच्याशी प्रसिद्ध दिग्दर्शक विजय आनंद यांची ओळख करून दिली. (तेव्हा त्यांना ओशो किंवा ओशो रजनीश म्हटले जात नव्हते). विजय आनंद हे रजनीश यांच्या प्रबळ क्रांतिकारी विचारांनी प्रभावित होऊन त्यांचे शिष्य बनले. नवीन दृष्टिकोनातून प्रेरित होऊन त्यांनी चित्रपट उद्योगात रजनीश यांच्या अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली. महेश भट्ट आणि विनोद खन्ना हेदेखील त्यांच्या लाटेत सामील झाले. भगवान रजनीशांचे अनुयायी बनल्यानंतर विनोद खन्ना यांनी ओरेगॉन (अमेरिका) येथे बांधल्या जात असलेल्या रजनीशपुरममध्ये त्यांच्यासोबत स्थायिक होणार असल्याचे जाहीरही केले. सर्व काही सोडून संन्यासी म्हणून अमेरिकेत स्थलांतर करणे, एवढेच उद्दिष्ट ठेवले. विनोद खन्ना यांच्या या घोषणेने आधीच अडचणीत सापडलेल्या निर्माते प्रेमजींच्या काळजात धस्स झाले. एव्हाना बराच काळ निघून गेल्याने चित्रपटाचे बजेट मर्यादेपलीकडे गेले होते. हेमामालिनी यांचे मानधन देणे जड जात होते. त्यामुळे त्यांनी हेमा यांना पेमेंट सिस्टिम “पर डे’नुसार करण्याची विनंती केली आणि हेमा यांनी ती मान्यही केली. त्यानुसार, दररोज चित्रीकरणानंतर प्रेमजी हेमामालिनी यांना नोटांनी भरलेले पाकीट देत असत. विनोद खन्ना यांना विनंती केली, त्यांना गळ घातली, तेव्हा त्यांनी वचन दिले की, ‘मीरा’चे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतरच आपण संन्यासी बनून अमेरिकेला जाऊ आणि घडलेही तसेच. १९७५ मध्ये सुरू झालेला हा चित्रपट २५ मे १९७९ या दिवशी प्रदर्शित झाला. मात्र, तोपर्यंत त्याच्या निर्मितीत जो पैसा खर्च झाला होता, तो परत येण्याची आशा तर सगळ्यांनाच होती. पण, हा चित्रपट अयशस्वी ठरल्याने त्यावर पाणी फेरले. गुरू माँचा आशीर्वाद किंवा ओशो रजनीश यांचे ट्रान्सडेंटल मेडिटेशन “मीरा’ चित्रपटाला साहाय्य करू शकले नाहीत. “मेरे तो गिरधर गोपाल..’ या गाण्यासाठी वाणी जयराम यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मी अगदी तटस्थपणे सांगू इच्छितो की, त्या वर्षी नामांकन झालेली सगळीच गाणी फारशी दमदार नव्हती. त्यामुळे पुरस्कार देणाऱ्यांनी ‘संत मीरा’ यांना मान देत हा पुरस्कार दिला. बाकी हेमामालिनी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते, पण फिल्मफेअर पुरस्कार जया बच्चन घेऊन गेल्या. विनोद खन्ना १९८२ पर्यंत सर्व काही सोडून अमेरिकेला गेले. रजनीशपुरममध्ये झालेल्या गदारोळ आणि वादांवर आधारित ‘वाइल्ड वाइल्ड कंट्री’ ही वेब सिरीज तुम्ही आेटीटीवर पाहू शकता. ओशोंना अमेरिकेतून पलायन करावे लागले आणि त्यांची सेक्रेटरी शीला (खरे नाव शीला अंबालाल पटेल. योगायोगाने ती माझी मैत्रीण आहे. गेल्या वर्षी २१ डिसेंबरला आम्ही एकत्र जेवण केले होते) मात्र त्यात अडकली. अमेरिकेतील कारागृहात ३९ महिने काढल्यानंतर, इकडे-तिकडे भटकत आणि संघर्ष करत त्या स्वित्झर्लंडमधील रेनफेल्डनजवळील मेस्प्राच नावाच्या गावात स्थायिक झाल्या. तिथे त्या मानसिक आजारी लोकांसाठी मदर्स होम चालवतात. आरोप-प्रत्यारोपांची मालिका अजूनही सुरूच आहे. माँ शीला अाजही ओशोंना भगवान म्हणून संबोधतात, तर महेश भट्ट यांनी त्यांच्या बाबतीत, शब्दांत अडकवणारा ठग असे म्हटले आहे. असो. अंधभक्ती आणि अंधद्वेष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ध्यान, तपस्या, अध्यात्मामध्ये गणित आले की मग ती एक संघटना बनू लागते आणि असे घडले की आश्रमांचे रूपांतर कार्यालयांमध्ये होऊ लागते. कार्यालयांमध्ये राजकारण, हेवेदावे जन्माला येतात आणि मग ध्यान, अध्यात्म हे उद्देश दूषित होऊन एक ना एक दिवस सगळे उघडकीस येते. आपण सर्वांनी हे पाहिले आहे, अगदी कितीतरी वेळा! जो गर्दीतही एकटा आणि सुखात असतो.. आणि जो एकांतातही सुखात राहतो, तोच खरा संन्यासी असतो. आज्ञा द्या! जय हिंद! वंदे मातरम!
अन्नू कपूर सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि सूत्रसंचालक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.