आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:मासिक पाळी : फुलण्यात मौज आहे !

डॉ. आकांक्षा महाजन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व संताचा सृजनाशी निकटचा संबंध आहे. एका जीवापासून दुसऱ्या जीवाची निर्मिती होणं ही निसर्गाची कर्तबगारी. मानवांच्या मादीमध्ये प्रजोत्पादनाची पहिली नांदी म्हणजे स्त्रीची मासिक पाळी. बाल्यावस्थेपासून सुप्त असलेली संप्रेरके अचानक उसळी खातात आणि शरीर, मन, व्यक्तिमत्त्व, विचार या सगळ्याच स्तरांवर हल्लकल्लोळ माजतो. मेंदूच्या खालच्या भागात असणारा हायपोथॅलॅमस हा भाग कार्यान्वित होतो. संप्रेरकांच्या प्रभावाखाली अंडाशय मोठ्या प्रमाणात इन्स्ट्रोजनची निर्मिती करते. शरीरात अनेक बदल होतात. शरीर-मनाच्या या वाढीला “वयात येणं’ म्हणतात. स्त्रीत्व जपणारी, मातृत्व देण्यासाठी असणारी स्त्री आरोग्यातील ही एक महत्त्वाची साखळी. मासिक पाळी म्हणजे काय ?

मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. दर महिन्याला पाळी आली की अंडाशयातील काही बीजांडे वाढीला लागतात. त्यातील एक अंडे ज्याकडे जास्त पेशी असतात ते आकाराने मोठे होते. त्यात द्रव साठतो. द्रवाचा दाब जास्त झाला की ते अंडे फुटते. त्यातून स्त्रीपेशी (Ovum) बाहेर पडते. ही स्त्रीपेशी अंडनलिकेत खेचली जाते. गर्भाशयातील अंतःत्वचेची जाडी वाढणे ही क्रिया बीजांडाच्या प्रभावाखाली होते. भ्रूण न तयार झाल्यास तयार होणारे बीजांड सुकून जाते. रक्तातील संप्रेरकाची पातळी कमी होते (Estrogen, Progesterone) व गर्भाशयाची अंतःत्वचा (Endometrium) गळून पडते, याला मासिक पाळी म्हणतात. साधारण भारतीय मुलींची पाळी १२-१३ व्या वर्षी सुरू होते. आठ वर्षाच्या आधी पाळी आल्यास किंवा १४ वर्षांपर्यंत पाळी न आल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पाळी सुरू आणि बंद होण्याच्या वेळा आई व मुलींमध्ये समसमान असतात. वयाच्या १२-१३ व्या वर्षी सुरू होणारे मासिक पाळीचे चक्र वयाच्या ४५-५० व्या वर्षी थांबते. मुलीचा देह नॉर्मल आहे, तिच्या सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहेत, याचा बाह्य पुरावा म्हणजे नियमितपणे पाळी येणं. पाळी दरम्यानची स्वच्छता : { दर सहा तासाला पॅड बदलावा. पॅड कागदात गुंडाळून कचऱ्यात टाकावा, फ्लश करू नये. { दिवसातून किमान एकदा अंघोळ करावी. { व्हजायनल वॉश कधीतरी वापरायला हरकत नाही, मात्र अतिरेक टाळावा. कारण त्याने योनीमार्गाचा PH बदलतो आणि दुष्परिणाम होऊ शकतात. { मेनस्ट्रुअल कप दिवसातून एकदा उकळत्या पाण्यात खळखळ उकळावा. बारा तासांच्या आत तो बाहेर काढून, रिकामा करून साबणाने धुवावा. कप काढण्या / घालण्याआधी हात स्वच्छ धुवावेत. { कपडा (क्लॉथ) / पॅड्स स्वच्छ धुवावेत. उन्हात वाळवावेत. तीन महिन्यांनंतर सेट बदलावा. दर दोन तासाला पॅड बदलावे लागत असतील, रक्ताच्या गाठी पडत असतील, खूप कमी किंवा खूप जास्त रक्स्त्राव होत असेल तर तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. हार्मोन्स असंतुलनाने असे होऊ शकते. उपचारानंतर पाळी नियमित होते. पाळी सुरू झाल्यावर एक-दोन वर्षांपर्यंत ती अनियमित राहू शकते. मात्र, त्यानंतरही दीड-दोन महिने पाळी न येणे किंवा २१ दिवसांच्या आत पाळी येणे असा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मासिक पाळी आणि पोटदुखी बहुतांश लहान मुलींना पाळीच्या वेळी पोटदुखी होते. ही पोटदुखी सामान्य ते तीव्र स्वरूपाची असू शकते. मळमळ, उलट्या, चक्करही येते. अशा वेळी वेदनाशामक गोळ्या घेता येतात. या गोळ्यांचे Long term side effects नसतात. साधारण एक बाळंतपण झालं की या वेदना कमी होतात, मात्र अतिशय तीव्र वेदना एक-दोन दिवसांच्या वर राहत असतील तर सोनोग्राफी करून निदान करणे योग्य ठरते. पाळीचे दिवस एकंदरच गैरसोयीचे असतात. पण, शरीराची योग्य स्वच्छता राखणे, वेळच्या वेळी पॅड बदलणे अथवा मेन्स्ट्रुअल कप बदलणे, पोट साफ होण्याकडे लक्ष देणे यामुळे त्रास कमी होतो.

बातम्या आणखी आहेत...